बोधकथा

बोधकथा

चतुर व्हा शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज ॥ अंतरी नसता चातुर्य-बीज । कदापी शोभा न पावे ॥ - समर्थ रामदास सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे. परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन. माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो, भावार्थ - विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत व घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते. अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फ़ुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून समर्थ म्हणतात.. उदंड बाजार मिळाले । परी ते धूर्तचि आळिले ।। धूर्तापासी काही न चाले । बाजाऱ्यांचे ।। भावार्थ - बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही. लग्नातली देणी घेणी उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला. एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?' प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.' ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय? यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?' प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?' राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.' राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले. संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?' त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.' यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?' राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?' गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.' वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला कोल्हा आणि कोंबडा एका शेतकऱ्याने कोल्हयास पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता, त्यात सकाळीच एक भला मोठा कोल्हा सापडला. ती मौज दुरून एका कोंबडयाने पाहिली, परंतु कोल्ह्यासारख्या लबाड व दुष्ट शत्रूवर एकाएकी विश्वास ठेवणे बरे नव्हे, म्हणून तो हळूहळू भीत भीत सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे पहात उभा राहिला. कोल्ह्याने त्यास पाहिले, तेव्हा तो मोठा संभावितपणाचा आव आणून त्यास म्हणतो, ‘मुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ तुझ्यामुळे झाले; मी सकाळीच पलीकडल्या कुंपणांतून घराकडे जात असता, तुझा शब्द माझ्या कानी पडला, तेव्हा तुझी कशी काय हालहवाल आहे, ते विचारून मग जावे, अशा विचाराने मी इकडे आलो, तो या चापात अडकलो. आता कृपा करून तू जर मला एक बारीक काठी आणून देशील, तर ती या सापळ्यात घालून, मी आपली सुटका करून घेईन. हे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही.’ हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि सापळ्यात कोल्हा अडकला आहे, असे त्याने आपल्या धन्यास सांगितले. तो शेतकरी एक मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या त्या कोल्ह्याची पाठ अशी मऊ केली की, त्या माराने तो कोल्हा ताबडतोब मरण पावला. लेखन- अनंत दळवी कथेचे नाव-वेळेचे महत्त्व एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. तात्पर्य - जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे. समाधान एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील . श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही. साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची ! साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो . साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो . तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत . श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्याा दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. ☆★☆★अर्थात ★☆★☆ या कथेचा आशय हा आहे की, सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही. तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही. ते भगवंताच्या भजनानेच मिळते . भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत.

No comments:

Post a Comment