बोधकथा

Tuesday 5 April 2022

अ-सत्यमेव जयते

साधारणतः मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीला सदर पुस्तक “ असत्यमेव जयते " पोस्टाने घरपोच मिळाले. दरम्यान ह्या काळात मराठी चित्रपट  “ पावनखिंड ” सिनेमागृहात इतिहास घडवत होता. प्रखर स्वामीमिष्ठा आणि राष्ट्रप्रेम म्हणजे काय ? याचं ज्वलंत उदाहरण.छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या रक्ताने उभारलेले स्वराज्य. तर दुसरीकडे “ द काश्मीर फाईल्स ” नावाचा एक हिंदी चित्रपट स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्याच देशातील एका काळ्याकुट्ट इतिहासाची ज्याची तेव्हा आणि आजही कुणी दखल घ्यायला तयार नाही त्या विषयाची डोकं सुन्न करणारी मांडणी करत होता..प्रचंड सामाजिक व राजकीय चर्चा झडत होती व अजूनही सुरूच आहे..काश्मीरमध्ये तशी परिस्थिती का उद्भवली ??? मुळात काश्मीर ही कधीच समस्या नव्हती, शांततेची कबुतरे उडविण्याच्या नादात वास्तवाचे भान न ठेवता स्व - प्रतिमा संवर्धनाचा एक भाग म्हणून देशाच्या भु - राजकीय अस्मितेशी केलेला तो एक खेळ होता. या  पार्श्वभूमीवर मा.लेखक श्री अभिजित जोग लिखित व भीष्म प्रकाशन पुणे यांच्याद्वारे प्रकाशित “ असत्यमेव जयते ” हे पुस्तक हाती लागले किंवा फेसबुकवर जाहिरात बघून व शिर्षक वाचून कुतूहल वाढले म्हणून त्वरित पुस्तक मागविले.भारताच्या इतिहासातील दिशाभूल संदर्भासह उलगडून दाखविणारे महत्वाचे दस्तावेज असेच सदर पुस्तकाला म्हणावे लागेल.
        सत्यापेक्षा राजकीय सोय महत्वाची वाटली म्हणजे एखाद्या देशाच्या वैभवशाली व सुसंस्कृत इतिहासाची कशी वाताहात केली जाते याचे संदर्भासह बिनतोड स्पष्टीकरण आपल्याला सदर पुस्तकात प्रत्येक पानावर वाचायला मिळते. इतिहासाची शुद्ध वाताहात करून ज्या देशाच्या नागरिकांवर नेहमी पराभूत असा शिक्का मारला जातो तो देश म्हणजे आपला वैभवशाली भारत देश.  काही साम्राज्यवादी देश, संधीसाधू राजकीय नेतृत्व तसेच चाटूकार व विदेशी भाकरीवर जगणाऱ्या मुठभर लोकांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जो आधुनिक भारताचा इतिहास ??? लिहिला तो वाचताना सुजाण माणसाला किंवा त्या त्या वेळेतील कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांना सहज जाणवते की, आपण म्हणजे पराभूत. आपल्यावर फक्त आक्रमणे झालीत आणि विदेशी सुलतान, इंग्रज यांनीच राज्य केले. त्यांची लूटमार आणि कत्तली म्हणजे भारताचा इतिहास हेच आपणास शिकविले जाते.  
       एक देश म्हणून आपला इतिहास 1947 पासून सुरू होतो या अत्यंत भंपक मानसिकतेमुळे आपल्या हजारो वर्षांच्या सुवर्ण इतिहास हेतुपुरस्सर गहाळ करण्यात आला. साम्राज्यवाद्यांची नक्कल करणारा, नेहमी पराभूत मानसिकता जपणारा एक देश अशी आपली ओळख का तयार करण्यात आली ?? हा इतिहास दडपण्यामागे खरे लाभार्थी कोण होते किंवा आहेत असे अनेक रहस्य लेखकांनी या पुस्तकात संदर्भासह आपल्यासमोर मांडले आहेत. एखाद्या राष्ट्राचा समूळ नाश करण्यासाठी तेथील जनतेची बौद्धिक धारणाच संपवून टाकणे आवश्यक असते असे आचार्य चाणक्याने म्हटले आहे..नेमके आपल्या देशात हेच घडत आले आहे. परकीय आक्रमकांनी तलवारीने आपले डोके कलम केले आणि इंग्रजांनी त्यांच्या लेखणीने योजनाबद्ध पद्धतीने कशी आपली बुद्धी कलम केली याची मुद्देसूद मांडणी लेखकाने येथे करताना अगदी हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करताना प्राचीन भारतीय सामाजिक, आर्थिक, राजकीय व व्यवस्था यावर अगदी सखोल प्रकाश टाकलेला आहे.हे सर्व वाचत असताना नक्कीच आपल्याला स्वतःचा अभिमान वाटतो.
       आर्य म्हणजे कुणीतरी परकीय आक्रमक वगैरे तद्दन भंपक प्रचार का केला जातो ? आर्य म्हणजे नेमके कोण? आर्य म्हणजे कुणी परकीय नव्हते ते भारतीय होते असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. ( Writing and speeches Bol. VII ) किंबहुना तसे शेकडो पुरावे असताना आपल्याला मात्र वेगळेच काहीतरी का शिकविले जाते याचे उत्तर म्हणजे “ असत्यमेव जयते ” हे पुस्तक. आक्रमक उच्चवर्णीय आणि स्थानिक मूलनिवासी ही आग नेमकी कुणी लावली ? भारतीय भाषा त्यांचा संपूर्ण जगावर असलेला  गौरवशाली प्रभाव, मेकॉलेने भारतीय शिक्षण पद्धतीची वाताहत कशी केली हे तो स्वतः मान्य करतो त्याचे पुरावे. सुरुवातीला भारताचे वैभव व लोकजीवन बघून भारावलेले ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी हे मान्य करतात की भारत एक सधन व वैभवशाली देश आहे. नंतर असं काय घडतं की, अगदी विरुद्ध आणि दिशाभूल करणारा इतिहास मांडला जातो.गुप्त घराणे,   चौल साम्राज्य, वैभवशाली विजयनगरचे साम्राज्य यांचा इतिहास आपल्याला का शिकविला जात नाही ? भारत देश खरंच परभुतांचा देश आहे काय ? बादशाह अकबर खरंच इतका महान होता काय ? सुफी संत आणि त्यांची भूमिका, भारताचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण त्याची कारणे, जातीव्यवस्था अधिक दृढ कशी झाली , स्त्री शिक्षण, सती प्रथा इत्यादी व अनेक विषय लेखकांनी अनेक संदर्भ देऊन त्यावर प्रकाश टाकलेला आहे. श्री राम जन्म भूमीचा मुद्दा सौहार्दाने निकालात निघत असताना तो नेमका का चिघळवला गेला ??? भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारकांचे अतुलनीय योगदान नेहमीच का नाकारण्यात येते ?? महत्वाचे म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा. भारताला स्वातंत्र्य नक्की कुणी मिळवून दिले याचे अगदी तर्कशुद्ध विवेचन तेही तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेला पत्रव्यवहार व दिलेला कबुलीजवाब याचे संदर्भ देत लेखकांनी आपल्या डोळ्यावर पसरलेले झापड दूर केले आहे...
       “ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ” किंवा डाव्या इतिहासकारांनी सांगितलेला भारत म्हणजे भारत नव्हे तर तो आपल्याला शोधावा लागेल. नेमका हाच धागा पकडून मा.लेखक श्री अभिजित जोग यांनी सदर पुस्तकात प्रत्येक पानावर आपल्या अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध लेखनाची संदर्भासह छाप सोडलेली आहे. आपले कथित पुरोगामी ? मित्र जेव्हा भारताचा विकृत इतिहास सांगतील तेव्हा त्यांना उत्तर द्यायला म्हणून सदर पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे...तसे त्यांना सांगूनही उपयोग नाही...कारण ते हे सत्य मान्य करणार नाहीत यावरच त्यांची दुकानदारी व रोजीरोटी सुरू आहे ना...भारतामध्ये भारताचा इतिहास खरा इतिहास दृष्टीआड करण्याचा कपटी प्रयत्न हा गेली कित्येक दशके मुद्दाम केला गेलेला आहे. पण सोशल मिडियावर आपले प्रत्येक मत व्यक्त करणारी आजची तरुण पिढी त्यांना अगदी सोप्या भाषेत आपल्या भारताचा वैभवशाली इतिहास उत्तमरित्या उलगडून दाखविला आहे तो मा.लेखक श्री अभिजित जोग सरांनी.खरे सत्य जाणून घ्यायची जिज्ञासा असेल तर प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकांनी सदर क्रांतिकारी पुस्तक नक्की वाचावे.
धन्यवाद.


- गणेश कुबडे


पुस्तकाचे नाव - असत्यमेव जयते
लेखक - श्री अभिजित जोग
प्रकाशक - भीष्म प्रकाशन, पुणे
संपर्क - 9503864401
       

No comments:

Post a Comment