बोधकथा

Saturday 1 August 2020

नात्याचं ऑडिट ...

       बालपणापासून ते अगदी वार्ध्यक्यापर्यंतचा  आपला प्रवास ; म्हटलं तर खूप लांबलचक खाच खळग्यांनी भरलेला किंवा अगदीच क्षणभंगुर.कधी कधी आनंदाची झालर.अतृप्त इच्छांची शिदोरी तर कधी सुखावलेले ते क्षण.ह्या साऱ्या प्रवासात आपण कधी एकटे असतो तर कधी आपले आप्तस्वकीय अथवा मित्र मैत्रिणी.ह्या सर्वांना सोबत घेऊनच आपण आपल्या सुख दुःखाना सामोरे जात असतो.कदाचित एखाद्याची सोबत असली तर आपल्यालाही धीर मिळतो.मग आपणही आपल्या  मित्र म्हणा अथवा मैत्रीण म्हणा त्याला तिला गृहीत धरू लागतो.प्रत्येकवेळी तो किंवा ती आपल्यासाठी हजर असला पाहिजे अशी आपली समजूत होऊन जाते.बघता बघता आयुष्याचा आपण अश्या टप्प्यावर येऊन थांबता जेथे रोज भेटणारे आपले सवंगडी नजरे आड झालेले असतात.त्यात परत नवीन लोकं जुळली जातात.जुन्या जाणत्या आपल्या सवंगड्यांना आता भेटण्यासाठी वेळ मागावी लागते.असं भरपूर काही घडतं.पण ती ओढ मात्र कायम राहते.
        एखाद्याला त्याच्या गुण दोषासह स्वीकारणे म्हणजे खरी मैत्री असं मला वाटतं.मी म्हणतो म्हणून तु असा वाग किंवा मी म्हणतो म्हणून तु असं जीवन जग याची जेथे सुरुवात होते ते नातं लादलेलं असतं.जगात खरं नातं असतं ते मैत्रीचं.कुठलीही अपेक्षा न बाळगता व्यक्त होणारं आणि दोन्हीकडून शेवटपर्यंत निभावून नेण्याची तयारी असलेलं.पण कधी कधी एक वेळ अशी येते (येथे फक्त मित्र अथवा मैत्रीण अपेक्षित नाही) की, एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं त्याच्यासाठी खरंच इतकं महत्वाचं असतं का जितकं आपण समजत होतो.की निव्वळ ती काळाची गरज होती.आपलं प्रेम, आपुलकी,आपण त्याला किंवा त्याने आपल्याला दिलेला आधार हा क्षणिक होता की चिरकाल टिकणारा ह्याविषयी पण शंका यायला लागते.आपण त्याला अथवा तिला स्वीकारलं म्हणजे नेमकं काय ? किंवा ते फक्त काळाची गरज म्हणून निर्माण झालेलं नातं होतं ह्याविषयी चिंतन करणे गरजेचं आहे.जेव्हा नात्यात तिकडून अथवा आपल्याकडून एकतर्फी गोष्टी व्हायला लागतात तेव्हा त्या नात्याला तपासून बघावं एकदा तरी.नात्याचं पण ऑडिट व्हायलाच हवं.
      एखाद्याच्या आयुष्यात आपण खूप महत्वाचे आहोत हा भ्रम शेवटी आपल्याला निराशेकडे घेऊन जाणारा असतो.आपल्यासारखे भरपूर असतात तिकडे जिवलग, विश्वासू,काळजी घेणारे वगैरे. तुम्ही स्वतःचा भ्रम करून घेतला याला समोरचा तरी काय करणार.एखाद्या विशिष्ट कालावधीत तुम्ही एखाद्याच्या संपर्कात आला असाल आणि तुमचं जर छान ट्युनिंग जमलं असेल तर याचा अर्थ असा नाही की, आयुष्यभर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजविण्यास मोकळे आहात.आपली गल्लत कुठे होते माहिती आहे.समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली भूमिका काय आणि कितपत असावी ह्याचा आपण अंदाजच घेत नाही....नंतर हळूहळू आपला भ्रमनिरास व्हायला लागतो. आजकाल सगळं Online झालं असल्यामुळे असेल कदाचित जिव्हाळा कमी आणि फक्त औपचारिकता म्हणून सारे सोपस्कार पार पाडले जातात....कधी एखाद्याशी आपण खूप बोलतो,खूप सांगतो समोरचा व्यक्ती पण खूप आतुरतेने आपली वाट बघतो...काही काळ हे सगळं छान वाटतं..पण समोरून जर सतत Hmm, Ok असे हुतुपुरस्सर reply यायला लागले  की, तेथेच सावध व्हा,स्वतःला तपासा. आपली खरी गल्लत होते ती येथे आपलं मन आपल्याला सांगत असतं पण आपल्याला स्वतःला समजून घ्यायला वेळ नसतो त्याक्षणी...
    वेळ पाहून वेळ देणारे आयुष्यात भरपूर भेटतील, पण वेळ नसतानाही इतरांकरीता वेळ काढणारे मजकेच असतात... आणि शेवटी अशाच लोकांच्या आयुष्यात तिरस्कार आणि अवहेलना येते. नीट एकदा तपासा नातं दोन्हीकडून तोलामोलाचं आहे की,तुम्हीच त्यात आपला मान सन्मान गमावून हरखून गेला आहात.तुमच्या असण्याने किंवा नसण्याने दोघांनाही सारखाच त्रास होणार आहे काय ? की तुम्ही त्याच्यासाठी एक टाईमपास आहात.कारण ज्याला तुमची गरजच नाही ते नातं टिकविण्यासाठी आपण आपल्या जवळच्या लोकांना नकळत दुखावत असतो..समोरचा व्यक्ती आपल्याशिवाय छान जगत असेल तर आपण आपल्या जागीच थांबलेलं बरं कारण अश्या ठिकाणी आपल्याला कायमची निराशा हाती लागते.वेळ निघून गेल्यावर मागे वळून बघतो म्हटलं तर आपली सावलीही आपला साथ सोडून गेलेली असते...
     म्हणून लवकर जागे व्हा आणि नात्याचं ऑडिट करा.तुमचं आणि समोरच्या व्यक्तीच्या नात्याचं खाते तपासून बघा....आपले दोष आपण शोधलेले कधीही फायद्याचं...


गणेश



No comments:

Post a Comment