डॉ.कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था
“ आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं,तर आपली झोप उडवते ते स्वप्न खरं असतं ” - डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
काही माणसे त्यांना एखादं पद मिळालं की मोठे होतात. पण काही ऐतिहासिक युगपुरुष त्यांनी भूषविलेल्या पदाची शान आणखी उंचावतात. त्याच भारताच्या महान सुपुत्रापैकी एक म्हणजे भारताचे ११ वे महान राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मविभूषण, शास्त्रज्ञ, शिक्षक, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.( जन्म १५ ऑक्टोबर १९३१ ). आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते जगात लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. पोखरण अणुचाचणी, पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्र असो ह्यांच्या निर्मितीत डॉ.कलाम साहेबांचे अतिशय मोलाचे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. देशाच्या सरंक्षण क्षेत्रात उंच गरुडभरारी घेणारे हे व्यक्तिमत्व अतिशय शांत, सवेदनशील आणि अतिशय साधे जीवन जगणारे होते. अगदी राष्ट्रपती भवनात आपले स्वत:चे दोन जोड कपडे घेऊन प्रवेश करणारे आणि तेथून परत येताना फक्त आपले दोन जोड कपडेच घेऊन परत येणारे असे हे निष्काम कर्मयोगी ह्या जगात फार कमीच म्हणावे लागेल.म्हणूनच संपूर्ण जगाला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडली होती. ज्ञानाची अखंड साधना हे त्यांचे खास वैशिष्ट्य.
आयुष्यभर डॉ. कलामांचे एक वैशिष्ट्य होते आणि कुणीतरी त्यांना विचारले की, तुम्हाला कसे आठवणीत ठेवता येईल ? त्यांनी उत्तर दिले होते की मला शिक्षकाच्या रूपात लक्षात ठेवावे. हा शिक्षकांचा सन्मान तर आहेच पण त्यांच्या आयुष्यातील श्रद्धा काय होती,बांधिलकी काय होती याचीही ओळख होती. भारतासारख्या देशाला पुढे जाण्यासाठी, प्रभाव निर्माण करण्यासाठी गतीने चालायचे आहे तर येणार्या पिढ्यांना तयार करावे लागेल असे डॉ.कलाम नेहमी प्रतिपादन करायचे आणि त्यासाठीच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भारत बलवान व्हावा पण केवळ अस्त्र शस्त्रानी व्हावा ही त्यांची इच्छा नव्हती. शस्त्राचे सामर्थ्य आवश्यक आहे हेही ते नाकारत नव्हते पण त्यांना असे वाटायचे की देश सार्थ्यवान होतो तो त्या देशातील जनतेच्या सामर्थ्यावर आणी दुर्दम्य आशावादावार. म्हणून कलाम साहेब या दोन्ही प्रवाहाना एकत्र घेऊन चालत होते. एकीकडे नावीन्यपूर्ण शोध व्हावे,संशोधन व्हावे, संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा आणि हीच प्रगती सामान्य गरीब भारतीय तसेच जगातील इतर दुबळ्या देशांना उपकारक ठरो इतके त्यांचे विचार औदार्य दाखविणारे होते.
“ इंडिया २०२० : ए व्हीजन फॉर द न्यू मिलेनियम ” ह्या त्यांच्या पुस्तकांच्या आधारेच तत्कालीन नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले.भारतीय लोकांच्या दुर्दम्य आशावाद आणि साहसी वृत्तीवर डॉ.कलामांचा अतूट विश्वास होता.त्यांनी बघितलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी देशातील तरुण, विद्यार्थी आणि शिक्षक महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असे ते नेहमी प्रतिपादन करायचे. त्यांनी लिहीलेल्या साहित्यामध्ये आयुष्यावर प्रभाव टाकणार्या व्यक्तींच्या यादीत त्यांच्या शिक्षकाचाही अग्रक्रमाने समावेश होता. इयत्ता ५ व्या वर्गात असताना रामेश्वर येथील शिव सुब्रमन्यम नावाचे शिक्षक होते. त्यांच्या शिकविण्याचा परिणाम म्हणून आपण संशोधन क्षेत्राकडे वळलो असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या स्वप्नातील भारत आणि त्यासाठी त्यांनी रचलेला पाया हे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करायचे असेल तर आपल्याला आपली शिक्षण पद्धतीसुद्धा त्याचा पद्धतीने राबवावी लागेल. त्यादृष्टीने आजच्या शिक्षण पद्धतीकडे तटस्थपणे बघितले असता आपणास असे लक्षात येते की,भारतीय शिक्षण पद्धती ही संक्रमणातून जात आहे. जी शिक्षण पद्धती ही अगोदर फक्त शिक्षक केंद्रीत होती ती आता विद्यार्थी केंद्रीत होत आहे. विद्यार्थीपूरक ज्ञानरचनावाद आपण आता स्वीकारला आहे आणि त्याकडे आपण यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहोत.
डॉ. कलाम यांना अभिप्रेत असलेली शिक्षण पद्धती अजून आपण राबवू शकलेलो आहोत काय ? तर ह्या प्रश्नाचे १०० % उत्तर होय ! असे मी निदान आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत तरी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणू शकतो. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभाग आणि प्रत्यक्ष शिक्षकांनी गेल्या दहा वर्षात अथक प्रयत्न करून डॉ. कलाम यांना अभिप्रेत असलेली शिक्षण व्यवस्था अंमलात आणलेली आहे. ही झेप इतकी उत्तुंग आहे की, संपूर्ण भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगाला महाराष्ट्राच्या मातीतील ह्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दाखल घ्यावी लागली. हयाचेच ताजे उदाहरण म्हणजे सोलापूर येथील जि. प. शाळा परतेवाडी येथील प्राथमिक शिक्षक श्री रंजीतसिंह डिसले गुरुजींना मिळालेला “ ग्लोबल टिचर अवॉर्ड २०२० ”. शिक्षकांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन त्यांच्यातील उपजत कौशल्य जाणून घेऊन त्यादृष्टीने शिक्षणाचा प्रवास हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे.
“ देशातील शिक्षक हेच वर्तमानातील विचारवंत असायला हवेत ” असे डॉ. कलाम नेहमी म्हणत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यानुसार आखलेला अभयासक्रम पूर्ण करत असतानाच शाळाबाह्य मुलांना मुळ शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेली “ बालरक्षक चळवळ ” “ तंत्रस्नेही शिक्षण व शिक्षक चळवळ “ “ डिजिटल शाळा ” “समाजसहभाग चळवळ ” विविध नवोपक्रम व विविध शाळाभेटी यामुळे महाराष्ट्र राज्याने स्वत:ला आधुनिक शिक्षणाची यशस्वी प्रयोगशाळा म्हणून सिद्ध केलेलं आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान हे कलाम सरांचे आवडते विषय. पुस्तकी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर विद्यार्थी अधिक परिणामकारपणे अध्ययन करू शकतो. शाळेतील छोटे छोटे चिमुकले आज विविध डिजिटल साधने अगदी कुशलतेने हाताळत आहेत आणि त्यांचे उपयोग सांगत आहेत हे बघायला आज डॉ. कलाम सर असते तर तेही त्यांच्या स्वप्नातील हे नाविन्यपूर्ण प्रयोग बघून नक्कीच भारावले असते. शाळेच्या वर्गखोलीत संपूर्ण ब्रम्हांड कवेत घेण्याचे सामर्थ्य आज आपण प्राप्त केले आहे. हा प्रवास नक्कीच साधा नव्हता. पण डॉ. कलाम सर नेहमी म्हणायचे “ तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण दुसर्या प्रयोगात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय हा केवळ नशिबाचा भाग होता, असे म्हणायला अनेक जण सज्ज असतात. ” म्हणून हा न थांबणारा प्रवास आपल्याला निरंतर सुरू ठेवावा लागेल हे मात्र नक्कीच.
डॉ. कलाम साहेब शिक्षणाच्या बाबतीत फार आग्रही होते. ते नेहमी योगाचे महत्व सांगत. आध्यात्मिक समाजमूल्यांचा ते नेहमी पुरस्कार करायचे. म्हणूनच आपल्या शिक्षण पद्धतीत आपण आता योग शिक्षण समाविष्ट करून घेत आहोत. येणार्या काळात भारतात नावीन्यपूर्ण शोधांची नितांत गरज आहे.आपला देश संपूर्ण मानव जातीला काय देऊ शकतो ? याचा जर विचार करायचा झाल्यास आपण उभी केलेली मूल्याधारित शिक्षण व्यवस्था एक सशक्त पर्याय म्हणून नक्कीच समोर येऊ शकते. कलाम साहेबांना अभिप्रेत असलेले मूल्यशिक्षण आज प्रत्येक शाळेमधून बाल मनावर रुजविले जात आहे. “ आधुनिक शिक्षण संशोधनात्मक असावे सोबतच ते मूल्यनिष्ठ असावे ” असे कलाम साहेब नेहमी प्रतिपादन करायचे. त्यांचे हे विचार सत्यात उतरविण्याचा संकल्प आपल्या नवीन शिक्षण पद्धहतीने घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देऊन त्यांना नवीन संशोधनाची संधी आता आपण उपलब्ध करून देत आहोत. मी काय करू शकतो ? किंवा मी जगाला काय देऊ शकतो ? ह्या गोष्टीचा विचार न करता आपली नवीन शिक्षण पद्धती आपला वैभवशाली वारसा जगाला देण्यास आणास वाव देत आहे. जो वारसा विश्व सहज स्वीकारू शकेल आणि विश्वाच्या कल्याणाच्या कामी येईल. आपली शिक्षण पद्धती डॉ. कलामांच्या ह्या विचाराला सामोरे नेण्यास आज पुर्णपणे सज्ज आहे आणि नवीन ऊर्जा प्राप्त शिक्षक हे शिवधनुष्य लीलया उचलण्यास पूर्णत: सज्ज आहेत असे माला वाटते.
“ आपले शोध, आपले विज्ञान, आपली साधनसंपत्ती, आपले मूल्य हे सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून येणारे असावे ” हे डॉ. कलाम सरांचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरविण्याची सुवर्णसंधी आपल्या शिक्षक बांधवावर आहे. यासाठी कलाम साहेबांचे आयुष्य कायम आपल्याला प्रेरणा देत राहील. आपण सर्व त्यांच्या आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अखंड प्रयत्न करू. हेच आपले कार्य कलाम साहेबांना खरी वंदना ठरेल यात काहीही शंका नाही.
“ यशासाठी माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच निराशा येणार नाही ”. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.
गणेश तुकारामजी कुबडे
स.अ. उच्च प्राथ. शाळा विखणी,
केंद्र – कांढळी, पं. स. – समुद्रपूर,
जि.प. – वर्धा
संपर्क क्र. 9689248402 ( What’s app )
9284226295
Good post yar,👍👍
ReplyDeleteThank you so much...
Delete