बोधकथा

Wednesday 25 January 2023

राष्ट्रीय मतदार दिवस

भारत देश म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असलेला  जगातील सर्वात मोठा लोकशाही  देश.येथील  निवडणूक प्रक्रिया  जगातील सर्व देशांना आव्हानात्मक वाटते पण ही किचकट प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडते..या यशाचे श्रेय जाते ते अर्थातच सर्व अधिकारी , निवडणूक कर्मचारी, BLO, सरंक्षण दल आणि मुख्य म्हणजे सजग भारतीय मतदार यांना....हाच धागा पकडून 25 जानेवारी 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो...शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास,शिक्षक, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एन.सी.सी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मतदानाचे महत्व

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया... हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळसच. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तद्वतच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो.....कारण मतदार हा सुदृढ लोकशाहीचा आधस्तंभ आहे. चला तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशातील मतदार आपले कर्तव्य चोख बजावून लोकशाहीला बळकट करतील अशी आशा करू या..

राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..

गणेश तु कुबडे
BLO - 012 विखणी
046 - हिंगणघाट विधानसभा क्षेत्र.

No comments:

Post a Comment