बोधकथा

Tuesday 16 July 2024

हिंदू धर्माची व्याप्ती

                    हिंदू धर्माची व्याप्ती


   “ हिंदू धर्म म्हणजे पवित्रतेचा अनुभव ” वास्तविक पाहता जो धर्म माणसाहून श्रेष्ठ शक्ती असलेल्या श्रेष्ठ जीवांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो तो बहुधा त्या सर्व सजीव सृष्टीला पवित्र मानतो आणि आदरभाव जपतो असा आदी अनादी धर्म म्हणजे हिंदू धर्म. ईश्वर, देवता, मानवाहून श्रेष्ठ जीव, इत्यादी अनुभवातीत व पवित्र मानलेल्या गोष्टींच्या सान्निध्यात प्रतिक्रियारूपी जी श्रद्धांची व आचरण नियमाची प्रणाली उत्पन्न होते त्या जीवन पद्धतीलाच आपल्या आंतरिक अनुभवाशी जोडून आपले आचरण समस्त सृष्टीला हितकारक कसे असावे याचे मार्गदर्शन हिंदू धर्म निरंतर करत असतो. आज अति प्रगत मानवी समाज बिग बँग सारखे प्रयोग करून ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधत असताना त्यालाच समांतर  असा प्रश्न पडतो की, संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या कवेत घेणाऱ्या जगातील सर्वात प्राचीन आणि चिरंजीवी अश्या हिंदू धर्माचा उगम कधी आणि केव्हा झाला. हिंदू धर्माची सुरुवात कधी आणि कशी झाली याचा काहीही पुरावा सापडत नाही.मानवी उत्क्रांतीसोबतच वाढत आलेला सनातन हिंदू धर्म आजही    वसू धैव कुटुंबकम ची शिकवण देतो.

        सुखार्थं सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।

     सुखं नास्ति विना धर्मं तस्मात् धर्मपरो भव ॥

         पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखाची लालसा असते परंतु धर्माचनाशिवाय सुख नाही म्हणून मानवाने धर्मपरायन बनावे असे हिंदू धर्म सांगतो. ह्या सुखप्राप्तीसाठी ( ऐहिक ) हिंदू धर्म थोडक्यात दोन सार सांगतो अ ) जगात एक सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी, अनादी, अनंत अंततः एकाच सत्य ( सत्व ) आहे. वैयक्तिक सत्व हा केवळ त्या सर्वव्यापी सत्वाचा एक अंश आहे आणि ह्या सर्वव्यापी सत्वाची जाणीव प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. ब ) आत्मप्राप्ती, सर्वव्यापी तत्वांशी एकरूपता आणि त्या दैवी तत्वांशी संबद्ध होणे किंवा मोक्ष हेच जीवन साधनेचे उद्दिष्ट्य आहे आणि यातच जीविताचे व संपूर्ण मानव समाजाचे सार्थक आहे. फक्त एका विशिष्ट असा समुदाय डोळ्यापुढे न ठेवता पृथ्वीवरील सर्व सजीव व अखिल मानव समाजाला आदर्श जीवन जगण्याची संकल्पना हिंदू धर्म आपल्यापुढे अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगत आहे. हिंदू धर्म कर्मप्राधान्य धर्म आहे. जीवनाच्या विविध टप्प्यात आपले कर्मप्राधान्य कोणते असावे याचे आदर्श विवेचन भगवान श्रीकृष्णांने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवदगीतेमध्ये सांगितलेले आहे म्हणूनच भगवदगीता संपूर्ण हिंदू आणि मानवी समाजाला मार्गदर्शक असा पवित्र ग्रंथ मानला जातो.

        आज संपूर्ण  जगात सर्वत्र हिंसेने थैमान घातले असताना हिंदुबहुल भारत देशात सर्व धर्मीय भारतीय मात्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत यातच हिंदू धर्माची खरी व्याप्ती दिसून येते. आ सेतू हिमालय पसरलेल्या या देशात सनातन असा हिंदू धर्म अस्तित्वात असताना देखील  ह्याच मातीत दोन नवीन धर्माने आपले अंकुर रोवले आणि जगाला परत एकदा अहिंसेच्या पुनरोच्चार व विश्व बंधुतेचा मार्ग दाखविला. त्यापैकी एक म्हणजे बौद्ध धर्म आणि दुसरा म्हणजे जैन धर्म. हिंदू धर्माची व्याप्ती इतकी मोठी की, या दोन धर्माला व त्यांचे पालन करणाऱ्या धर्मियांना आपले शत्रु न मानता ह्या देशात त्यांना धर्म परंपरा पालन करण्याची मोकळीक दिली...कारण सर्वच धर्म अखिल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग सांगतात..असे हिंदू धर्म मानतो. आपल्या धर्माचा अर्थ कसा काढायचा हे मात्र त्या त्या धर्मीय बांधवावर अवलंबून आहे. जगात सर्व धर्मात आस्तिक ही संकल्पना अस्तित्वात आहे म्हणजे त्या त्या धर्माने सांगितलेल्या मार्गावर तुम्हाला चालावेच लागते. हिंदू धर्माची व्यापकता मात्र इतकी मोठी आहे की, एखादा व्यक्ती नास्तिक असेल तर त्यालासुद्धा हिंदू धर्म सामावून घेतो.

                   तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘हिंदू धर्म हा बहुरूपी आणि परस्परविरोधी प्रवृत्तींचे संमिश्रण होऊन बनलेला आहे. या धर्माच्या दोन बाजू आहेत. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती किंवा समाज-रचनेचे विशिष्ट कायदे ही याची सर्वांत प्रमुख अशी बाजू आहे आणि परस्परविरोधी अनेक पारमार्थिक संप्रदाय ही त्याची दुसरी प्रमुख बाजू होय.’ तसेच ‘हिंदू धर्म ही विविध सामाजिक आचारविचारांची एक गठडी किंवा एक संग्रह आहे आणि विसदृश आध्यात्मिक व पारलौकिक विविध कल्पनांचाही त्यात भरणा आहे.’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणतात, ‘अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, बहुविध धर्मद्रष्टे यांचा त्यात संग्रह आहे. हा धर्म व्यक्तिनिष्ठ नाही हा विशिष्ट पंथाचा आग्रह धरीत नाही हा धर्म अधिकारभेदाने सगळे धर्म संग्राह्य आहेत, असे मानतो… अनेक प्रकारचे पारमार्थिक उन्नतीचे पंथ यांच्यामुळे हिंदू धर्म परमतसहिष्णू झाला आहे.’ ‘वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य दैवत कोणते असावे यांविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदू धर्माचे लक्षण होय. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हे तत्त्व स्वीकारून पारंपर्यागत व श्रुतिस्मृति-पुराण-प्रतिपादित विधिसंस्कार किंवा आचार पाळणारा तो हिंदू होय’, असे लोकमान्य टिळक म्हणतात. इह व पर किंवा प्रपंच व परमार्थ साधण्याचा मार्ग हेच हिंदू धर्माचे स्वरूप होय. परधर्माविषयी सहिष्णुता हे हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तो सत्य, अहिंसा, दया, प्रेम इ. सद्गुणांवर आधारलेला आहे. 

         समस्त जगाचे कल्याण व्हावे तसेच संपूर्ण मानव जातीवर विशेष संस्कार व्हावे यासाठी हिंदू धर्माने वैज्ञानिक कसोटीवर खरे असे सोळा संस्कार मानवाला सांगितले आहेत. हे सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत  गर्भाधान ,पुंसवन,अनवलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण,सूर्यावलोकन,निष्क्रमण,अन्नप्राशन,वर्धापन, चुडाकर्म,अक्षरारंभ,उपनयन,समावर्तन, विवाह,अंत्येष्टी..

        जगाला ज्ञान देणारे चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराण तसेच रामायण, महाभारत आणि संपूर्ण जगाला आपले विराट दर्शन घडविणारी भगवद्गीता ही हिंदू धर्माने संपूर्ण मानवजातीला दिलेला अमूल्य असा ठेवा आहे. वेद,भगवद्गीता हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्ममय नाही ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा, कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन करणारा महान ठेवा आहे. ७ नोव्हेंबर २००३ रोजी युनेस्कोने वेदांना ‘मौखिक’ म्हणजेच ‘अमूर्त अशी वाडवडिलोपार्जित मालमत्ता’, म्हणून घोषित केले आहे.संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच ही गोष्ट आहे. म्हणून वेदांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.परंतु, हे केवळ ज्ञानाचे वैभव अथवा ठेवा म्हणून जपून न ठेवता लोककल्याणासाठी त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा.समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. जसे सज्जन असतात; तसे दुर्जनही असतात. सज्जनांमुळे समाज सुधारतो. समाजाला सन्मार्ग सापडतो. सज्जन समाजाच्या हितासाठी झटत असतो; पण दुर्जनाचा समाजाला त्रास होत असतो. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याच्या सुखात विघ्न निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो. अशा विघ्नसंतुष्ट लोकांच्या ठायी, दुष्ट, दुर्जनांच्या ठायी सद्विचार यावा, त्यांचे दुष्ट विचार गळून पडावेत अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे करतात.

           यत्र नार्यस्तु पूज्यंते, तत्र रमन्ते देवताः
              अर्थात जेथे नारी शक्तीची पूजा केली जाते तेथे देव देवतांचे वास्तव्य असते.आदी अनादी काळापासून हिंदू धर्मात स्त्रीला महत्वाचे आणि पूज्य असे स्थान हिंदू धर्मात आहे.म्हणूनच आजही हिंदू कुटुंबात स्त्रियांना मानाचे स्थान आहे. स्त्रियांचा शक्ती म्हणून पूजा करणारा हिंदू धर्म जगाला आजही मार्गदर्शक आहे. अगदी प्राचीन काळात सुद्धा स्त्रीला स्वयंपूर्ण आणि शक्तिशाली दर्शविण्यात आलेले आहे. पण काही स्वार्थी अहंकारी मंडळींनी आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून स्त्रियांना दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केला. हळूहळू याविरुद्ध आवाज उठविला गेला चळवळी झाल्यात आणि आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. हिंदू धर्म हा नवीन बदलानांही सामावून घेणारा असा सर्वसमावेशक धर्म आहे ज्यात कट्टरतेला थारा नाही. सकारात्मक बदलांकडे मार्गक्रमण करत मोक्ष प्राप्तीचा संदेश देणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. कुणाचाही व्यक्तिगत हक्कावर गदा न आणता स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धर्म म्हणून एकविसाव्या शतकातही इतर देशातील लोक शांततेच्या शोधात हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत.
        कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
        मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
              सर्व प्राणीमात्र आणि मानवजातीला भगवद् गीतेद्वारे  वैश्विक तत्वज्ञान सांगणारे भगवान कृष्ण. मनुष्याने कर्तव्यपरायन कसे असावे ह्याचे मार्गदर्शन केले आहे.  वेद उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानसा घागरीत सामावून घेतलेला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. ‘गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते. पांडुरंगशास्त्री सांगतात की, निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त, गीता हृदयाशी धरून फासावर चढले, याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ, शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे...
      विश्वकल्याण आणि विश्वबंधुतेची कामना करणारा हिंदू धर्म समस्त सजीव आणि निर्जीव सृष्टीचा पाया आहे. थोडक्यात हिंदू धर्म सर्वव्यापी आहे...





 - गणेश 

No comments:

Post a Comment