दिनांक 8 जून 2017 रोजी आपल्या एका मुलाखतीत तत्कालीन भारतीय आर्मीचे प्रमुख आणि माजी CDS जनरल बिपिन रावत यांचे वाक्य आज आठवले...
“Indian Army is fully prepared for a simultaneous multi-front war on both external and internal fronts ”
“Indian Army is fully ready for a two and a half front war ”
साभार - The Hindu
वरील वाक्याचा सोप्या मराठी भाषेत अर्थ म्हणजे, भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर भारताला भारताला एकाचवेळी बाहेरील दोन आघाड्या आणि भारतातील 0.5 आघाडी यासोबत लढा द्यावा लागेल...
बाहेरील दोन आघाड्या कोणत्या असतील हे सांगायला कुण्या जाणकारांची गरज नाही पण अंतर्गत 0.5 आघाडी म्हणजे काय ? आणि कोण ? परत ह्या आघाडीत हेतुपुरस्सर भारतीय सैन्याचे खच्चीकरण करणारे आणि अजाणतेपणी राजकीय द्वेषाने पछाडलेले आपल्याच सैन्याला कोंडीत पकडू बघत असतात....हा लेख म्हणजे त्याचाच एक आढावा...
22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील आणि मानवी सभ्यतेचा लाज आणणारा दिवस.पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन घाटीत पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. ह्या नृशंस मानवी हत्याकांडात 26 नागरिक मृत आणि 20 नागरिक जखमी झाले. ही पद्धत हमास ही आतंकवादी संघटना वापरते. ही घटना एका क्रूर मानसिकतेचा ताजा पुरावा आहे. आतंकवाद्यांनी आता त्यांची रणनिती बदलली आहे. मोठे कट रचून ते वास्तवात आणण्यास खूप अडचणी असतात याउलट जम्मू काश्मिर मध्ये पर्यटनास येणारे पर्यटक आणि भाविक यांच्यावर हल्ला करणे फार सोपे असते. म्हणूनच मागील काही काळात असे हल्ले होण्याचे प्रमाण आणि निष्पाप नागरिक मृत्युमुखी वाढण्याचे प्रमाण वाढले होते. पहलगाम हल्ला हा योजनाबद्ध सुनियोजित हल्ला होता यात शंकाच नव्हती....पण कुठलाही आतंकवादी हल्ला हा जसा प्रत्यक्ष आतंकवादी घडवून आणतात तसाच त्यांना पडद्यामागून मदतीचा हात असतो...आणि हळूहळू हे सिद्ध होत आहे...
ही घटना भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि संपूर्ण भारताच्या अखंडतेला आणि एकतेला एक आव्हान होते. अशातच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबिया या देशाचा शासकीय दौरा अर्धवट सोडून भारतात परत आले तिकडे भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री, केंद्रीय सुरक्षा समिती आणि सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन परिस्थिती आणि त्या परिस्थितीची दाहकता समजून घेतली.ह्या नृशंस हत्याकांडाचा भारत बदला घेणार याची कल्पना संपूर्ण जगाला आली होती. प्रधानमंत्री मोदी यांनी 24 एप्रिल 2025 रोजी बिहार येथे एका जनसभेला उद्देशून भाषण करताना सरळ सरळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचा इरादा बोलून दाखविला....आणि हा बदला कल्पनेपेक्षा भयंकर असेल असेही त्यांनी भर सभेत जगाला आणि पाकिस्तानला उद्देशून सांगितले....यावेळी श्री मोदी यांची देहबोली आणि आवाज एक वेगळीच धार होती. मुख्य म्हणजे जगातील कोणताच राष्ट्रप्रमुख अशी भाषा जाहीरपणे वापरत नाही म्हणून मोदींच्या या जनसभेत दिलेल्या या गंभीर संदेशाला एक असाधारण महत्त्व प्राप्त झाले. हे भाषण संपते न संपते तेच 0.5 फ्रंटवाले समोर आलेत आणि त्यांनी तोच आपला आलाप सुरू केला आणि तो एक “ सरहदो पे गोलिया चल रही है... वाला टुकार शेर समोर केला..मुळात इतक्यात बिहार राज्यात निवडणुका नाहीत....आणि दुसरे म्हणजे गोळीबार सरहद्दीवर नव्हता झाला तर देशांतर्गत झाला होता हे या फ्रंटवाल्यांचा ध्यानात असते...पण त्यांना मुद्दे भटकवायचे असतात...
भारत दहशतवाद आणि दहशतवादाला पोषण देणाऱ्या देशाला धडा शिकवणार हे आता स्पष्ट झाले. अशातच भारताने एकतर्फी सिंधू जलकारार रद्द करण्याची घोषणा करून भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.... १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष आणि फील्ड मार्शल अयुब खान यांच्यात हा करार झाला होता. २३ एप्रिल २०२५ रोजी, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी २०२५ च्या बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. हा पाकच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा आघात होता...राष्ट्रीय हित लक्षात घेता एका रणनिती अंतर्गत घेतलेला हा निर्णय होता.पण आपल्याच देशातील काही 0.5 फ्रंट वाल्यांना हा निर्णय अमानवीय वाटला आणि अपशकून करायला ते समोर आले....भारत पाकवर हल्ला कधी करणार असे प्रश्न ते जाहीरपणे विचारू लागलेत...प्रश्न विचारणे हा जनतेचा हक्क आहे पण त्याची उत्तरे कृतीतून दिली जातात हे ह्याच्या गावीही नसते. तारीख आणि वेळ सांगायला ती काही लग्नाची आमंत्रण पत्रिका नाही...
अशातच भारताने तिन्ही सैन्यदल यांचा समन्वय साधून ऑपरेशन सिंदूर मोहिमेची आखणी केली...पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करणे हा या ऑपरेशन चा मुख्य हेतू होता..त्याप्रमाणे भारतीय हवाई दलाने आपल्याच हद्दीतून पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणावर अतिशय उच्च दर्जाचे कसब आणि तंत्रज्ञान उपयोगात आणत ताबडतोब हल्ला चढविला. हा हल्ला बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा वेगळा होता...कारण त्यावेळी आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून यशस्वी हवाई हल्ला केला होता. ऑपरेशन सिंदूरने भावी युद्ध कसे असेल त्याची चुणूक जगाला दाखविली. या कारवाईत प्रत्यक्ष जमिनीवर सैनिक (आर्मी ) यांचा सहभाग फार कमी, सजग नौसेना आणि हवाई दलाचा मर्यादित वापर करून आपले भू - राजकीय ईप्सित साध्य करण्याचे कसब भारताने आत्मसात केले आहे हे जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितले.अत्याधुनिक त्रिस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणा, छोटी व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन व कुशल तंत्रज्ञ यांच्या जोरावर भारताने पाकिस्तानात खूप खोलवर मारा केला. यावेळी भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सरळ सरळ पाकिस्तानी हद्दीत त्यांना हवे ते ठिकाण नेस्तनाबूत करत सुटले होते..पाकिस्तानी चायनिज हवाई यंत्रणा सपेशल अपयशी ठरली...याउलट भारतीय हवाई यंत्रणा आणि रशियन S - 400 यांनी कमाल केली...सर्व पाकिस्तानी हल्ले अचूक टिपत त्यांना अगोदरच निकामी करण्याचे काम या सर्व यंत्रणांनी चोख बजावले....भारतीय हल्ले आणि बचाव इतका अभेद्य होता की, पाकिस्तानला याचा जबरदस्त सामरिक,आर्थिक आणि मानसिक धक्का दिला...0.5 फ्रंटवाले भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार हे विचारणारे आता, युद्ध नको बुद्ध हवा म्हणून याचना करत होते. अर्थातच जगाला बुद्धाची गरज आहेच...भारताची पण तीच भूमिका आहे. पाकिस्तान या देशाने नेहमीच हिंसेला प्रथम प्राधान्य दिले....आणि स्वरक्षणाचा अधिकार हा निसर्गदत्त आहेच.. देशहितासाठी.या अधिकाराचा वापर करणे ही बाब कायदेशीरच आहे.
भारतीय सैन्यदले पाकिस्तानवर जोरदार हल्ले करून शौर्यगाथा लिहित असताना 0.5 फ्रंटवाले एक नवीन हत्यार उपसत होते की, ज्याची मुले लष्करात नाहीत त्यांनाच युद्ध हवे असते. मग प्रश्न हा उरतो ज्यांची मुले लष्करात असतात त्यांना तरी युद्ध हवे असते काय ? युद्ध हे शेवटचा पर्याय असतो आणि युद्ध जर लादलेले असेल तर ते शर्थीने लढावेच लागते...आणि याआधी तरी जे युद्धे झालीत तेव्हासुद्धा हिच परीस्थिती होती. माजी पंतप्रधान स्व. पंडित नेहरू, स्व. लालबहादुर शास्त्री, स्व. इंदिरा गांधी, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा कुठे युद्ध हवे होते....? पण त्यावेळी सुद्धा आपल्या शूर सैनिकांना युद्धात बलिदान द्यावेच लागले...भारतीय सैनिक जे सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना आपल्या देशावर आणि आपले भारतीय सामान्य जनतेवर विश्वास असतो की, माझ्यानंतर हा देश आणि येथील जनता माझ्या परिवाराची काळजी घेईल...ही प्रेरणाच त्याला सर्वोच्च बलिदानास प्रवृत्त करत असते....
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे पूर्णतः मोडले...शेकडो दहशतवादी तर मारले गेलेत पण त्यांच्या मदतीला धावून जाणारा पाकिस्तान संपूर्ण जगासमोर उघडा पडला...कारण भारताने आधीच स्पष्ट केले होते की, कारवाई फक्त दहशतवादी ठिकाणावर होईल.त्यात पाकने प्रतिहल्ला करून संपूर्ण जगाला दाखवून दिले की, आम्ही दहशतवादी समर्थक आहोत. भारताने पाकचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केलेत...त्यात नूर खान,रफीकी,मुरीद,सुक्कुर, सियालकोट,पसरूर,निवडी,सरगोधा,स्कार्दू,भोलेरी आणि जेकबाबाद. या तळाचा प्रामुख्याने सामवेश होतो.यात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानचे अनेक प्रशिक्षित वैमानिक आणि कर्मचारी मारले गेलेत कारण त्यांना कल्पनाच नव्हती की, भारत देश इतक्या खोलवर भागात आक्रमण करेल...आणि महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती जगाला मिळावी यासाठी भारतीय सैन्यदलाने विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या बहादुर महिला अधिकाऱ्यांना समोर करून संपूर्ण जगाला आणि पाकिस्तानला संदेश दिला की, आम्ही भारतीय शेवटपर्यंत एक आहोत.
युद्धविराम :
भारताच्या आक्रमक भूमिकेने पाकिस्तानचे कंबरडे मोडले गेले आणि भारत आपले सर्व ईप्सित साध्य करण्याच्या जवळ असताना अचानक युद्धविराम होणार याची कुजबुज सुरू झाली. आतापर्यंत भारताला समर्थन देणारे अमेरिका आणि इतर देश युद्धविराम व्हावा यासाठी आग्रही होते.काय असेल नेमके कारण ? बातमी मध्येच बातमी लपलेली असते...इतके सारे घडत असताना एकाही पत्रकाराला याची कुणकुण लागू नये ? 9 मे रोजी भारतीय ब्रह्मोस मिसाईल आणि स्पाईस 2000 या बंकर भेदी बॉम्बने संपूर्ण पाकिस्तानात एकूण 11 ठिकाणी मारा केला. त्यात महत्वाचे केंद्र म्हणजे 1)नूर खान - रावळपिंडी.2)सरगोधा - पाकिस्तानचे अणुऊर्जा केंद्र.3)जेकबाबाद – एफ-१६ आणि अण्वस्त्रांचा बालेकिल्ला. या ठिकाणावर अचूक हल्ला केला गेला...आणि या युद्धाची चक्रेच बदलली....पाकिस्तानात म्हणे अचानक भूकंप 4.1 आणि 5.7 तीव्रतेच भूकंप आला...अचानक पाकिस्तानी NCA ची मीटिंग त्यानंतर वॉशिंग्टन, बीजिंग इत्यादी ठिकाणी फोन लागले असतील.... आणि अमेरिका सक्रिय झाला....कारणे काहीही असो पाकिस्तान देश कसाही असो....पण अमेरिकेला दक्षिण आशियात पाकिस्तानचे अस्तित्व पाहिजे म्हणजे पाहिजेच...काय झाले असेल वरील तीन हवाई तळावर ? अमेरिकेने भारताला युद्धविराम करण्यास राजी केले हे मान्य पण अटी भारताच्या होत्या....त्यातील पहिली मुख्य अट म्हणजे युद्धविराम म्हणजे फक्त Pause अर्थात Stop नव्हे. भारत कधीही आपली आघाडी उघडू शकतो. लवकरच दुपारी 10 मे दुपारी 3.35 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला संदेश पाठवला: "आम्ही आमचे शस्त्र खाली ठेवण्यास तयार आहोत." या प्रस्तावावर भारत आपल्या शर्तीवर राजी होणार हे अमेरिकेला माहीत होते....कारण पाकिस्तानात आक्रित घडले होते आणि भारत हा एक संवेदनशील जबाबदार देश आहे हे अमेरिका आणि संपूर्ण जग जाणून आहे
संध्या. 6.00 वाजता – भारत सरकारने युद्धविराम घोषणा केली....पण त्यापूर्वीच तिकडे अमेरिकेन डाव साधत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषण केली...
मग नेमके असे काय घडले असेल की, सर्व जग खडबडून युद्धबंदीच्या मागे लागले ? ते आलेले भूकंप नैसर्गिक होते काय ? की भारतीय ब्रह्मोस मिसाईलचा आवाज होता तो ? F - 16 विमाने त्यांचे काय झाले ? त्यांनी आकाशात झेप घेण्यापूर्वीच काही झाले असेल काय ? F - 16 परत एकदा जायबंदी म्हणजे अमेरिकेच्या शस्त्र उद्योगाला घरघर..किंवा भारतीय हवाई अगदी पाकिस्तानच्या वर्मावर घाव तर नाही केला...आणि जर हे सत्य आहे तर ते भारताचा विजय आहे...आणि इतकी मोठी आघाडी घेतल्यावर नरेंद्र मोदी माघार घेणारे व्यक्तिमत्व नाही... की, भारताने असे काही केले जे......म्हणून शांत रहा....विजय खूप मोठा आहे...पण तो जगजाहीर करता येणार नाही... आणि करायचा पण नसतो.
युद्ध हे नेहमीच संहारक असते यात कुठलाही वाद नाही पण भारताने यावेळी स्वतःची कमीत कमीत हानी होऊ देता...पाकिस्तानला एक जोरदार तडाखा दिला आहे...यासाठी आवश्यकता असते ती संयम, सराव, आत्मविश्वास सोबतच तंत्रज्ञान आणि तज्ञांची. अफाट पैसा खर्च करून युद्धसामग्री विकत घेऊन युद्धे जिंकता येत नाहीत तर त्यासाठी निष्ठा आणि धर्म आपल्या बाजूने हवा असतो हे भारताने परत एकदा सिद्ध करून दाखविले आहे...अशा युद्धात अवकाश संशोधन,अर्थशास्त्र, देशाची एकता, हवामान आणि महत्वाचे म्हणजे अनुशासित सैन्यदले, परिपक्व राजकीय नेतृत्व आणि राष्ट्रवादी जनतेची साथ आवश्यक असते...जे भारताने जगाला परत एकदा सिद्ध करून दाखविले...सोबतच 0.5 फ्रंट लोकांनी जिओपॉलिटिक्स आणि संरक्षण यावर चिंतन करणे गरजेचे आहे......
0.5 फ्रंट काही आवडती वाक्ये....
पहलगाम हल्ला नंतर लोक
1) पाकिस्तान वर हल्ला करा, पाकिस्तानला कधी धडा शिकवणार
2) Mock ड्रील करून काय फायदा , बिहार निवडणुकी साठी फक्त वातावरण निर्माण केलं जातंय देशात युद्धाचं
पाकिस्तान मध्ये अतिरेकी तळावर हल्ला केल्यावर लोक
1) बिहार निवडणुकी साठी हल्ला केला..
2)दोन्ही बाजूच्या निष्पाप लोकांचा बळी दिला युद्ध करून.
3)देशाला युध्दाची गरज नाही. फक्त अतिरेकी शोधून मारा.
4) स्वतः ला इतिहासात अजरामर करण्यासाठी मोदी pok घेणार. देश भिकेला लागला तरी चालेल त्यासाठी...
5) देशाला युद्ध परवडणार नाही. देश 10 वर्ष मागे जाईल
मर्यादित हल्ले केल्यानंतर शस्त्रबंदी केल्यावर लोक
1) युद्ध का थांबवलं, ?
2) POK का नाही घेतला ?
3) शेपूट खाली घातलं....
ता . क.
जगातील अण्वस्त्र संपन्न चौथ्या क्रमांकाच्या सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे साहेब नुकतेच 11 मे रोजी आपल्या भाषणात सांगत आहेत की, युद्ध हा काही रोमँटिक सिनेमा नाही, युद्ध ही फार गंभीर आणि जोखमीची बाब आहे, युद्ध हा शेवटचा पर्याय असायला हवा. म्हणूनच आपले पंतप्रधान म्हणाले होते की, हा युद्धाचा काळ नाही....पण अविचारी शक्ती आपल्याला युद्धात ढकलण्यासाठी प्रयत्न करतील....पुढे ते म्हणतात की, एक सैनिक म्हणून मी युद्धासाठी नेहमीच तत्पर आहे...पण युद्ध ही माझी प्राथमिकता नाही....सर्व प्रश्न हे चर्चेतून सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल...शस्त्र संघर्ष हा कुठलाही पर्याय असू शकत नाही....प्रश्न देशांतर्गत असो की, आंतरराष्ट्रीय हा चर्चेतूनच सोडविला गेला पाहिजे.....ही मुलाखत सगळ्यांनी अवश्य बघावी...आणि 0.5 फ्रंट वाल्यांनी आपण कुणाच्या तरी हातचे खेळणे अथवा शत्रू राष्ट्राच्या Spy War चे बळी तर नाही पडत आहोत ना याची खात्री जरूर करून घ्यावी.
म्हणून नेहमी लक्षात असू द्या युद्ध हा शेवटचा पर्याय असतो...त्यात लहरीपणा न करता ईप्सित साध्य झाले की Pause घ्यावाच लागतो.....
© गणेश