बोधकथा

Sunday 5 December 2021

उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....

          

      जगातील सर्वात मोठा अक्षम्य गुन्हा कुठला असेल तर, तो म्हणजे एखाद्याची चूक नसताना त्याला शिक्षा देणे किंवा त्या व्यक्तीला अवमानित करून त्यास मरणयातना देणे...पण अशी वेळ येतेच कशी ?? सगळं सुरळीत सुरू असताना आपण नेमकं एका ठिकाणी चुकत असतो ते म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या किंवा आपल्या वागणुकीचे विश्लेषण कधी करतच नाही...वरवर सगळं सुरळीत सुरू असताना अचानक भावनांचा उद्रेक होऊन सर्व विस्कळीत होतं...हे विश्लेषण करायला खूप काही रॉकेट सायन्स वगैरे आत्मसात करायला हवं असंही नाही...“समोरच्या व्यक्तीला आता आपली फारशी गरज उरली नाही किंवा आपलं अस्तित्व आता तिच्या लेखी फार महत्वाचे नाही” याचे संकेत आपल्याला खूप आधीच मिळत असतात....आपल्याला जाणीव होत असते पण मन ती गोष्ट मानायला तयार नसते किंवा आपण शांतचित्ताने बसून त्यावर विचार करत नाही....हीच वेळ असते वास्तव मान्य करण्याची.
       आपली चूक असेल तर कुठलाही अहंपणा न बाळगता आपली चूक मान्य करून समोरच्याची माफी मागायची आणि त्याला आपलंसं करायचं.अशावेळी तो आपला self respect घरी कुठेतरी ठेऊन बाहेर निघायचं....चूक मान्य करायची...पण जर नेमकं याउलट असेल तर मग ??? आपली चूक नसेल तर ??  सरळ सरळ सांगून द्या आणि राम राम ठोका. शेवटचं बोलून घ्या..अजिबात शरणागती अथवा लाचारी पत्करू नका.एखाद्या व्यक्तीला आपला कंटाळा येऊ शकतो हे सत्य स्वीकार करा...कदाचित त्याला आपल्यापासून सुटका हवी असू शकते..त्याला त्याचं जीवन जगायचं असेल...त्यात तुमच्यासाठी जागा नसेल..“ गरजेचं नातं हे घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं ” (व.पु.)जगातील प्रत्येक व्यक्तीचं मन आणि विचार करण्याची प्रवृत्ती ही भिन्न असते हे एकदा आपण समजून घेतलेलं बरं...आपण उगाच त्रास करून घेत असतो...समोरचा व्यक्ती असताना आणि नसतानाही आपलं जीवन सुरूच होतं ना ??? ती व्यक्ती असताना काही क्षण आपण आनंदात घालवलेत आता ती वेळ निघून गेली असं समजायचं आणि पुढे निघायचं...रेल्वे गाडी तिचा प्रवास सुरु करताना सगळेच प्रवासी सोबत नसते ना घेत....काही समोरच्या स्टेशनवर चढतात काही उतरतात कारण त्यांचं इप्सित स्थळ आलेलं असतं...किंवा काहींना ते गाठायचं असतं...म्हणून आपण थोडा ना आपला प्रवास थांबवत असतो....ते प्रवासी काही काळापुरते आपली साथ देतात हेच सत्य आहे....हेच तत्व जीवनात लागू पडतं...
         माझं कसं होईल किंवा समोरच्याला काय वाटेल हा विचारच सोडून द्यायचा...येथे आपल्या एका श्वासाची शाश्वती नाही पण आपण उद्याच्या किंवा खूप लांबच्या योजना आखतच असतो ना...निसर्गाने आपल्यासाठी आधीच योजना आखलेल्या असतात...माझ्या आयुष्यात जे घडेल किंवा घडत आहे ते चांगलेच होत आहे हा दृष्टिकोन बाळगला की, सर्व गोष्टी सोप्या होतात...म्हणून ज्यांना आपण नको आहोत त्यांना एकदा कायमचा टाटा बाय बाय करून द्या...किंचित त्रास होईल पण समोरचा प्रवास सुखकर होईल...समोरच्याला माझं म्हणणं कळावं, त्याची चूक कळावी..त्याने आपल्या वर्तनात बदल करावा हे मानसिक युद्ध जेथे आहे तेथेच थांबविलेले बरे....कुणी मान्य करो व न करो प्रत्येक माणूस आपला अहंकार जपत असतो हळुवारपणे...त्यावर जर आघात झाला तर तो वार पचविणे आणि परतवून लावणे दोन्ही अवघड होऊन जाते....
         हे सगळं करत असताना एक व्यवहार्य गोष्ट मात्र करायची. “ समोरच्याला माफ करायचं नाही, आपल्या सोबत झालेला व्यवहार विसरायचा नाही पण सोबतच स्वतःला त्रास मात्र करून घ्यायचा नाही. ” कधीच काही विसरायचं नाही...नाहीतर विस्मरणाचा मानसिक रोग जडू शकतो. समोरचा व्यक्ती आहे तसाच रहाणार आहे ; तो नाही बदलणार. का बरं त्याने बदलावे....स्वभाव बदलत नसतो हे एकदा व्यवस्थित समजून घेतलं आणि मनाला अन मेंदूला पटवून दिलं की अर्धी लढाई खलास होते. आपल्याला आलेल्या अनुभवातुन धड़ा घेण्यासाठी आणि सहन केलेल्या मानसिक त्राससमोर विसरून जाणं हा पर्याय असूच शकत नाही. पुन्हा ते अनुभव येऊ नयेत म्हणून शिकणे महत्वाचे. वाचतांना हे कितीही मनाला पटत नसेल तरी हाच अंतिम पर्याय आहे...विसरायचं काहीच नाही,समोरच्याला माफ करायचं नाही...आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही... आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे स्वतःसाठी आणि स्वतःच....कुणाच्याही समर्थनाशिवाय...जाऊ दे ना,सोडून दे सगळं हे म्हणून आयुष्य सोपं करता येत,पण समृद्ध नाही...

म्हणून
   

उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....


- गणेश

2 comments:

  1. अगदी बरोबर आहे .apan aalple aayushy jagayche.karan aaplyala dukh dilelya wyaktilahi atgawt nahi ki yala aapn konte dukh dile.mg aapnch ka kawatalat basayache.tyapeksha satat pudhe wat shodhaychi

    ReplyDelete