बोधकथा

Saturday 19 October 2019

एक पत्र.... आठवणींना..

         हल्ली भेट नाही होत आहे गं आपली. तशी तेव्हा ही नव्हती होत म्हणा.... वीस वर्षांपूर्वी कॉलेजला एका वर्गात बसायचो किंवा चुकून बोलायचो तीच आपली भेट होती...किती त्या आठवणी..। नंतर आपल्या वाटा बदलल्या...तेव्हा आपल्याजवळ मोबाईल नव्हता ना ! असता तर किती बरं झालं असतं.रोज msg करता आला असता.तुला त्रास देता आला असता, रोज तुला बघता आला असतं..पण बर झालं नव्हता तो मोबाईल ; नाहीतर तुझ्या आठवणी मनात कश्या जपता आल्या असत्या...आता तर आठवणी पण एका क्लिक वर गायब होतात. जग किती बदललंय ना ? तेव्हा सायकलने एखाद्याच्या घरी गेलो तरी मित्र भेटायचा...आता म्हणे जग जवळ आलंय ?? जग हे एक खेडं झालंय पण येथे सगळेच अनोळखी झाले आहेत...आता कुणीच भेटत नाहीत. अगदी भेटायचं ठरवलं तरी भेट नाही होत..
         आता रोजच तू कॉलेजच्या ग्रुपवर दिसतेस अप्रत्यक्ष बोलतेस.किती बदल झाला आहे आता.सगळं कसं बदललं आहे ना..तू आणि मी पण. तुझ्या सतत बदलणाऱ्या dp वरून हळू हळू उलगडत चाललीयस तू  आणि अगदी तुझं वागणं सुद्धा. आता किती बोलकी दिसतेस ना तु ; पण तुझे डोळे मात्र अजूनही अबोल दिसतात हं कदाचित त्यांना व्यक्त व्हायचंही असेल पण तू शिताफीने टाळतेस ते आता. 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि त्यात तुझं सौंदर्य... पण एक सांगू किती केविलवाणी दिसतेस गं तू....भूतकाळ आपला पाठलाग सोडत नाही आहे आणि तुला भविष्याचा वेध घ्यायचा आहे त्या मधला तुझा हा dp. इतक्या वर्षात काय घडलंय काय बिघडलंय काही कळायला मार्ग नाही...आणि  मनातले भाव पण तू कधी चेहऱ्यावर आणत नाहीस....मी कशी  मजेत आहे हेच सांगायचं आहे ना तुला...आता हे ही कसब अवगत केलंस वाटते...म्हणूनच मला नेहमी वाटायचं चित्रपटात काम करावं तू.
        तू मला भेटावं असंही म्हणणं नाही माझं...साधं बोलणंही होत नाही आपलं....याचा अर्थ आपल्यातील संवाद तुटला असही नाही...आपलं नातं तुटलं म्हणावं तर तेही शक्य नाही...तुझ्यात बदल झाला असंही नाही आणि जग जसं मला आधी म्हणायचे मी अजूनही तसाच आहे.....आजकाल तर online image building होत असते पण तिथेही मी कमीच पडलो..नाही जमत मला हे सगळं...म्हणूनच कदाचित....आपल्यातील संवाद संपलाय...बस्स आपण  थोडं आपल्या जगण्यात बदल केलाय. का तू स्वतःला अस बंदिस्त करून घेतलंय...तू स्वतःला जगापासून अलिप्त ठेऊ शकतेस पण  स्वतःला स्वतःपासून अलिप्त ठेवणं जमेल काय तुला ??
       तुझं बोलणं हसणं अगदी खळखळून वाहणाऱ्या झऱ्यासारखं होतं. तुझं असं साचलेलं मला आवडेल काय? मनातील भावनांना वाट मोकळी करून दे ना एकदा. तुझं हे तुझ्या स्वभावाविरुद्ध भावनांना बांध घातलेला नाही आवडत मला.एकदा बोलून तर बघ..बर वाटेल तुला आणि मला पण...वाहणाऱ्या झऱ्याचं असं अचानक थांबणं आणि त्याचं असं साचलेपण बेचैन करत आहे मला. नेमक झालंय काय हे विचारायचं म्हटलं तर तेही कठीण...संवादाचे सारे मार्ग आडवळणाचे झालेत...की तु हेतुपुरसर सर्व मार्ग बंद केलेस कळायला मार्ग नाही...
       मला वाटतं हे सगळं अगदी ठरवून करते आहेस तू ...अगं किती दिवस शांत राहशील आणि किती मनातल्या गोष्टींना अशी समाधी देणार आहेस...आणि हो आठवणी तर राहतील ना कायमच्या मनात कोरलेल्या...आणि हे सर्व करताना त्रास नाही का होणार तुला....?ह्या जाणीवेनेच काळजी वाटतेय मला तुझी...पण असो तुला आता आधार आहे आणि तू पण  आता खंबीर झाली आहेस....काळानुरूप .पण तू दिसतेस म्हणून बरं वाटतं...अशीच दिसत रहा.माझे डोळे मिटेपर्यंत....आणखी मागण्यासारखं काहीच नाही आता....
                         तोच तुझा.....

© गणेश

Monday 5 August 2019

ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होताना ( कलम 370 )

         आजचा दिवस खरंच प्रचंड ऐतिहासिक म्हणावा लागेल.मागील आठवड्यात घडलेला घटनाक्रम बघितला तर सर्वांनाच याचा अंदाज लागला होता...अमरनाथ यात्रा रद्द करणे, कश्मीर मध्ये तैनात केलेली अतिरिक्त सुरक्षाबले, पर्यटकांना तात्काळ हॉटेल्स रिकामे करण्याचे दिलेले आदेश हे सारेच काहीतरी सुचवत होते आणि झालेही तसेच. आज अत्यंत वादग्रस्त कलम 370 काश्मीरमधून हटविण्यात आले. सोबतच कलम 35 A सुद्धा संपुष्टात आले. आज संसदेत देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांचे भाषण किंवा त्यांनी मांडलेला मसुदा अगदी कान लावून ऐकण्यासारखा होता. ( विरोधक नेहमीप्रमाणे या निर्णयाला विरोध करत होते.आपल्याला दुसऱ्यांदा जनतेने विरोधी पक्षातच का बसविले ; याचे यांना अजूनही भान आलेले नाही. ) आपण इतिहासाचे साक्षीदार झालोत ही गोष्ट मनाला सुखावून गेली. अमितभाईंचा एक अंदाज आज मला खूप आवडला. ते संसदेत कुणाला विचारायला उभे राहत नाहीत तर घेतलेले निर्णय खंबीरपणे सांगायला उभे राहतात ; एव्हाना त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली असते. त्यामुळे विरोधक पार हतबल झालेले असतात, आणि नौटंकीबाज पुरोगाम्यांकडे तोंड लपविण्याशिवाय काही पर्याय राहत नाही..आता काश्मीर संवैधानिक अर्थाने भारताचे अविभाज्य अंग बनलेलं आहे... आधीही होतंच पण त्यांची घटना, त्यांचा ध्वज, त्यांना दुहेरी नागरिकत्व इ. खूप सुविधा होत्या. आज ते सर्व संपुष्टात येऊन आता तेथे आपला राष्ट्रध्वज डौलात फडकणार. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अखंड भारताच्या दिशेने पडलेलं हे नुकतंच पहिलं पाऊल आहे...अजून पाकव्याप्त काश्मीर घेणे बाकी आहे. सिंध,गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांतसुदधा आपल्याला साद घालत आहेत. गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्तीची. आपण लवकरच त्यादृष्टीने पाऊले उचलू याबद्दल विश्वास आहे..कारण माझा भारत आता बदलत आहे..
         मुळात कश्मीर ही कधी समस्या नव्हतीच, तो हजारो वर्षापासून भारताचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. ज्यांनी शालेय इतिहास वगळता थोडी ऐतिहासिक भटकंती केली त्यांना  हे लगेच कळून येईल. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी पाचशेच्या वर संस्थाने आपल्या राजकीय कुशलतेने भारतात विलीन करून घेतलीत फक्त जम्मू आणि कश्मीर हेच असे संस्थान होते जे भारतात विलीनीकरण करण्याची जबाबदारी सरदार पटेल यांच्याकडे नव्हती आणि आपला देशाचा घात झाला तो येथेच. फाळणीची बोलणी करण्यासाठी तत्कालीन व्हाइसरॉय माउंटबॅटन समोर बॅरिस्टर वीर सावरकर आणि  बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे निष्णात व्यवहार चतुर महापुरुष असते तर नक्कीच चित्र वेगळे असते आणि त्यावेळी झालेला नरसंहार थांबविता आला असता..पण तत्कालीन नेतृत्वाच्या राजकारणाला व्यवहाराची जोड नव्हती हे आपल्याला मान्य करावेच लागेल...फाळणी ही तत्कालीन मागणी नव्हती तर तो एक हेतुपुरस्सर रचण्यात आलेला कट होता. फाळणीची बिजे खूप खोलवर रुजलेली होती. पण तिकडे साफ दुर्लक्ष करून भोळा आशावाद ठेऊन शांततेची कबुतरे उडवायची हौस असलेलं नेतृत्व आणि स्वप्नरंजनांत गुंग असलेले महान नेते असले ; म्हणजे लाखो लोकांच्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या भळभळत्या जखमा तेवढ्या शिल्लक राहतात. कश्मीर म्हणजे नख लावून लावून मोठी केलेली जखम. टुकार आणि पुचाट शेख अब्दुल्ला कुणीतरी जिना यांना मोठं केलं कुणी ??? आणि वीर सावरकर व बाबासाहेब आंबेडकर यांना दूर लोटलं कुणी ??? याचं उत्तर शोधलं की, आपल्याला सर्व उत्तरे सापडतील. स्वातंत्र्यानंतर म्हणे टोळीवाल्यानी भारतावर म्हणजेच काश्मीरवर आक्रमण केले असे आपण नेहमी वाचतो. हे टोळीवाले म्हणजे कोण ???? तर हे जिनांच्या नेतृत्वातील पाक सैन्य होते..आपल्याला कधी हे सांगितलं गेलं काय ? म्हणजे येथेसुद्धा जिनाभाईवर ??? आरोप लागणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली गेली. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी चाललेली ही निरर्थक धडपड होती...तिकडे बंगालमध्ये सुरहावर्दीच्या पापावर पांघरून घालणारे कोण होते ?? याचा शोध घेतला की , आपल्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नाकारायचा आणि दुसरीकडे एका सार्वभौम देशात वेगळी घटना आणि एका राज्यासाठी वेगळी घटना तसेच ध्वज लावण्याचे पातक कुणी केले ?? त्यामागे कोण होते ??? हे येथे सहज लिहिता आले असते. पण ते वाचकांनी स्वतः शोधले तर उत्तम म्हणजे आपल्या अनेक धारणा दूर होतील..संसदेत जेव्हा कलम ३७० च्या बाबतीत चर्चेला सुरुवात झाली तेव्हा प्रचंड प्रमाणात उहापोह झाला. डॉ आंबेडकरांचा याला खूप मोठा विरोध होतात आणि त्यांनी थेट शेख अब्दुल्ला यांना असं म्हटलं होतं, "तुम्हाला भारताकडून सुरक्षा, पैसे, रस्ते, सामान हक्क  हवे आहेत पण भारताच्या नागरिकाला काश्मीरमध्ये कुठलाही हक्क नको. मी माझ्या देशाशी गद्दारी करूच शकत नाही" त्यांनी असे म्हणून कलम ड्राफ्ट करण्यास नकार दिला. पण अखेर हे वादग्रस्त कलम तयार करून लागू करण्यातच आले. भारत हा सार्वभौम लोकशाही गणराज्य आहे तर या देशात  370 हे अस्तित्वात आलेच कसे ? कलम 370 ने आपल्याला काय दिले ? हा चिंतनाचा विषय आहे. फुटीरवादी चळवळीला चालना मिळाली. काश्मिरी तरुणाला फुटीरवाद्यांनी भारताच्या मुख्य धारेत येऊच दिले नाही त्यामुळे तेथे आतंकवादला चालना मिळाली. तेथील जनतेत परकेपणाची भावना निर्माण झाली.भारताच्या संसदेने केलेला कुठलाही कायदा तेथे लागू होत नाही. त्यामुळे भारत सरकारने भारतात केलेल्या सुधारणा तेथे लागू होत नाही.उदा. सर्व शिक्षा अभियान असो वा विविध क्षेत्रात लागू असलेले आरक्षण असो. कलम 370 हे काश्मीरला भारतापासून तोडणारे आहेच शिवाय इकडे आणि तिकडे दोघांवरही अन्याय करणारे आहे. काश्मिरी तरुण सैनिकांवर दगडफेक करतात तेव्हा वाईट वाटतं.त्याचवेळी त्यांची बाजू घेऊन त्यांची माथी भडकविणारी नेते मंडळी यांची मुले मस्त विदेशात आलिशान जीवन जगत आहेत..हे कुठेतरी थांबले पाहिजे..याचीच सुरुवात केली आहे मोदी सरकारने. हे अन्यायकारक कलम रद्द करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती हवी होती ; ती आज संपूर्ण जगाने बघितले. आज काश्मिरी नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असं म्हणता येईल.
      ज्या तीव्र गतीने मोदी 2.0 सरकार कामाला लागले आहे ही गती बघता भविष्यात आणखी धडाकेबाज निर्णय होतील यात शंकाच नाही. कारण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे शहीद झालेत, फाळणीनंतर नाहक लाखो बळी गेलेत त्यांचा हा देश सूर्य - चंद्र असेपर्यंत ऋणी आहे व राहील त्यांचे आपल्याला पांग फेडायचे आहेत...एकट्या काश्मीरमध्ये आजपर्यंत आपले हजारो सैनिक शहीद झाले आहेत आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत...ते अमर शहीद  आता परत नाही येणार आहेत पण भविष्यात काश्मीरमध्ये आपले बहादूर जवान हकनाक बळी पडणार नाहीत अशी आशा आहे..ह्या एक निर्णयाने फुटीरवाद्यांचा नांग्या ठेचल्या गेल्यात यात काही वाद नाही. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहली गेली.थोडा वेळ मिळाला तर मा. अमितभाईंनी देशांतर्गत असलेले पाक समर्थक, तुकडे गँग, मेणबत्ती गँग, छद्म पुरोगामी यांच्याकडे पण  लक्ष द्यावे..आणि हो ज्यांना या देशात भीती वाटते त्यांची भीतीसुद्धा दूर करावी...
        इतिहास आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. शांततेची कबुतरे उडविण्याच्या नादात भारतीय इतिहासाने खूप वाईट प्रसंग बघितले आहेत...परंतु भविष्यात लिहिला जाणारा इतिहास घडविण्याची जबादारी भारतीय जनतेने आपल्या खांद्यावर दिली आहे आणि तो इतिहास समृद्ध आणि बलशाली असावा असे मला वाटते कारण “जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही.”
जय हिंद.
अखंड हिंदुस्थान हेच आमुचे स्वप्न....
- गणेश

Saturday 29 June 2019

मला निसटलचं पाहिजे

रशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा काळ.
नोकरीच्या कारणाने आलेल्या अनेक परदेशी नागरीक सुद्धा या छळाला बळी पडत होते. स्लाव्हेमिर राविझ हा असाच 24 वर्षांचा पोलिश लेफ्टनंट.1939 साली रशियन गुप्तहेरांनी त्याला हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली.25 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली.राविझची रवानगी झाली ती थेट उत्तर सायबेरिया येथे.मागच्याच आठवड्यात गिरीष कुबेर लिखित “ पुतिन ” हे पुस्तक वाचले होते, त्यामुळे रशियन गुप्तहेर,त्यांची कार्यपद्धती याचा अभ्यास झालाच होता.पण या पोलिश लेफ्टनंटने त्यांच्यासारखेच अमेरिका,जर्मनी, या देशातील आणखी सहा कैदी जमविले आणि त्या अभेद्य तुरूंगातून पलायन केलं.वाटेत मिळाली ती ख्रिस्तीना. सायबेरिया,गोबीचे वाळवंट, तिबेट आणि अजस्त्र हिमालय पार करत 4000 मैलाचा अत्यंत खडतर आणि जीवघेणा प्रवास पायी कापत आपले ध्येय गाठत ते भारतात आले. सगळेजण नव्हेत. पण त्यात राविझ होता. राविझ, ख्रिस्तीना, स्मिथ,पोलुका,कोलो,झोरो, इ.  निरपराध युद्धकैद्याची सपेशल खोटी वाटावी अशी सत्य कहाणी...

मानवी धाडस,जिद्द आणि भावभावनांचे, निसर्गाच्या रौद्र रूपाचे अप्रतिम वर्णन.

मूळ पुस्तक - Long walk
निवेदन - स्लाव्हेमिर राविझ
शब्दांकन - रोनाल्ड डाऊनिंग
अनुवाद - श्रीकांत लागू
प्रकाशक - राजहंस प्रकाशन

Thursday 6 June 2019

स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव

     “ देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो...”
         - स्वातंत्र्यवीर सावरकर
          आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात झोकून दिले त्या महान समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वरील वाक्य अक्षरशः खरे करून दाखविले.स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७२ वर्षानंतरही वीर सावरकर संपूर्ण मानव समाजाला राष्ट्रप्रेम आणि निस्सिम त्यागाची प्रेरणा देत आहेत.पण त्यांच्या या कार्याचा त्यांच्या हयातीत आणि स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत योग्य तो सन्मान केला गेला नाही ही खंत आजही मनाला चटका लावून जाते किंबहुना तसे हेतुपुरस्सर होऊ दिले गेले नाही असे म्हणणे योग्य ठरेल. वीर सावरकर यांच्याविषयी सदैव गैरसमज पसरविण्यात काही लोकांनी धन्यता मानली.पण त्यांना आपल्या हृदयात स्थान देणाऱ्या व्यक्तींनी आजही त्यांचे मोठेपण स्वतःच्या मनात जपले आहे. त्यांचे कार्य युगानुयुगे संपूर्ण मानव जातीस प्रेरणा देत राहील यात तिळमात्र शंका नाही.
          येत्या दशकात पुनःश्च भारतीय राष्ट्रवाद मूळ धरत असताना या राष्ट्रवादाचा वैचारिक पाया रचणारे वीर सावरकर त्यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर आलेत.वीर सावरकर यांच्यावर आजवर प्रचंड साहित्य प्रसिद्ध झाले आहे पण त्यांच्यावर घेण्यात येणाऱ्या धादांत खोट्या आक्षेपाचे सप्रमाण खंडण करण्याचा यशस्वी प्रयत्न “ स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव ” या पुस्तकात अत्यंत तर्कपूर्ण भाषेत करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे सूर्याला त्याचे अस्तित्व सिद्ध करावे लागत नाही त्याप्रमाणे मूठभर लोक वीर सावरकरांचे मोठेपण नाकारून त्यांना लहान करू शकत नाहीत.तरीपण या पुस्तकाचे लेखक श्री अक्षय जोग यांनी वीर सावरकरांविषयी पसरविले गेलेले गैरसमज व त्यामुळे तयार झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सर्व आक्षेपावर उत्तरे देताना वाचकांना एकाच पुस्तकात सप्रमाण माहिती मिळावी यासाठी अथक परिश्रम घेऊन मुत्युंजय प्रकाशन,पुणे यांच्या मदतीने सदर पुस्तक आपल्या भेटीस  आणले आहे.
            सध्या मराठी साहित्य विश्वात सखोल अभ्यासपूर्ण व पुराव्यासह लेखन करण्याचा कल वाढत आहे. त्याच मालिकेतील हे पुस्तक आहे. वीर सावरकर यांच्यासारखे निरलस देशभक्त आपल्या भारत भूमीला लाभले हे आपले सौभाग्य. पण काही बेगडी,महान?? लोकांनी वीर सावरकरांच्या मातृभूमीच्या निष्ठेला सतत नख लावण्याचं कार्य केलं त्यात ते अजूनही यशस्वी होऊ शकले नाहीत व भविष्यात होणारही नाहीत ही त्यांची खरी खंत आहे. सावरकर यांनी सदैव लोकहीताचा विचार केला व राष्ट्र सर्वतोपरी हे त्यांचे एकमेव ध्येय होते.त्यासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्राला अर्पण केले.सदर पुस्तकात वीर सावरकर यांच्यावर जे प्रमुख खोटे आरोप केले जातात त्या सर्व आरोपांना स्वतंत्र प्रकरणात अगदी मुद्देसूद उत्तरे दिलेली आहेत.
        स्वातंत्रवीर सावरकर यांनी अंदमान येथे कैदेत असताना इंग्रजांकडे खरंच क्षमा याचना केली होती काय ? त्यांचं देशकार्य, भारतीय तिरंगा ध्वज व त्यांची भूमिका,मानवतावादी धोरण,अल्पसंख्याक धोरण,सावरकर आणि दुसरे महायुद्ध,चले जाव आंदोलन आणि सावरकर,सावरकर आणि द्विराष्ट्रवाद इ. अनेक प्रकरणातून लेखकांनी सावरकरांची भूमिका देशाला कशी हितकारक होती याचे पुराव्यासह अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे.यासाठी त्यांनी विविध ग्रंथ,ब्रिटिश गुप्तचर अहवाल,मा.भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल, असे संदर्भ दिलेले आहेत. हे पुस्तक वाचत असताना वीर सावरकर यांच्याविषयी सत्य काही वेगळे असताना चुकीचे भ्रम कसे पसरविण्यात आलेत हे आपल्या लक्षात येते.सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय ? त्यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र काय होते ?? हिटलर, फॅसिस्टवाद,ज्यू राष्ट्र याविषयी त्यांचे रोखठोक विचार आपणास या पुस्तकातून कळतात. म.गांधी हत्येच्या कटातून निर्दोष मुक्तता होऊनही आजही त्यांचे नाव या कटात गोवण्यात कुणाला फायदा होत आहे या सर्वांचा उलगडा आपणास हळूहळू होत जातो.सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होता हे येथे विशेष नमूद करावेसे वाटते.
         संपूर्ण पुस्तकात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक थोर पुरुषांचा उल्लेख आलेला आहे.म.गांधींशी असलेले त्यांचे वैचारीक मतभेद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले त्यांचे संबंध,पं.नेहरू,सरदार पटेल,यांच्याविषयी असलेले यांचे मत इ. परंतु लेखक महोदयांनी सदर पुस्तकात या थोर महापुरुषांचा कुठेही अपमान होणार नाही अशी काळजी घेतली आहे.त्यांचे मोठेपण अबाधित ठेवतानाच सावरकर यांचे महान कार्य आपल्यासमोर प्रस्तुत केलं आहे. १९४२ च्या सातंत्रलढ्यात सावरकरांची भूमिका काय होती नेमकं त्यानं काय अभिप्रेत होते तसेच भारतीय युवकांनी ब्रिटिश सैनिकांत सामील का झाले पाहिजे या मागील वीर सावरकर यांची भूमिका स्तिमित करणारी होती. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास नसणारी काही संकुचित मनोवृत्तीची माणसे वीर सावरकरांवर नेहमीच टीका करण्यात धन्यता मानतात. ती त्यांची राजकीय गरज असू शकते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभ्यासकांना या पुस्तकाने एक खंबीर पुरावा उपलब्ध झाला आहे..याबाबत कुठलीही शंका नाही.
        मराठी साहित्य विश्व कलाटणी घेत असताना आता लेखकही वाचकांना सहज उपलब्ध होत आहेत. वाचकांच्या शंकाचे निरसन करण्यात लेखक सदैव अग्रेसर असतात.या पुस्तकाच्या निमित्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्त्यकी सावरकर यांच्याशी बोलण्याचा योग आला.हे मी माझे सौभाग्य समजतो..या पुस्तकाचे लेखक श्री अक्षय जोग तसेच श्री सात्त्यकी सावरकर यांनी व्हाट्स एप आणि फेसबुकवर प्रत्येकवेळी अत्यंत व्यसत्तेतून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.समाज माध्यमावर वाचन चळवळ फोफावत आहे ही एक दिलासा देणारी बाब आहे...मलाही येथूनच या पुस्तकाविषयी माहिती मिळाली. मराठी वाचन चळवळीचा प्रसार करण्यास फेसबुक आणि व्हाट्स एपचा खूप छान उपयोग होत आहे.प्रकाशनपूर्व नोंदणीतच ज्या पुस्तकाच्या जवळपास १५०० प्रतींची नोंदणी झाली; असे हे अभासपूर्ण पुस्तक प्रत्येक सावरकर प्रेमी व अभ्यासकाने तसेच टिकाकारांनी सुद्धा अवश्य वाचावे......तरच कालजयी वीर सावरकर आपणास कळतील आणि उमजतील....
         धन्यवाद.
पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव
लेखक - श्री अक्षय जोग
प्रकाशक - मृत्युंजय प्रकाशन, पुणे
दूरभाष क्र. ९९२१३५१२५२
       
           
      
    

Tuesday 12 March 2019

एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास

          शालेय जीवनात इयत्ता आठवीपासून एडॉल्फ हिटलर या नाझी जर्मन सेनानीची ओळख होऊ लागली नंतर या व्यक्तिमत्वाने मला ओढ लावली.मिळेल तेथे व जमेल तेवढी पुस्तके वाचलीत या योध्यावर...त्यांचं चरित्र,वार्सा ते हिरोशिमा,दुसरे महायुद्ध आणि जग,हिटलर,इ. अनेक पुस्तके वाचलीत वाचताना मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. असं कसं या एका योध्याने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं ? त्याने खरंच जे इतिहासात सांगितलं जातं तसा नरसंहार केला होता काय ? हिटलर खरंच युद्धपिपासू होता काय ? त्यावेळची नेमकी परिस्थिती काय असावी ? जी पुस्तके वाचलीत त्यांनी या प्रश्नाची उत्तरे कधीच नाही दिलीत...तेव्हा तेथेच थांबलो पण प्रश्न मनात कायम ठेऊन.
         मग शिक्षण आणि नौकरी निमित्त्यानं थोडं वाचन कमी झालं पण थांबलं नाही...एकदा एका मुलाखतीत आमच्या एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की,दुसऱ्या महायुद्धाला कोण जबाबदार होतं ? मी उत्तर दिलं इंग्लंड.त्यांनी थोडं स्मित केलं.वर्षे लोटलीत आणि फेब्रुवारी 2019 ला फेसबुक वर एका पुस्तकाच्या प्रकाशनाची जाहिरात म्हणू या किंवा निमंत्रण बघण्यात आले. पुस्तकाचं नावं होतं “ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ” शिर्षक बघताच माझ्यातील वाचक पुन्हा जागा झाला.मी सरळ पुस्तकाचे लेखक मा.श्री पराग वैद्य सरांना फोन केला पुस्तकाची माहिती घेतली आणि श्री सच्चिनानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशित सदर पुस्तकाची कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे येथे मागणी नोंदविली...लेखकांचा आणि माझा एवढाच काय तो परिचय...
          मनोगत व्यक्त करताना लेखक महोदयांनी पुस्तकाच्या नवव्या पानात आपल्या सर्व धारणांना हादरा दिलाय. हे पुस्तक म्हणजे काही कादंबरी नाही आहे.ना लेखकांनी कुठेही कल्पनेचे उंच झोके घेतले आहेत. जवळपास बारा वर्षे शेकडो पुस्तकांचे अखंड अध्ययन करून त्यांनी तटस्थपणे फक्त सत्यकथन केलेले आहे.यावरून लेखकांची प्रचंड मेहनत लक्षात येते.एखादया प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नसेल तर ते आपल्या शत्रूच्या गोटातून मिळवावं असं म्हणतात.लेखकांनी नेमकं तेच केलं त्यांनी नाझी जर्मन शत्रूच्या गोटात लिहिली गेलेली पुस्तके..प्रतिवृत्ते...इंग्लंड,अमेरिका,पोलंड,फ्रान्स,रशिया या देशाचे राष्ट्रप्रमुख,त्यांचे परराष्ट्र मंत्री,सचिव, राजदूत,इतर देशातील उच्च पदावरील शासनकर्ते यांच्यातील गुप्त चर्चा, दूरध्वनी,त्यांचे पत्रव्यवहार,त्यांच्या वैयक्तिक नोंदी,जगात विविध देशात एडॉल्फ हिटलवर लिहिली गेलेली हजारो पुस्तके,जागतिक वृत्तपत्रे व त्यातील लेख यांचा सखोल अभ्यास करून सदर पुस्तक आपल्या समोर मांडले आहे.नाझी शत्रूंना नेमके हिटलर या असामान्य योध्याविषयी काय वाटत होते आणि हेतुपुरस्सर जगापासून तो इतिहास का लपवला गेला ???  संपूर्ण जगास उत्तरार्ध सांगितला गेला पण पूर्वार्ध आपणापासून का दडवून ठेवण्यात आला.?नेमका हाच वेध या पुस्तकात घेतला गेला आहे. आपल्याविषयीचे अचूक सत्यकथन आपला शत्रूच करू शकतो,याविषयी कुणीही शंका घेऊ शकत नाही.सातशे अडतीस पानाच्या या पुस्तकात एकशे पंचवीस पाने फक्त संदर्भ ग्रंथाची यादी प्रसिद्ध करायला लागली आहेत.यावरून या पुस्तकाची सत्यता,भव्यता आणि मा.लेखक श्री पराग वैद्य सरांची चिकाटी आपल्या लक्षात येते.
        आज ऐतिहासिक संदर्भात आपण आपल्या अवतीभोवती जे बघतोय आणि आपली धारणा करून बसतो ते अर्धसत्य असते.अन्यथा ब्रम्हचार्याचे व्रत करताना टेकू म्हणून आपले हात ठेवायला स्त्रिया कशाला हव्यात? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध कशाला हवे ???? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.सत्याच्या आड कुणाची तरी चमचेगिरी करायची आणि शांततेच्या बाता मारताना आपले धार्मिक अहंगंड कसे पूर्णत्वास नेले जातात याचा नेमका वेध या पुस्तकाने घेतला आहे..जेमतेम फक्त सहा महिने पुरेल एवढी युद्धसिद्धता असताना हिटलरने खरेच जागतिक युद्ध पुकारले होते काय? एका असामान्य योध्याने आपल्याला ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे त्याप्रमाणे साठ लाख ज्यूंची हत्या केली होती काय?? जर्मनीत नेमके ज्यूंचे स्थान काय होते अथवा एक नागरिक म्हणून जर्मन देश उभारणीत त्यांची भूमिका काय होती याचा इतिहास खूपच मनोरंजक आहे.जर्मनीत वास्तवात गॅस चेम्बर होते काय?? आपणास जे गॅस चेंबर दाखविले गेले मग ते कोणत्या देशात उभारले गेले होते ?? तेथे नेमके काय सुरू होते ? दुसरे महायुद्ध हे एखादया सिनेमाच्या कथेप्रमाणे जर्मनीवर नाझी शत्रूंनी का लादले त्यातुन त्यांना काय हस्तगत करायचे होते ?? हे आजही गूढ आहे. हे गूढ आपणापासून हेतुपुरस्सर का दडविण्यात आले ??? या जगात खरंच सहिष्णुता सर्वधर्म समभाव नावाच्या गोष्टी असतात काय ??? की आपल्याला फक्त मूर्ख बनविले जाते...याचे उत्तर शोधणे हे आपले कर्तव्य आहे.कर्तुत्वशून्य माणसाला महान(महात्मा) म्हणून सांगायचे आणि जो आपल्या वैयक्तिक स्वार्थाआड येतो त्या महान सेनानीला अगदी योजनाबद्ध पद्धतीने खलनायक ठरवायचे हा आजवरचा इतिहास तपासायची तयारी असेल तर नेमकं हे पुस्तक वाचावे...
       युद्ध हे ज्या देशांचे व्यसन होते आणि शस्त्र विक्रीतून मानवी संहार हे ज्यांचे ध्येय होते तेच देश आजही संपूर्ण जगाला शांततेचे आणि निशस्त्रीकरणाचे उपदेश देत असतात. जो अमेरिका आज संपूर्ण जगाला दहशतवाद विरोधी ब्रम्हज्ञान सांगत असतो, त्याचे स्वतःचे दुसऱ्या महायुद्धकालीन दहशतवादी कृत्ये या पुस्तकाने समोर आणली आहेत.तसेच आजच्या काळातील इराक व लिबिया येथे त्यांनी केली कृत्ये याचीच साक्ष देतात. जपान या देशाची अगतीकता त्यातून त्या देशाने स्वरक्षणार्थ उचललेले पाऊल याविषयी खूप विस्ताराने या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे त्याउलट रशियाचा विस्तारवाद व त्यांच्या सेनेने संपूर्ण मानव जातीला लाजवून सोडतील अशी केलेली महाभयानक कृत्ये वाचतानाआपल्यालाही हादरवून सोडतात आणि नेमका हाच इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला आहे.आपल्याला ज्ञात नसलेले जैविक व रासायनिक युद्ध नाझी शत्रूंनी कसे पुर्णत्वास नेले.याचे संपूर्ण विस्तारीत विवरण या पुस्तकात मा.पराग वैद्य सरांनी अगदी अचूक मांडले आहे.
        आपला छुपा धार्मिक विस्तारवाद जगावर थोपविण्यासाठी नाझी शत्रूंनी एक काल्पनिक शत्रू उभा करून संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले व वरून खोटा मानवता वादाचा बुरखा चढवत आपली पापे लपवून ठेवलीत.स्वतःला लोकशाही देश म्हणविणाऱ्या नाझी शत्रूंनी केलेल्या भयानक कत्तली जेव्हा या पुस्तक रूपाने आपल्यासमोर येतात तेव्हा आपणास चीड यावी इतके दुसरे महायुद्ध हे प्रकरण गंभीर आहे.या युद्धात खरंच अणूबॉम्ब वापरण्याची गरज होती काय ??? की अमेरिका ता देशाला त्याची युद्ध खुमखुमी भागवायची होती? नोबेल पारितोषिक विजेता व अणुबॉम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या माणसाची वास्तविकता काय होती?? मनात आणले असते तर सर्व नियम धाब्यावर बसवून हिटलरला हे युद्ध जिंकता आले असते काय??? या सर्व प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला गेलेला आहे.हे युद्ध पद्धतशिरपणे घडवून आणून इतका मोठा मानवी नरसंहार का केला गेला ? हे ज्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचवयास हवे.असं म्हणतात की युद्ध हे कोणत्याच समस्येवर उपाय नसते.पण ते आपल्या देशाच्या आणि वंशाच्या संरक्षणासाठी लढावेच लागते. हिटलर या असामान्य योध्याने व लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी ते लढून आपले कर्तव्य पार पाडले.
         मी काही समीक्षक नाही व तेवढी माझी पात्रता पण नाही. एक वाचक म्हणून मला जे वाटले ते मी येथे लिहिले आहे...खूप वर्षांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला मिळाले याबद्दल मी या पुस्तकाचे लेखक श्री पराग वैद्य सरांचे खूप खूप आभात मानतो. यासाठी त्यांनी जे शारीरिक,मानसिक व आर्थिक ताण सहन केला आहे त्याला तोड नाही.लेखकाच्या मनोगतापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपणास लेखकांनी खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे आणि पुन्हा तोच विपर्यास केला गेलेला इतिहास आपल्या धारणांना हादरे देत जिवंत केला आहे. ज्या व्यक्तीवर आजवर हजारो पुस्तके लिहून त्याचं चारित्र्य हणन करण्यात धन्यता मानली गेली नेमकं त्याच प्रवाहाविरुद्ध बंड करून एका असामान्य योध्याला व राष्ट्रपुरुषाला न्याय देण्याचे धाडस या पुस्तकाचे लेखक मा. श्री पराग वैद्य सरांनी केले, त्याबद्दल मी स्वतः त्यांचा वैयक्तिक ऋणी आहे. नक्की वाचा....


“ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ”
लेखक - श्री पराग वैद्य
प्रकाशक - कॉन्टिनेंनटल प्रकाशन, पुणे
भ्रमणध्वनी - 9881493820
         

Saturday 12 January 2019

We want Pension.....

Check out @kubde_ganesh’s Tweet: https://twitter.com/kubde_ganesh/status/1084005357335150593?s=09

Wednesday 15 August 2018



देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

🙏🇮🇳🙏

Wednesday 27 June 2018

प्रसारमाध्यमे आणि आमची राष्ट्रीय नकारात्मकता.....

       आपल्या भारतात यदाकदाचित यादवी अथवा गृहयुद्ध पेटलेच तर त्याला प्रत्यक्ष कोणताही धर्म जबाबदार असणार नाही. तर त्या भीषण परिस्थितीला फक्त आणि फक्त भारतीय प्रसारमाध्यमे जबाबदार असतील.यात आघाडीवर आहेत आपल्या बेजबाबदार वृत्तवाहिन्या आणि आपला आवडता सोशल मीडिया.वृत्तवाहिन्यांचे प्रशिक्षित?पत्रकार असोत वा सोशल मिडीयातील स्वयंघोषित एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला आपली अक्कल गहाण ठेवलेले विचारवंत;यांना एकाच रोगाने ग्रासले आहे ते म्हणजे हवी तितकी या देशाची बदनामी करणे व त्याबदल्यात मिळणारी विदेशी खिरापत लाटणे...
        मागील काही वर्षात एकंदरीत असेच चित्र रंगवले जात आहे की,भारत देशात काहीच ठीक नाही,प्रचारकी मिडिया दिवसरात्र फक्त आणि फक्त नकारात्मक व सनसनाटी बातम्या रंगविण्यात मग्न आहे.दिल्ली व दिल्ली NCR च्या बाहेर एक जग आहे हे यांच्या गावीही नसते.तामिळनाडू राज्यातील पालिपट्टी या छोट्याश्या गावातील रिफाथ शरूक या 18 वर्षीय मुलाने 2017 साली जगातील सर्वात वजनाने हलका ( 64 ग्रॅम) एक उपग्रह तयार केला.अमेरीकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेने त्याच्या या कार्याची योग्य ती दखल घेतली.त्याची नोंद फक्त काही वृत्तपत्राने घेतली पण आपल्या स्वतःला नंबर 1 समजणाऱ्या कोणत्याही वृत्तवाहिनीने त्याची साधी दखलही घेतली नाही.संपूर्ण भारतीयांसाठी ही प्रेरणादायी बाब होती पण याचवेळी आमच्या तमाम वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपला राष्ट्रीय बालक तैमुरची शी धुण्यात व्यस्त होते.त्यांचेही बरोबर आहे म्हणायला हरकत नाही,कारण त्याची शी धुण्याचे यांना त्याच्या अब्बा आणि सुपर मॉमच्या PR कंपनीकडून योग्य ते अर्थकारण करण्यात येते.बिचारा रिफाथ पडला गरीब.
          India मध्ये एक दुर्लक्षित भारत वसतो हेच आजचे सत्य आहे.इंडियामध्ये सुपर मॉमची संकल्पना वेगळी आहे तर इकडे भारतात भर उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत आपल्या बाळाला पाळण्यात झोपवून आपल्या रक्ताचे पाणी करणारी माऊली अथवा विविध नौकरी करणाऱ्या स्त्रिया यांना सुपर मॉमचा दर्जा नसतो कारण यामागे ग्लॅमर नसतं.आदिवासींचे कुपोषण,त्यांची जीवन जगण्याची रोजची होरपळ,शैक्षणिक व सामाजिक सुविधांचा उडालेला बोजवारा याचे यांना कुठलेही भान नाही.काळजी आहे ती तैमुरच्या आईच्या वाढलेल्या वजनाची.त्यावर एक-एक तास चर्चा घडते आणि इकडे गरोदर माता कुपोषणामुळे मृत्यूला सामोरी जाते..नुकतेच एक पासपोर्ट प्रकरण माध्यमात गाजले.कुठलीही वस्तुस्थिती न जाणता आपल्या माध्यमांनी त्या सरकारी अधिकाऱ्याला दोषी ठरवून देशात असहिष्णुता वाढत चालली आहे म्हणून ढोल बडवायला सुरुवात केली.दोन तीन दिवस गदारोळ माजला.आता सत्य जगासमोर आले आहे तो अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करत होता.आपला मीडिया तोंडघशी पडला...काही गरज नसताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपले हसे करून घेतलेत ते वेगळे.
       सरकारी अधिकारीच हे भ्रष्टाचारी असतात आणि खोटी माहिती पुरविणारी जनता पिडित असते असेच चित्र रंगविण्यात आपले पत्रकार धन्यता मानतात.  देशात कोणता राजकारणी काय करतोय, कोण काय वादग्रस्त वक्तव्य करतोय, कुणी कुणाचा पाठिंबा काढला, कुणी कुणाला काय म्हटले, कोणत्या धर्माने काय केले, कोणत्या जातीच्या गटाने काय केले,एखाद्या पक्षाच्या तालुकाछाप उठवळ नेत्याने एखादे बिनडोक विधान केले की त्याचा सरळ राष्ट्रीय धोरणाशी जोडून त्यावर महाचर्चा घडवून आणली जाते,त्यात चर्चा कमी बौद्धिक दिवाळखोरी जास्त असते.नेमका तरुण वर्ग याच     पांचट पत्रकारितेला बळी जातो.एखाद्या पोरकट नेत्याने केलेले विधान गल्लीतून दिल्लीपर्यंत सफर करून शेवटी येथे कुठे तर आपल्या फेसबुक आणि व्हाट्स अपवर.तिकडे टी.व्ही.वर चर्चा करून तमाम बुद्धिजीवी झोपी गेले असताना आपला तरुण वर्ग आपआपल्या पक्षाचा किल्ला लढवितो.कधीकधी ही बिनबुडाची चर्चा इतकी विकोपाला जाते की वैयक्तिक सबंध खराब व्हायची वेळ येते.राजकारण्यांच्या मागे फिरणारे तरुण पाहिले की विचार येतो,काय होणार याचं? स्वतःच्या पॉकेटमणीतून वस्तीत स्वतःचेच फ्लेक्स लावणारा व आपले या या नेत्यांशी संबंध आहेत म्हणून फुशारक्या मारणारा तरुण नंतर नैराश्याच्या खाईत लोटला जातो.आपला मीडिया व राजकारणी तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना त्यांच्या मुख्य ध्येयापासून परावृत्त करत आहे.कारण आपली अक्कल गहाण ठेवणे व गुलामी करणे हा आमचा आवडता छंद आहे.
           चार पाच दिवसापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे मुख्य संस्थापक बेझोस भारतात येऊन गेले.कशाला तर अजिंठा वेरूळ लेण्यांना दुसऱ्यांदा भेट द्यायला.तो त्यांचा खाजगी दौरा होता हे मान्य पण मीडियाने यावर चर्चा घेतली काय? त्यांची कार्यपद्धती तरुणासमोर आणण्याची गरज कुणालाही वाटली नाही.रतन टाटा,अंबानी,झुकेरबर्ग यांचा जीवनप्रवास कुठे दिसतो?नांव असतं का कुठे बातम्यांच्या एखाद्या कोपऱ्यात?……… तर नाही.आमचा मीडिया अजूनही मुन्नी आणि शिलातच गुंतून पडला आहे सोबतीला राष्ट्रीय बालक तैमु.आहेच.ह्या देशात फक्त खून,बलात्कार, चोऱ्या होतात असेच नाही पण ते कधीही दिसणार नाही आणि दाखविलेच तर 5 सेकंद यांना पुरेसे असतात.राजकारणत काही चांगले झाले तर ते न दाखविता यांना सांस- बहुच्या मालिका आठवतात.
        सगळेच राजकारणी अथवा राजकारण वाईट आहे असे म्हणता नाही येणार.देशाची प्रगती यांच्याच ध्येय धोरणावर अवलंबून असते.पण म्हणून तरुणांनी किती वेळ यामागे घालवावा हाही एक संशोधनाचा विषय आहे.एखादा राजकारणी आपले आयुष्य घडवेल अशी आशा करणेही चुकीचे आहे.जे करायचे ते आपल्यालाच करायचे आहे.हे जेवढे लवकर समजले तेवढे चांगले.कारण गेलेले आयुष्य परत येत नाही.एखादी महत्वाची चर्चा करायला आपल्याला वेळ नसतो.मित्राला एखादा कॉल करायला आम्हाला वेळ नाही पण राजकारणावर,धर्मावर,जातीवर बोलायला आम्हाला अखंड वेळ आहे... कारण चोवीस तास आमच्या मेंदूवर हेतुपुरस्सर याचाच मारा होतोय.देशात ना आरक्षण धोक्यात आहे ना ही कुठला धर्म संकटात आहे.कुठेही असहिष्णुता नाही आहे आणि कुणीही अराजक नाहीत.भारतीय राज्यघटना अगदी सुरक्षित आहे.तिचा मूळ गाभा अथवा संपूर्ण राज्यघटना पूर्णपणे सुरक्षित आहे.राज्यघटना हा काही कागदाचा चिटोरा नाही जो कुणीही येऊन बदलवून टाकेल अगदी कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी हे शक्य नाही.ही आपल्या नकरात्मक मीडियाने पसरविलेली एक एक अफवा आहे....
        त्यामुळे सर्वाना आपल्या जबाबदरीचे भान असणे आवश्यक आहे.

ता.क. अजूनही औरंगाबाद येथे रेल्वेखाली चिरडून मेलेल्या गरीब मजुरांचा धर्म मिडीयाला शोधता आला नाही हे आमचे नशीब. किंबहुना ते गरीब असावेत...

जय हिंद...

गणेश

Wednesday 4 April 2018

होय आपला डेटा चोरी होतोय....

साधारण 10-12 दिवसा अगोदर मला  आर्थिक व्यवहार करणाऱ्या एका खाजगी कंपनीतून फोन आला.एक वर्षाअगोदार मी माझी आर्थिक गरज भागविण्याकरिता एका प्रतिष्ठित खाजगी बँकेतून वैयक्तिक कर्ज काढले होते.तेच कर्ज दुसऱ्या एका खाजगी बँकेत अत्यंत कमी व्याजदरात वळते करण्यासंबंधी तो फोन होता...सगळं बोलणं झाल्यावर मी त्या व्यक्तीला सहज विचारलं की,हे सगळं तुम्हाला कसं माहीत....त्यावर त्याची प्रतिक्रिया फारच भन्नाट होती.तो म्हणाला, “ हमारे पास सबकी जाणकारी होती है” त्याला माझ्या कर्जविषयक आणि वैयक्तिक सगळी माहिती होती.....सर्व बोलणं झाल्यावर मी सहज विचार केला की,माझं कर्ज आणि वैयक्तिक माहिती जर याला माहिती आहे, तर जी माहिती आपण हेतुपुरस्सर इकडे तिकडे शेअर करीत असतो त्याचं काय???
         आपण कुठे गेलो,काय जेवलो,कुणाला भेटलो ही इ.इ. माहिती आपण फेसबूकवर न चुकता पोस्ट करत असतो.नुकतीच फेसबुक ही कंपनी याच वादात ओढली गेली आणि संपूर्ण जगात याच चर्चेला उधाण आलं की, खरंच आपण आणि आपलं वैयक्तिक जीवन सुरक्षित आहे काय ??? फेसबुकने आपल्या युजर्सचा डेटा परस्पर एक दुसऱ्या कंपनीला विकला म्हणे....आपली कुठलीच गोष्ट तंत्रज्ञानाच्या या युगात खाजगी नाही आहे..मागे मी याच विषयावर एक ब्लॉग लिहिला होता त्याचा विषय होता “ आपला मेंदू हायजॅक झालाय " त्याची लिंक खाली पुनश्च एकदा देत आहे. शांत डोक्याने विचार केल्यास आपल्यावर सतत एका अनामिक गोष्टीचा भडिमार होतोय.नेमकं जे आपल्याला नको आहे तेच वारंवार आपल्या डोळ्यासमोर येते किंवा दाखविले जाते.आपल्या मित्राचा एखादा बूट अथवा मैत्रिणीची एखादी साडी आपण फेसबुक वर like अथवा शेअर केली रे केली की बघा त्याच गोष्टीची जाहिरात आपली वैयक्तिक फेसबुक वर झळकायला लागते.गुगलवर एखादी महागडी  वस्तू उदा. हिरा किंवा त्याचे दुकान शोधा आणि बघा नंतर आपल्यावर बरोबर नेमक्या त्याच जाहिरातीचा भडिमार सुरू होतो..हे सगळं चक्र कळत नकळत अव्याहत सुरू असते.
           फेसबुक,व्हाट्स अप,ट्विटर असो वा इन्स्टाग्राम यावर आपण शेअर केलेलं अथवा लिहिलेलं कधीच मिटत नाही.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.इतक्यात एक नवं फिचर आलं आहे “ Delete for me” किंवा “Delete for everyone” ह्या दोन्ही सुविधा तात्पुरत्या आपल्या मनाला समाधान जरी देणाऱ्या असल्या तरी, आपण केलेली पोस्ट ही त्या त्या कंपनीच्या डेटा बँकेत ( सर्वर) अगदी चिरंतन जतन केली जाते.एखादा व्यक्ती सहा महिन्या अगोदर नेमक्या वेळी कुठे होता हे अगदी सहज सांगता येते.याच सोयीचा फायदा घेऊन पोलीस सहज एखाद्या गुन्ह्याचा तपास लावू शकतात..तुम्ही तुमचं अकाउंट बंद करा अथवा लॉग आऊट व्हा तुमची माहिती ही तुमच्या ह्या जगातून निरोप घेतल्यावरसुद्धा जतन करून ठेवली असते.साधं गुगल मॅप जरी उघडलं तरी आपण कुठे कुठे भेट दिली होती याची आपणास माहिती मिळते...
          आता महत्वाचा मुद्दा हा की,फेसबुकने आपली कुठली माहिती विकली अथवा चोरली..माफ करा चोरली असं म्हणता येणार नाही कारण भरपूर माहिती तर आपणच त्यांना दिली आहे...नियम व अटी न वाचता.(Terms & Conditions ). कुठलेही अँप्लिकेशन आपल्या फोन मध्ये घेताना जगातील 90% लोकं नियम व अटी वाचायला सरासरी फक्त 6 सेकंद वेळ देतात.यात माझा पण समावेश आहे.या सहा सेकंदात आपण काय वाचतो आणि सहमती कशी देतो हा संशोधनाचा विषय आहे.समजा भारतात 50 करोड लोक फेसबुक वापरत आहे तर फेसबुकला या सर्व लोकांचा वयोगट आधीच माहिती झालेला असतो.जन्म दिनांक आपणच नमूद केलेला असतो.कुठल्या वयोगट कोणत्या प्रकारच्या बाजारासाठी उपयुक्त ग्राहक बनू शकते याचा अभ्यास करणारी तज्ञ मंडळी तिकडे असतात.गुगल वर search करताना आपल्याला विविध जाहिराती येतात.तो हाच ग्राहक वर्ग तपासून.स्त्री - पुरुष असं वर्गीकरण सहज करता येतं(भारतात काही मुले मुलींच्या नावाने खोटे खाते उघडतात आणि भरपूर मुलांना गंडवितात हेही फेबू. ला माहिती आहे).आपलं लग्न,पत्नी,मुलबाळ,बहीण,भाऊ,याचीही माहिती त्यांना आहेच.आपला धर्म तर आपणच ओरडून सांगत असतो.भलेही मग आपण जाती अंताची लढाई लढणारे लढवय्ये कार्यकर्ते असू देत.तुम्ही कोणत्या राजकीय विचारसरणीचे आहात हेही सहज सांगता येते.(येथे तुम्ही राजकीय पोस्ट करणे अपेक्षित नाही.) तुमच्या आवडी निवडी,तुमचे मित्र मैत्रिणी त्यांचे वाढदिवस त्यांच्या विचारधारा इ.इ.सगळं फेसबुकला माहिती आहे.तुमचं relationship status म्हणजे तेच Married, Unmarried,Single,in a Relationship अथवा काही लोकं in a Complicated relationship मध्ये पण असतात.हा जो शेवटचा प्रकार आपल्या डोक्याच्या बाहेर असला तरी फेबूला हे सगळं समजतं..याचा विविध स्तरावर योग्य अभ्यास केला जातो..
            आता खरा खेळ येथूनच सुरू होतो,तुमचा वयोगट,तुमचा धर्म,लिंग,भाषा,जात,प्रांत,मित्र मैत्रिणी,आवडीनिवडी,तुमचे राजकीय विचार(ज्याला वाटतं की आपल्याला राजकारणात काडीचाही रस नाही,त्याला पण राजकीय मते असतातच.) ही सगळी माहिती फेबु.अथवा सारे  एकत्रित करतात.त्याचं विश्लेषण करून मग एखाद्या कंपनीला ती माहिती पुरविली जाते.कंपनी त्या माहितीचा उपयोग मग चातुर्याने करून घेते...निवडणुका आल्या की,तुमच्या मोबाईलवर त्यांना जसे हवे त्या त्या कौलाच्या बातम्या,फोटो अथवा इतर भडकविणाऱ्या पोस्ट टाकल्या जातात.सततचा भडीमार बघून हळूहळू आपला कौल आणि त्यांचा कौल जुळू लागतात.त्यांचे इप्सित साध्य होते.लिबियातील गद्दाफी शासनाविरुद्ध मागे सफल झालेली  मोहीम हे याचे उत्तम उदाहरण म्हणून देता येईल (आपल्या देशात भरपूर उदाहरणे आहेत पण लिहीत नाही.लोकं आपली सोय बघून गोटे मारतात).हाच सोशल मीडिया एक दिवस भारतात गृहयुद्ध घडवून आणणार हे नक्की.त्याची सुरुवात झालेली आहे.
            शांत चित्ताने विचार केल्यास आपण या सगळ्या प्रकाराला अगदी नकळत बळी पडतच आहोत.तुम्ही आपल्या आप्तेष्टांपासून कुठलीही गोष्ट लपवू शकता पण समाज माध्यमापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही. तुमचं नाव हरिभाऊ ठक आहे आणि तुमचं फेसबुक खाते Harry या नावाने असेल तुम्ही मा.भालचंद्र नेमाडे लिखीत “कोसला” हे पुस्तक वाचताना सनी बाईंचा dp जरी लावला तरी तरी फेसबुकला माहिती असतेच की “ गंगाधर ही शक्तिमान है ” राहिली गोष्ट आपल्या आचार विचारांची ते तर कुणी आपल्याला डिवचले की लवकरच कळतात...एखाद्या वेळेला सार्वजनिक रस्ता साफ करताना हातात झाडू घेऊन एखादा फोटो फेसबूकवर टाकल्यास Analytics तुम्हाला समाजसेवक समजतील या भ्रमात पण कुणी राहू नये....(समाजसेवक म्हणून प्रतिमा निर्माण करण्याच्या भारतात नियम व शर्ती वेगळ्या आहेत) कारण प्रत्येकाची विचार करण्याची आणि अभ्यास करण्याची पद्धती वेगवेगळी असते...आपण घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी ही होणारच कारण
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात.सोशल मीडिया वापरा तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण विवेकाने...आणि हो नुसतंच @ आग्रा ताजमहाल,with my hubby किंवा with my love अश्या पोस्ट टाकून मित्रांकडून लाईकचे👍👍👍👍👍मिळविण्यापेक्षा किंवा तशी अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्यासाठी एखादा पेठयाचा तुकडा आणा आणि मग बघा फेबूच्या त्या अंगठयापेक्षा मित्र मैत्रिणीचे सुखद हास्य आपल्या आयुष्यात काय गोडवा आणते ते.....

टीप :-दिवसातून किती वेळा फेसबूकवर स्टेटस  अपडेट करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे व मी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो.
धन्यवाद.

---गणेश

आपला मेंदू हायजॅक झालाय.... http://mazemanogat1.blogspot.com/2018/02/blog-post.html

Sunday 25 March 2018

भारतीय लोकशाही आणि जनतेची कर्तव्ये....

    आपल्या भारत देशात एखाद्या विषयावर लिहायचे म्हटले तर आपल्या लेखाच्या खाली अथवा वर एक टिप लिहावी लागते की,“बाबा रे याचा या या गोष्टीशी, या या विषयाशी अथवा तुमच्या आमच्या महापुरुषांशी काहीही संबंध नाही.असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा”…….इ.इ.एका धर्मनिरपेक्ष देशात सदर टिप ही लिहावीच लागते,नाहीतर तुम्हाला सगळीकडून सोयीस्कर शाब्दिक टीका झेलावी लागते..इतकी मानसिक गुलामगिरी आपण आज पत्करली आहे.त्यावर कडी  अशी की,सगळेच आपआपल्या संकुचित बिळात स्वतःला सुरक्षित समजत आहेत आणि इतरांवर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. खरंच आपण आपण एका सार्वभौम,लोकशाही गणराज्य व्यवस्थेत जगत आहोत काय ??? आपण जगतो ते आपल्या सोयीनुसार.....मला जे सोयीस्कर ते मला मान्य आणि इतरांना जे सोयीस्कर पण माझ्या अस्तित्वासाठी जे घातक ते मला अमान्य.इतकं उथळ टोक आपण आज गाठलेलं आहे.
              स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाला एका सार्वभौम लोकशाही गणराज्य देशाचा दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा आपण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचे नेमकं भान आपण सोडलेले आहे.हे सांगायला आपल्याला कुण्या तत्ववेत्याची गरज नाही.खरंच आपल्याला आपली लोकशाही पूर्ण कळलेली आहे काय ? युरोप अथवा अमेरिकेशी तुलना करताना नक्कीच आपल्याला अंतर्मुख होणे आवश्यक आहे. आजच्या आपल्या लोकशाहीतील वास्तव हे कल्पनेपेक्षा जरा निराळेच आहे.थोडा बारकाईने विचार केल्यास आपल्याला कळून येईल की,आपण आपला देश चालवत आहोत हीच भावना लोकांमधून लोप पावत आहे.सरकारवर टीका करण्यातच आपण स्वतःला धन्य मानत आहोत.मग सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो.आजच्या घडीला सरकार आणि जनता यांच्यातील दरी तीव्रतेने वाढत आहे.दर पाच वर्षांनी मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य संपले अशी एक भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.सरकारकडून काम करवून घेणे व त्यासाठी रेटा वाढविणे,विविध लोकशाही मार्गाने सरकारवर दबाव वाढविणे इ.गोष्टीचा जनतेला विसर पडलेला दिसत आहे..
         उठसूट व्यवस्थेवर टीका करणे व देशाला नावे ठेवणे खूप सोपे असते.व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा व्यवस्था बदलण्याचा निग्रह करणे महत्वाचं आहे.कुणा एकट्या दुकट्याच्या बदलल्याने व्यवस्था बदलत नसते.पण तसे केल्यामुळे व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला इतरांना बोलण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होत असतो.आपला वैचारिक व सामाजिक दुबळेपणा गैर व्यवहाराला बळ देत असतो.हाच गैर व्यवहार देशाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो.ज्या देशातील जनतेला साधं बाटलीबंद पाणी देखील विदेशी कंपनीचे लागते,तेच लोक मग कधीकधी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर घोळका करून वृत्तवाहिन्यासमोर “परिवर्तनाची नांदी आली आहे” असे म्हणून आपल्या देशसेवेची हौस भागवून घेतात.याचाच फायदा सरकार व त्यांचे हस्तक घेत असतात.जनतेला नेमक्या आपल्या समस्येची जाण झाली की,जनता रस्त्यावर उतरणार हे सरकारी यंत्रणांना आधीच ठाऊक असते.त्यामुळे त्यांना अशी जाणीव होऊच नये यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जातात.मग कुठलातरी भावनिक विषय हाताळून जनतेला व्यस्त ठेवल्या जाते.
          लोकशाहीचा मान,सन्मान,लोकशाहीची महत्ता ही त्या देशातील जनतेवर अवलंबून असते.कुणीतरी मसिहा येईल व आमचा उद्धार करेल हीच घातक भावना आपल्याला विनाशाकडे घेऊन जात आहे.बहुतांश लोकांना आरामदायक जीवन जगायचे आहे पण त्यासाठी मात्र श्रम करण्याची तयारी नाही.कष्ट पण नको आणि कुठलीही जबाबदारी नको.सरकरकडूनच सर्व मोफत हवं आहे.त्यामुळे हळूहळू श्रममूल्य कमी होत आहे.आपले वर्तन आणि विचार  लोकशाहीला कमजोर करत आहेत.जगात प्रत्येक गोष्टीला अंत आहे मग आपल्या वर्तणुकीला का अंत असू नये.? देशातील कार्यरत श्रममूल्य हाच त्या देशाचा कणा असतो.नेमकं आपण आशावादी असावं तरी किती? बदल सगळ्यांनाच हवा आहे पण आपला वेळ एकमेकांकडे बोटे दाखविण्यातच जात आहे..
           दैनंदिन वृत्तपत्र चाळले तरी आपणास मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या दिसतात.“चलता है" “Everything is fair in love & war" या तद्दन भंपक विधानावर विश्वास ठेवणारी आपली कृतीशून्यता देशाला भ्रष्टाचाराच्या खोल दरीत ढकलत आहे.ह्या भ्रष्टाचाराची सुरुवात होते ती आपल्या घरून..शालेय अभ्यासक्रम जड झाला म्हणून मुलांना आपण शिकवणी लावून देतो आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराची शिकवणी आपल्या घरी अहोरात्र सुरू असते..“ बेटा homework किजिये, फिर आपको चॉकलेट मिलेंगे" हे वाक्य आपण घरोघरी ऐकत असतो.सुरुवात होते ती इथूनच.आता हे लोण सर्वत्र पोहचले आहे.चॉकलेट दिलं की आपलं कोणतही काम होऊ शकतं हा समज आता दृढ झाला आहे.आपला समज आता सर्वसामान्य सर्वमान्य असा व्यवहार झाला आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही आता बेशिस्त झाली आहे.तेवढीच सोयीस्कर संवेदनशील व संवेदनाहीन पण झालेली आहे.समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्रचंड विरोधाभास दिसून येतो.एखाद्या घटनेवर जनतेच्या प्रतिक्रिया ह्या सोयीस्कर असतात.घडणाऱ्या गोष्टीत आपला स्वार्थ नुकसान यांचा हिशोब लावूनच मग आपल्या प्रतिक्रिया उमटतात.सरकारला जनतेचा धाक वाटला पाहिजे तरच आपल्याला लोकशाही म्हणविण्याचा अधिकार आहे.
      भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रचंड विरोधात असलेले विन्स्टंन चर्चिल यांनी त्यावेळी भारताचे भविष्य वर्तविले होते.ते याप्रमाणे India is not a nation, it is huge population.
(“Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water would be taxed in India”. वरील वाक्यातील आक्षेपार्ह शब्द सोडल्यास त्यातील अर्थ समजून त्यावर आत्मचिंतन करणे महत्वाचे आहे.सदर वाक्य हे त्या काळातील परिस्थितीचे आकलन करून केले गेलेले होते.जे आजही आपल्या वास्तव जीवनाची कथा सांगत आहे.लोकहीत व समाजहित ही भावना मागे पडून त्याची जागा आता वैयक्तिक स्वार्थाने घेतलेली आहे.आपल्या जीवनाच्या केंद्रबिंदूची जागा वैयक्तिक स्वार्थाने व्यापलेली आहे.हा वैयक्तिक स्वार्थच देशातील लोकशाहीला मारक ठरू पाहत आहे.पण आजूबाजूला नजर टाकल्यास अजूनही असे काही सत्पुरुष आहेत जे स्वार्थ बाजूला सोडून फक्त देशभावना डोळ्यासमोर ठेऊन आपले सत्कार्य करत आहेत व देशाला एक नवीन ऊर्जा देत आहे.लोकनियुक्त सरकारे ही कधीच वाईट नसतात,कमी पडते ती जनतेची दबावशक्ती व एकी.व्यवस्थेतील ज्या गोष्टी वाईट म्हणून आपण हक्काने त्यावर टीका करत; त्याच गोष्टींमध्ये सुधारणा करणे ही आपली जबाबदारी आहे.त्यासाठी आपल्या प्रत्येकालाच खारीचा वाटा उचलावा लागेल तरच आपल्या स्वप्नातील भारत निर्माण होईल.
            सरकारी ध्येय धोरणे आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात.( हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे) पण आखलेल्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करवून घेणे ही आपली जबाबदारी आहे.बाबा राहिमच्या गुफेच्या चर्चा करण्यापेक्षा वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यावरही आज मंथन होणे गरजेचे आहे.यावर देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका पार पाडणे महत्वाचे आहे.द्रुक श्राव्य वृत्तवाहिन्यांवर विश्वास ठेवावा असे वातावरण आजतरी आपल्या देशात नाही.हा विश्वास त्यांनी केव्हाच गमावला आहे.आपला समृद्ध आणि वैभवशाली इतिहास सामान्य माणसापर्यंत पोहचला पाहिजे.मग शेवटी जबादारी वाचते ती आपली.सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सत्यात आणायची असेल तर,बदल हा आपल्यापासून सुरू करावाच लागेल.ही जबाबदारी जर आपण घेणार नसू तर उगाच पान ठेल्यावर बसून तोंडात मूठभर मावा भरून सर्वत्र पिक मारत सरकारवर टिका करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.आपल्याला चर्चिलचे ते वरील विधान खोटे ठरवायचे आहे.अन्यथा इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही.त्याच चर्चिलने एक सत्यवचन सांगून ठेवले आहे.“ जो देश आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही."

-गणेश