बोधकथा

Saturday, 2 January 2021

NH - 7 ( तो अकरा तासाचा प्रवास )

   ( सदर कथा ही सत्य आहे वा असत्य, तसं काही नसतं, काहीही काय ? इत्यादी शंका उपस्थित करून वाचू नये.जे मी येथे लिहीत आहे तो माझा एक जुना अनुभव आहे...जो मी आजपर्यंत फार क्वचित लोकांना सांगितला आहे.ज्याचं उत्तर मी आजही शोधत आहे.नेमकं काय होतं ते ? ज्याची जखम आजही हनुवटीवर आहे आणि झोप तर कायमची रुसली आहे असंच म्हणावं लागेल..ना ही रहस्यकथा आहे ना भयकथा म्हणून कुठलाही प्रसंग अतिरंजित करून सादर केलेला नाही.)
     साधारणतः 2007 चा पावसाळा असेल कदाचित.नौकरीनिमित्य यवतमाळ जिल्ह्यातील करंजी ( रोड )  येथे राहणे होते.तेथून कार्यालय 25 कि.मी.दूर. नागपूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग 7 आणि चंद्रपूर - अमरावती राज्य महामार्गाच्या जंक्शन पॉइंटवर वसलेलं करंजी हे एक गांव भारताच्या नकाशात सहज बघता येतं..त्यावेळी माझ्याजवळ  TVS Max 100 ही दुचाकी होती.माझी आवडती गाडी होती ती.चालवायला मजा यायची.दर महिन्यात एकदा किंवा दोनदा नागपूर येणे व्हायचे कधी बसने तर जास्तीत जास्त दुचाकीने.छान प्रवास व्हायचा...नागपूर ते करंजी अंतर 135 कि.मी.मला गाडी वेगाने चालवायला आवडत नाही म्हणून साधारण साडे तीन लागायचे यायला..येताना जाताना रस्तावरील त्या त्या बाजूचे हॉटेल पण ठरलेले असायचे चहा घेण्याकरिता.
       नौकरीनिमित्य 2003 लाच नागपूर सोडलं होतं.एकटं राहणं, स्वतः स्वयंपाक करणं, जंगलात नौकरी तेही आदिवासी भागात त्यामुळे आता कसली भिती वगैरे मनात नसायची..माझी तशी खोली पण गावाबाहेर होती.रात्री लोकं घाबरायची तिकडे यायला..पण त्याचं मला काहीच वाटायचं नाही.बिनधास्त जगण्याची सवय झाली होती. दुचाकी चालविण्याचा अनुभव म्हणाल तर आतापर्यंत जवळपास पाऊणे दोन लाख कि.मी. अंतर पार केलेले आहे..रात्री अपरात्री प्रवास केला पण असा अनुभव फक्त एकदाच आला आणि आयुष्यभरासाठी पुरून उरला..
      एकदा घरी नागपूरला दुचाकीने येणं झालं.छान चार पाच दिवस मुक्काम केला..सर्व भेटीगाठी वगैरे पार पडल्या.गावाकडे परत जायचा दिवस उगवला...जायची इच्छा नव्हती पण जावं लागणार होतं.आई वडीलांना नमस्कार करून घरून दुचाकीने निघालो.पण मन तयार नव्हतं.क्रिकेटच्या दोन बॅट दुचाकीच्या डाव्या बाजूला.कपडे व इतर साहित्य असलेली एक बॅग गाडीवर बांधली सोबत डोक्यावर हेल्मेट आणि साधारण दुपारी एक वाजता घरून निघालो..मेडिकल चौकात येताच अजनी चौकाकडे न जाता त्या संपूर्ण चौकाला एक फेरा मारला आणि दुचाकी माघारी घरी परत वळवली.क्षणात परत विचार बदलला आणि दुचाकी अजनी चौक मार्गे आपल्या मार्गी लावली...पण तो दिवस काहीतरी वेगळं घेऊनच येणार होता... 
     नागपूर - बुटीबोरी - जाम यायला तीन साडेतीन वाजले...चहा प्यायला म्हणून जाम चौरस्त्यावर म्हणजे हैद्राबाद मार्गावर ( NH 7 ) डाव्या बाजूला एक छोट्या हॉटेलवर थांबलो, रस्त्यावरच खुर्च्या होत्या एक चहा मागवला..मी एकटा आपल्या विचारात चहा पित होतो..तेवढयात चंद्रपूर मार्गावरून एक बुलेट गाडी माझ्या बाजूला येऊन थांबली..मी काही तेवढं लक्ष दिलं नाही अगोदर.माझ्या समोरच बसले ते दोघे...माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे.नवविवाहित होते ते दोघे कारण त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहत होता...दोघेही बघायला सुंदर आणि त्यांच्या हातावर मेहंदी पण होती...त्याचं पांढरं शर्ट आणि तिची ती पिवळी साडी( माणसांना फक्त साडीतले लाल,पिवळे,निळे, हिरवे गुलाबी,इ. रंग समजतात बाकी ते रंगछटा वगैरे आमच्या डोक्यावरून जातात ) इतकं बघितलं  आणि मी आपला बसलो होतो...त्या दोघांपैकी त्या माणसाने मला गूढ हास्य करत प्रश्न केला ,“ दादा कुठे जात आहात ? ” मी त्याला गाव वगैरे सांगून मोकळा झालो..व सहज विचारले “ आपण कुठे जात आहात ” तेवढ्यात ती नववधु बोलली “ नागपूर ” मी फक्त स्मित केलं. त्यांनी त्यांचे पैसे दिले आणि नागपूरच्या दिशेने  त्याचा प्रवास सुरु केला.साधारण दोनशे मीटर मी त्या दोघांकडे बघत होतो...मी परत चहा मागविला आणि आरामात बसलो..आकाशात काळे ढग दाटून आले होते..पाऊस नव्हता.पण मी कुठल्यातरी विचारात होतो . मला वेळेचं काहीच भान नव्हतं.शेवटी तो दुकानदार माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “ भाऊ कुठं जाणार आहात..कुणी येत आहे काय ? कुणाची वाट बघत आहात ? ” मी दचकलोच ! म्हटलं,  “कुणाचीच नाही, मी करंजी जात आहे ” तो दुकानदार म्हणाला “ साडे तीन तास झालेत तुम्ही येथे एकटे बसून आहात ” मी भांबावलो !  ( त्यावेळी अँड्रॉईड फोन नव्हता.त्यामुळे त्यात गुंग झालो असंही नव्हतं ) चक्क साडे तीन तास तेही एकाच ठिकाणी....सायंकाळचे पाऊने सात होत आले होते...
       मी लगबगीने माझी दुचाकी काढली.हलका मध्यम पाऊस सुरू झाला त्यामुळे रेनकोट चढविला..आणि समोरचा प्रवास सुरु केला.हिंगणघाट मार्गे वडनेर.पाऊस थांबला होता पण नेमकं माझं मला काही कळत नव्हतं.प्रवास एकदम आरामात सुरू होता.साडे आठ वाजले वडनेर यायला..पाऊस नसल्यामुळे रेनकोट काढला. भूक पण लागली होती..पण तेथे असं रात्रीचं काही विशेष मिळत नव्हतं...म्हटलं चहा घ्यावा.बसलो एका टपरीवर...आता मात्र मला घाई करावी लागणार होती समोरच्या प्रवासाची.मी पैसे दिले आणि निघणार तोच मागून माझ्या कानावर आवाज आला. “ दादा कुठे जात आहात ? ” मी वळून बघितलं आणि सांगितलं आपलं तेच करंजी इ. वडनेरवरून निघालो आणि दहा कि.मी.अंतरावर पोहणा हे गाव लागलं.माझा प्रवास सुरुच होता.अचानक डोक्यात लक्ख वीज कडाडली.वडनेरला ती गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. पण ती “ दादा कुठे जात आहात ? ” असं विचारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नव्हती तर तेच जाम चौरस्त्यावर भेटलेले जोडपं होतं.सोबत बुलेट गाडी.ती त्याच्या मागून स्मित करत उभी होती..आता मी चक्रावलो..वडकी येथे कसाबसा पोहोचलो.आता माझं करंजी गाव होतं ते फक्त वीस कि.मी. रात्रीचे पाऊणे दहा वाजले होते..सर्व परिसर बंद होता फक्त काही हॉटेल सुरू होती.
    मी तेथेच थांबलो आणि विचार केला की, नेमकं हे सुरू काय आहे ? थोडं पाणी पिलं आणि गाडी सुरू करणार तोच एका बंद दुकानामागे थोड्याश्या प्रकाशात मला फक्त एक पिवळा पदर झळकला.आता मात्र मी गोंधळलो.कुणाला काय सांगावे तेच सुचेना.मागे परत फिरावं म्हटलं तर चाळीस कि.मी.हिंगणघाट येण्याशिवाय पर्याय नव्हता कारण तेथे रात्री मुक्कामाची सोय होती आणि करंजी फक्त वीस कि.मी.अंतरावर होतं.साधं कुणाला फोन करण्याचं भान सुद्धा राहिलं नव्हतं.पण माझ्यातील बेदरकार वृत्ती मला समोर जा म्हणून सुचवीत होती.मी गाडी काढली आणि पाऊस लागला.रेनकोट न घालता आता मी प्रवास सुरु केला...थोडा समोर गेलो आणि परत त्याच वडकीला आलो.हॉटेलचा मुलगा मला बघून परत गोंधळला, की आताच हे गेले आणि परत कसे आले म्हणून...? मी काहीच नाही बोललो...आता पर्याय नव्हता...मी घाबरलो होतो असंही नाही म्हणता येणार..मी परत पावसात गाडी काढली..थोडं समोर गेलं की,एक लहानसा ( कुख्यात ) घाट लागायचा.आता चौपदरीकरण झाल्यामुळे तो घाट तेवढा कठीण नाही राहिला.तेव्हा लहान रस्ता होता...
   मी एका ट्रकच्या मागे माझी गाडी चालवत होतो.पण घाटाच्या सुरुवातीला त्याचा वेग अतिशय संथ झाला होता.त्यामुळे मग मी माझी दुचाकी समोर नेली..घाट ओलांडला.आता थोडा जीवात जीव आला होता कारण करंजी आता जवळच होतं..रात्रीचे बारा वाजायला आले होते बहुतेक.आता करंजी गाव आलंच होतं...अंतर फक्त एक कि.मी.असेल बहुतेक...थोड्याच वेळात माझ्या गाडीच्या प्रकाशात मला ती बुलेट गाडी परत दिसली आणि त्या महिलेने आडवं होत मला हात दाखविला...मी कसाबसा सावरून तिला वाचवून गाडी समोर काढली तोच पाठीमागून मला एक जोरदार धक्का बसला.माझी दुचाकी सरळ 90 ° कोनात समोरच्या चाकावर उभी झाली.माझं हेल्मेट डोक्यातून निघालं आणि मी सरळ त्या रस्त्यावर आदळलो....हनुवटीला गिट्टीचा मार बसला...दुचाकीचा समोरचा लाईट,इंडिकेटर,आणि लेग गार्ड अक्षरशः चेंदामेंदा झाले होते.मी तसाच निपचित पडून होतो.दोन मिनिटाने उठलो बहुतेक हनुवटीत गिट्टी फसली होती ती काढली आणि रक्ताची धार लागली...पायाला आणि हाताला जबर मार बसला होता.एक बॅट तुटली.मला सगळं आठवलं मागे वळून बघितलं तर दूर एक बुलेट विरुद्ध दिशेने परत जात होती...( हे मी त्या निरव शांततेत आवाजवरून ओळखलं..) नेमकं त्यावेळी रस्त्याने एकही वाहन नव्हतं.गावात जावं म्हटलं तर सगळीकडे सामसूम दिसत होतं दुरूनच.सर्व हिम्मत एकवटत मी घाईत चाचपडत हेल्मेट उचललं आणि जवळच निर्जन ठिकाणी MSEB ऑफिस होतं तिकडे गाडी वळवली अंधारातच कारण लाईट फुटला होता..तेथे रात्री फक्त एक कर्मचारी असायचा.त्यांचा माझा परिचय होता. कार्यालयातील लाईट सुरू होता.मी दारात गेलो आवाज दिला...पण त्यांनी माझा आवाज ओळ्खलाच नाही..परत दार ठोकलं जोरदार . त्यांनी बाहेरचा लाईट लावला . दार उघडलं आणि मला बघताच त्याला प्रचंड घाम फुटला.  मला जोरदार धक्का मारत तो कर्मचारी बाहेर पळाला.मला वाटलं माझं रक्ताने माखलेला शर्ट बघून ते घाबरले असतील..खूप दूर उभा होता तो कर्मचारी.त्या निर्जन परिसरात आता फक्त आम्हीच दोघे होतो..त्यात मी जखमी...मी त्यांना थोडक्यात सांगितलं...त्यांनी मला घाबरतच कार्यालयातील आरसा बघण्याचा सल्ला दिला..त्या कार्यालयात एक मोठा आरसा होता मी एकटाच कसाबसा त्या आरश्यासमोर उभा राहिलो...आणि प्रचंड घाबरलो कारण माझ्या दोन्ही डोळे आगीसारखे लाल भडक झाले होते...फक्त लाल...त्या कर्मचाऱ्याला मग मी गावातील मित्राचा फोन नंबर सांगितला त्यांनीच फोन केला...चार पाच मित्र आलेत आणि कारमधून मला गावातीलच एका डॉक्टरकडे नेलं...माझे ते डोळे बघून ते मित्र आणि डॉक्टर सगळे प्रचंड घाबरले होते....
        ह्या सर्व प्रकारानंतर जवळजवळ एक आठवडा मी अखंड जागा होतो.इकडे घरी कुणालाच काही सांगितलं नाही... नंतर खूप काही बदललं.काही लोकं दुरावलेत..ती जखम आजही तशीच आहे....झोप कायमची माझ्यावर रुसली आहे...ज्या प्रवासाला साडे तीन तास लागायचे तो अकरा तासाचा प्रवास घडला. हे मी आज तेरा वर्षांनी लिहीत आहे त्यामागेही काहीतरी कारण आहे अज्ञात ; जे शब्दात नाही सांगता येणार...मला आजही तो प्रसंग आठवला की,प्रश्न पडतो की नेमकं काय कारण होतं तसं घडायला...? काय हवं होतं त्यांना ? कधी न घाबरणारा मी तेव्हा मात्र स्वतःला सावरताना त्रास झाला... ते सुंदर जोडपं मला आजही दिसतं अधून मधून...मी पण त्यांचा शोध घेत आहे...आज ते झोपताना परत दिसलं...म्हणून रात्री बारा ते आता साडे चार वाजता पर्यंत लिहितच आहे...कदाचित न संपणारं जागरण आयुष्यभराचं ????
 
- गणेश

No comments:

Post a Comment