बोधकथा

Monday 5 August 2019

ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होताना ( कलम 370 )

         आजचा दिवस खरंच प्रचंड ऐतिहासिक म्हणावा लागेल.मागील आठवड्यात घडलेला घटनाक्रम बघितला तर सर्वांनाच याचा अंदाज लागला होता...अमरनाथ यात्रा रद्द करणे, कश्मीर मध्ये तैनात केलेली अतिरिक्त सुरक्षाबले, पर्यटकांना तात्काळ हॉटेल्स रिकामे करण्याचे दिलेले आदेश हे सारेच काहीतरी सुचवत होते आणि झालेही तसेच. आज अत्यंत वादग्रस्त कलम 370 काश्मीरमधून हटविण्यात आले. सोबतच कलम 35 A सुद्धा संपुष्टात आले. आज संसदेत देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांचे भाषण किंवा त्यांनी मांडलेला मसुदा अगदी कान लावून ऐकण्यासारखा होता. ( विरोधक नेहमीप्रमाणे या निर्णयाला विरोध करत होते.आपल्याला दुसऱ्यांदा जनतेने विरोधी पक्षातच का बसविले ; याचे यांना अजूनही भान आलेले नाही. ) आपण इतिहासाचे साक्षीदार झालोत ही गोष्ट मनाला सुखावून गेली. अमितभाईंचा एक अंदाज आज मला खूप आवडला. ते संसदेत कुणाला विचारायला उभे राहत नाहीत तर घेतलेले निर्णय खंबीरपणे सांगायला उभे राहतात ; एव्हाना त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली असते. त्यामुळे विरोधक पार हतबल झालेले असतात, आणि नौटंकीबाज पुरोगाम्यांकडे तोंड लपविण्याशिवाय काही पर्याय राहत नाही..आता काश्मीर संवैधानिक अर्थाने भारताचे अविभाज्य अंग बनलेलं आहे... आधीही होतंच पण त्यांची घटना, त्यांचा ध्वज, त्यांना दुहेरी नागरिकत्व इ. खूप सुविधा होत्या. आज ते सर्व संपुष्टात येऊन आता तेथे आपला राष्ट्रध्वज डौलात फडकणार. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अखंड भारताच्या दिशेने पडलेलं हे नुकतंच पहिलं पाऊल आहे...अजून पाकव्याप्त काश्मीर घेणे बाकी आहे. सिंध,गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांतसुदधा आपल्याला साद घालत आहेत. गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्तीची. आपण लवकरच त्यादृष्टीने पाऊले उचलू याबद्दल विश्वास आहे..कारण माझा भारत आता बदलत आहे..
         मुळात कश्मीर ही कधी समस्या नव्हतीच, तो हजारो वर्षापासून भारताचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. ज्यांनी शालेय इतिहास वगळता थोडी ऐतिहासिक भटकंती केली त्यांना  हे लगेच कळून येईल. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी पाचशेच्या वर संस्थाने आपल्या राजकीय कुशलतेने भारतात विलीन करून घेतलीत फक्त जम्मू आणि कश्मीर हेच असे संस्थान होते जे भारतात विलीनीकरण करण्याची जबाबदारी सरदार पटेल यांच्याकडे नव्हती आणि आपला देशाचा घात झाला तो येथेच. फाळणीची बोलणी करण्यासाठी तत्कालीन व्हाइसरॉय माउंटबॅटन समोर बॅरिस्टर वीर सावरकर आणि  बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे निष्णात व्यवहार चतुर महापुरुष असते तर नक्कीच चित्र वेगळे असते आणि त्यावेळी झालेला नरसंहार थांबविता आला असता..पण तत्कालीन नेतृत्वाच्या राजकारणाला व्यवहाराची जोड नव्हती हे आपल्याला मान्य करावेच लागेल...फाळणी ही तत्कालीन मागणी नव्हती तर तो एक हेतुपुरस्सर रचण्यात आलेला कट होता. फाळणीची बिजे खूप खोलवर रुजलेली होती. पण तिकडे साफ दुर्लक्ष करून भोळा आशावाद ठेऊन शांततेची कबुतरे उडवायची हौस असलेलं नेतृत्व आणि स्वप्नरंजनांत गुंग असलेले महान नेते असले ; म्हणजे लाखो लोकांच्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या भळभळत्या जखमा तेवढ्या शिल्लक राहतात. कश्मीर म्हणजे नख लावून लावून मोठी केलेली जखम. टुकार आणि पुचाट शेख अब्दुल्ला कुणीतरी जिना यांना मोठं केलं कुणी ??? आणि वीर सावरकर व बाबासाहेब आंबेडकर यांना दूर लोटलं कुणी ??? याचं उत्तर शोधलं की, आपल्याला सर्व उत्तरे सापडतील. स्वातंत्र्यानंतर म्हणे टोळीवाल्यानी भारतावर म्हणजेच काश्मीरवर आक्रमण केले असे आपण नेहमी वाचतो. हे टोळीवाले म्हणजे कोण ???? तर हे जिनांच्या नेतृत्वातील पाक सैन्य होते..आपल्याला कधी हे सांगितलं गेलं काय ? म्हणजे येथेसुद्धा जिनाभाईवर ??? आरोप लागणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली गेली. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी चाललेली ही निरर्थक धडपड होती...तिकडे बंगालमध्ये सुरहावर्दीच्या पापावर पांघरून घालणारे कोण होते ?? याचा शोध घेतला की , आपल्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत नाकारायचा आणि दुसरीकडे एका सार्वभौम देशात वेगळी घटना आणि एका राज्यासाठी वेगळी घटना तसेच ध्वज लावण्याचे पातक कुणी केले ?? त्यामागे कोण होते ??? हे येथे सहज लिहिता आले असते. पण ते वाचकांनी स्वतः शोधले तर उत्तम म्हणजे आपल्या अनेक धारणा दूर होतील..संसदेत जेव्हा कलम ३७० च्या बाबतीत चर्चेला सुरुवात झाली तेव्हा प्रचंड प्रमाणात उहापोह झाला. डॉ आंबेडकरांचा याला खूप मोठा विरोध होतात आणि त्यांनी थेट शेख अब्दुल्ला यांना असं म्हटलं होतं, "तुम्हाला भारताकडून सुरक्षा, पैसे, रस्ते, सामान हक्क  हवे आहेत पण भारताच्या नागरिकाला काश्मीरमध्ये कुठलाही हक्क नको. मी माझ्या देशाशी गद्दारी करूच शकत नाही" त्यांनी असे म्हणून कलम ड्राफ्ट करण्यास नकार दिला. पण अखेर हे वादग्रस्त कलम तयार करून लागू करण्यातच आले. भारत हा सार्वभौम लोकशाही गणराज्य आहे तर या देशात  370 हे अस्तित्वात आलेच कसे ? कलम 370 ने आपल्याला काय दिले ? हा चिंतनाचा विषय आहे. फुटीरवादी चळवळीला चालना मिळाली. काश्मिरी तरुणाला फुटीरवाद्यांनी भारताच्या मुख्य धारेत येऊच दिले नाही त्यामुळे तेथे आतंकवादला चालना मिळाली. तेथील जनतेत परकेपणाची भावना निर्माण झाली.भारताच्या संसदेने केलेला कुठलाही कायदा तेथे लागू होत नाही. त्यामुळे भारत सरकारने भारतात केलेल्या सुधारणा तेथे लागू होत नाही.उदा. सर्व शिक्षा अभियान असो वा विविध क्षेत्रात लागू असलेले आरक्षण असो. कलम 370 हे काश्मीरला भारतापासून तोडणारे आहेच शिवाय इकडे आणि तिकडे दोघांवरही अन्याय करणारे आहे. काश्मिरी तरुण सैनिकांवर दगडफेक करतात तेव्हा वाईट वाटतं.त्याचवेळी त्यांची बाजू घेऊन त्यांची माथी भडकविणारी नेते मंडळी यांची मुले मस्त विदेशात आलिशान जीवन जगत आहेत..हे कुठेतरी थांबले पाहिजे..याचीच सुरुवात केली आहे मोदी सरकारने. हे अन्यायकारक कलम रद्द करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती हवी होती ; ती आज संपूर्ण जगाने बघितले. आज काश्मिरी नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असं म्हणता येईल.
      ज्या तीव्र गतीने मोदी 2.0 सरकार कामाला लागले आहे ही गती बघता भविष्यात आणखी धडाकेबाज निर्णय होतील यात शंकाच नाही. कारण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे शहीद झालेत, फाळणीनंतर नाहक लाखो बळी गेलेत त्यांचा हा देश सूर्य - चंद्र असेपर्यंत ऋणी आहे व राहील त्यांचे आपल्याला पांग फेडायचे आहेत...एकट्या काश्मीरमध्ये आजपर्यंत आपले हजारो सैनिक शहीद झाले आहेत आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत...ते अमर शहीद  आता परत नाही येणार आहेत पण भविष्यात काश्मीरमध्ये आपले बहादूर जवान हकनाक बळी पडणार नाहीत अशी आशा आहे..ह्या एक निर्णयाने फुटीरवाद्यांचा नांग्या ठेचल्या गेल्यात यात काही वाद नाही. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाला आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहली गेली.थोडा वेळ मिळाला तर मा. अमितभाईंनी देशांतर्गत असलेले पाक समर्थक, तुकडे गँग, मेणबत्ती गँग, छद्म पुरोगामी यांच्याकडे पण  लक्ष द्यावे..आणि हो ज्यांना या देशात भीती वाटते त्यांची भीतीसुद्धा दूर करावी...
        इतिहास आपल्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. शांततेची कबुतरे उडविण्याच्या नादात भारतीय इतिहासाने खूप वाईट प्रसंग बघितले आहेत...परंतु भविष्यात लिहिला जाणारा इतिहास घडविण्याची जबादारी भारतीय जनतेने आपल्या खांद्यावर दिली आहे आणि तो इतिहास समृद्ध आणि बलशाली असावा असे मला वाटते कारण “जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही.”
जय हिंद.
अखंड हिंदुस्थान हेच आमुचे स्वप्न....
- गणेश

5 comments: