बोधकथा

Friday 21 May 2021

मी आणि नथुराम

    फेसबुकवर गेली अनेक दिवस एक पोस्ट लक्ष वेधून घेत होती आणि प्रत्येकवेळी मी लक्ष देऊन वाचत होतो.प्रकाशनपूर्व पहिली आवृत्ती...., तिसरी... आणि चौथी आवृत्ती... आता तर हे लिहीत असेपर्यंत सहावी आवृत्ती संपत आलेली आहे.आश्चर्य आणि ओढ लागली की, काय असेल ह्या पुस्तकात ? कारण पुस्तकाचे शिर्षकच इतकं लक्षवेधी की,आपण जरी त्या काळात नव्हतो तरी,जगाच्या राजकीय आणि भारताच्या भौगोलिक रचनेवर प्रभाव पाडणारी ती जागतिक आणि ऐतिहासिक घटना. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या पाच महिन्यात असे काय घडले की, एका सर्वसामान्य माणसाला वाटलं आपण म.गांधी यांना संपवावं...ह्याची कारणे अनेक आणि त्या घटनेवर वाद विवाद आजही सुरूच आहेत. तो न संपणारा विषय आहे..आणि सुजाण नागरिकांनी कुणाचीही बाजू घेऊन आपसात वाद विवाद करण्यापेक्षा दोन्ही बाजू जाणून घेणे इष्ट ठरेल.
        अशातच १९९८ साली एक मराठी नाटक भारतीय नाट्य मंचावर आलं शिर्षक “ मी नथुराम बोलतोय ” !!!शिर्षकच इतकं भेदक की नाटकात काय असेल हे सगळ्यांनाच कळलं होतं आणि ज्यांनी बघितलं ते एका परिपूर्ण नाट्य कलाकृतीचे साक्षीदार ठरले.परिपूर्ण यासाठी की, सदर नाटकात कुठेही नथुरामचे उदात्तीकरण किंवा म.गांधींचा अपमान होणार नाही याची घेतलेली काळजी. पुस्तक मुळात त्या नाट्य कलाकृतीविषयी भाष्य करत जरी असले तरी हे पुस्तक म्हणजे प्रत्यक्ष रंगमंचावर नथुराम या एका सामान्य व्यक्तिमत्वाची असामान्य भूमिका गाजविणारे कलाकार आणि लेखक मा.श्री शरद पोंक्षे यांचे अनुभव कथन आहे.
       एका अजरामर नाट्यकृतीसाठी ती भूमिका वटवणारे श्री शरद पोंक्षे सरांनी त्या नाटकासाठी केलेली धडपड किंवा जीवनसंघर्ष सदर पुस्तकात खुद्द त्यांनीच मनोगत म्हणून मांडलेले आहे...लेखक सुरुवातीलाच प्रांजळपणे कबूल करतात की,ते काही सिद्धहस्त लेखक नाहीत, तर नट आहेत. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ह्या पुस्तकात त्यांनी आपले अनुभव शब्दरूपाने मांडले आले आहेत ते एका सिद्धहस्त लेखकालाही अंतर्मुख करायला लावतील इतकं सुंदर अनुभव कथन यात केलं गेलं आहे.मराठी नाट्य सृष्टीतील एका अजरामर आणि ऐतिहासिक नाटकाचे मध्यवर्ती नट म्हणून स्वतःचे अनुभव स्वतः कुठलीही अतिशयोक्ती न करता लिहिणे हे काही साधे काम नाही....श्री शरद पोंक्षे सरांची एक गोष्ट मला फार आवडली.त्यांनी पुस्तकात कुठेही “ मी ही भूमिका जगलो ” वगैरे शब्दप्रपंच केलेला नाही ...तर “ त्या नथुराम ह्या आव्हानात्मक भूमिकेला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्या भूमिकेने मला मोठं केलं " अशी प्रांजळ कबुली ते देतात.खरं तर इतकी प्रसिद्धी मिळूनही ही शालीनता त्यांनी जपली याचंच आश्चर्य वाटते.
       ह्या पुस्तकात शुभेच्छा संदेश देताना ज्येष्ठ अभिनेते मा.विक्रम गोखले साहेबांचं एक वाक्य आलेलं आहे       “तुम्ही गांधीवादी असा किंवा नसू देत ; पण तुम्हाला  एका सच्च्या गांधीवादी व्यक्तीवर टीका करण्याचा अधिकार  नाही.आयुष्यात कोणी कोणता राजकीय विचार जपावा, जतन करावा हे लोकशाही व्यवस्था सांगत नाही,निदान सांगू पण नये ” असे ते म्हणतात.नाटक करताना लेखकाला अश्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले जिथे महात्मा गांधीजींच्या अनुयायांनीच त्याच्या विचारांनाच हरताळ फासला मग ते नाटकाला विरोध करून झाल्यावर त्यांची प्रतिमा रस्त्यावर सोडून जाणे असो किंवा फक्त निवडणुका आहेत म्हणून नाटकाला विरोध करणारे स्थानिक नेते असोत...त्यांची कृत्ये बघून आपण विचार करायला लागतो हे मोर्चे वगैरे नेमके काय प्रकार असतात ते.नथुरामची भूमिका करणारे लेखक श्री शरद पोंक्षे सरांना विरोध झाला,जाळपोळ झाली,मानसिक,शारीरिक त्रास खूप झाला पण आंदोलन करून झाल्यावर म. गांधींची प्रतिमा ( फोटो ) तसाच टाकून देणारे आंदोलक कुठे आणि त्यानंतर तोच फोटो अदबीने आपल्या घरी आणून त्यास योग्य सन्मान देणारे लेखक मला खुपच भावलेत...त्यांच्यात हा समृद्ध स्थायीभाव आहे म्हणूनच ते सलग २० वर्षे नथुराम हा विषय लोकांसमोर मांडू शकलेत.या वीस वर्षांत एक माणूस आणि नट म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भोगलेला त्रास,कष्ट,यातना ह्यांची जोड नक्कीच आहे.
    १९९८ साली आलेलं नाटक.प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद त्यानंतर आलेली बंदी.परत कोर्टातून खटला जिंकून सुरू झालेला नाटकाचा प्रवास ते ११०० प्रयोगाचा केलेला विक्रम आणि त्यात प्रत्येकवेळी लेखक आणि इतर कलावंतांनी केलेला अतोनात संघर्ष हे वाचत असतानाच आपण विचारमग्न होतो की, नेमकं आपण रहातो कोणत्या समाजात ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टी आपल्या देशात फायदा बघून केल्या जातात...म्हणजे तो मूलभूत अधिकार जरी असला तरी तो समोरच्याला द्यायचा की,नाही हे काही घटक त्यांच्या सोयीने ठरवणार ??? आम्ही ठरवू तसे आणि तेच ! भलेही आम्ही ज्यांचं नाव घेऊन राजकारण करतो त्यांचे विचार पायदळी तुडवू तरी चालेल. आणि ह्यात काही सन्माननीय अपवाद वगळता आपल्या लोकशाहीचा चौथा खांब म्हणून मिरवणारी वृत्तपत्रे देखील होती.हे पुस्तक वाचताना हा असा दुटप्पीपणा आपल्याला पदोपदी जाणवतो...आणि आपण त्यावर विचार करतो हीच ह्या पुस्तकाची आणि लेखकाची खरी किमया.
    नथुराम गोडसेना जेव्हा फाशी झाली तेव्हा त्यांचे वय ३९ वर्षे आणि २०१८ ला नाटकांचे प्रयोग करत असताना श्री शरद पोंक्षे सरांचं वय ५२ वर्ष. आता आपण हे नाटक थांबवू या..कारण आपलं वय आणि नाटकाच्या मध्यवर्ती पात्राचं वय यातील अंतर...हे ज्या नटाला कळतं ना तोच खरा नट...यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना आपण थांबायला हवं...असं ज्या नटाला सुचतं ना तो एक व्यक्ती म्हणून महानच.सदर पुस्तक प्रकाशनात लेखकाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांची नावे लेखकाने उल्लेखित केलेली आहेतच...प्रकाशक म्हणून श्री पार्थ बावस्कर यांचे पण अभिनंदन करावे लागेलच...आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, प्रवचनकार, डॉ. सच्चिदानंद शेवडे साहेबांचा पण निर्मितीत सहभाग लाभला...त्यांचं एक वैशिष्टय आहे जे नमूद करावंसं वाटतं, इतके मोठं व्यक्तिमत्व पण त्यांना  Messenger वर एक संदेश जरी टाकला ना त्यांचा आवर्जून प्रतिसाद येतो...यापेक्षा माझे भाग्य ते काय ???
      मी प्रत्यक्ष नाटक बघितलं नाही ह्याची खंत आहेच पण आता CD उपलब्ध झालेली आहेच..ती मागवावीच लागेल...कारण आता सदर नाटक बघितल्याशिवाय ह्या पुस्तक वाचनाला पूर्णत्व येणार नाही. परत एकदा “ मी नथुराम बोलतोय ” ह्या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचे सर्व पडद्यावरचे कलाकार आणि पडद्यामागील कलावंत यांचे अभिनंदन....आणि मुख्य भूमिका साकारणारे श्रेष्ठ कलाकार तसेच “ मी आणि नथुराम ” ह्या पुस्तकाचे लेखक श्री शरद पोंक्षे सरांना खूप खूप धन्यवाद...एका जबरदस्त ऐतिहासिक नाटकाचे अनुभव कथन करताना कुणाच्याही भावनांना ठेच ना लागू देता...वाचकाला विचार करावयास भाग पाडणारे पुस्तक त्यांनी आम्हाला दिले...
    काहीतरी छान,वेगळं असं वाचनात आलं की ते इतरांना सांगावसं वाटतं...कारण त्याशिवाय वाचन अपूर्ण राहतं...म्हणून हा खटाटोप.मी कसं लिहू, कसं बोलू, शब्द कोणते वापरू हा विचार करायचाच नाही...समोरच्या व्यक्तीच्या मनाचा थेट ठाव घेणारी भाषा म्हणजे आपली मराठी भाषा....
   धन्यवाद...


पुस्तकाचे नाव  - “ मी आणि नथुराम ”
लेखक - श्री शरद पोंक्षे
प्रकाशक - पार्थ बावस्कर
                शब्दामृत प्रकाशन , औरंगाबाद  - ४३१००१
संपर्क -      ९९७००७७२५५



- गणेश




     

2 comments: