बोधकथा

Saturday 19 October 2019

एक पत्र.... आठवणींना..

         हल्ली भेट नाही होत आहे गं आपली. तशी तेव्हा ही नव्हती होत म्हणा.... वीस वर्षांपूर्वी कॉलेजला एका वर्गात बसायचो किंवा चुकून बोलायचो तीच आपली भेट होती...किती त्या आठवणी..। नंतर आपल्या वाटा बदलल्या...तेव्हा आपल्याजवळ मोबाईल नव्हता ना ! असता तर किती बरं झालं असतं.रोज msg करता आला असता.तुला त्रास देता आला असता, रोज तुला बघता आला असतं..पण बर झालं नव्हता तो मोबाईल ; नाहीतर तुझ्या आठवणी मनात कश्या जपता आल्या असत्या...आता तर आठवणी पण एका क्लिक वर गायब होतात. जग किती बदललंय ना ? तेव्हा सायकलने एखाद्याच्या घरी गेलो तरी मित्र भेटायचा...आता म्हणे जग जवळ आलंय ?? जग हे एक खेडं झालंय पण येथे सगळेच अनोळखी झाले आहेत...आता कुणीच भेटत नाहीत. अगदी भेटायचं ठरवलं तरी भेट नाही होत..
         आता रोजच तू कॉलेजच्या ग्रुपवर दिसतेस अप्रत्यक्ष बोलतेस.किती बदल झाला आहे आता.सगळं कसं बदललं आहे ना..तू आणि मी पण. तुझ्या सतत बदलणाऱ्या dp वरून हळू हळू उलगडत चाललीयस तू  आणि अगदी तुझं वागणं सुद्धा. आता किती बोलकी दिसतेस ना तु ; पण तुझे डोळे मात्र अजूनही अबोल दिसतात हं कदाचित त्यांना व्यक्त व्हायचंही असेल पण तू शिताफीने टाळतेस ते आता. 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि त्यात तुझं सौंदर्य... पण एक सांगू किती केविलवाणी दिसतेस गं तू....भूतकाळ आपला पाठलाग सोडत नाही आहे आणि तुला भविष्याचा वेध घ्यायचा आहे त्या मधला तुझा हा dp. इतक्या वर्षात काय घडलंय काय बिघडलंय काही कळायला मार्ग नाही...आणि  मनातले भाव पण तू कधी चेहऱ्यावर आणत नाहीस....मी कशी  मजेत आहे हेच सांगायचं आहे ना तुला...आता हे ही कसब अवगत केलंस वाटते...म्हणूनच मला नेहमी वाटायचं चित्रपटात काम करावं तू.
        तू मला भेटावं असंही म्हणणं नाही माझं...साधं बोलणंही होत नाही आपलं....याचा अर्थ आपल्यातील संवाद तुटला असही नाही...आपलं नातं तुटलं म्हणावं तर तेही शक्य नाही...तुझ्यात बदल झाला असंही नाही आणि जग जसं मला आधी म्हणायचे मी अजूनही तसाच आहे.....आजकाल तर online image building होत असते पण तिथेही मी कमीच पडलो..नाही जमत मला हे सगळं...म्हणूनच कदाचित....आपल्यातील संवाद संपलाय...बस्स आपण  थोडं आपल्या जगण्यात बदल केलाय. का तू स्वतःला अस बंदिस्त करून घेतलंय...तू स्वतःला जगापासून अलिप्त ठेऊ शकतेस पण  स्वतःला स्वतःपासून अलिप्त ठेवणं जमेल काय तुला ??
       तुझं बोलणं हसणं अगदी खळखळून वाहणाऱ्या झऱ्यासारखं होतं. तुझं असं साचलेलं मला आवडेल काय? मनातील भावनांना वाट मोकळी करून दे ना एकदा. तुझं हे तुझ्या स्वभावाविरुद्ध भावनांना बांध घातलेला नाही आवडत मला.एकदा बोलून तर बघ..बर वाटेल तुला आणि मला पण...वाहणाऱ्या झऱ्याचं असं अचानक थांबणं आणि त्याचं असं साचलेपण बेचैन करत आहे मला. नेमक झालंय काय हे विचारायचं म्हटलं तर तेही कठीण...संवादाचे सारे मार्ग आडवळणाचे झालेत...की तु हेतुपुरसर सर्व मार्ग बंद केलेस कळायला मार्ग नाही...
       मला वाटतं हे सगळं अगदी ठरवून करते आहेस तू ...अगं किती दिवस शांत राहशील आणि किती मनातल्या गोष्टींना अशी समाधी देणार आहेस...आणि हो आठवणी तर राहतील ना कायमच्या मनात कोरलेल्या...आणि हे सर्व करताना त्रास नाही का होणार तुला....?ह्या जाणीवेनेच काळजी वाटतेय मला तुझी...पण असो तुला आता आधार आहे आणि तू पण  आता खंबीर झाली आहेस....काळानुरूप .पण तू दिसतेस म्हणून बरं वाटतं...अशीच दिसत रहा.माझे डोळे मिटेपर्यंत....आणखी मागण्यासारखं काहीच नाही आता....
                         तोच तुझा.....

© गणेश

No comments:

Post a Comment