बोधकथा

Wednesday 5 February 2020

ह्या नराधमांचे काय करायचे...?

    समाजमन सुन्न करणाऱ्या हिंगणघाट येथील निषेधार्ह घटनेतील आरोपी नगराळेला नक्कीच फाशी व्हायला हवी यात दुमत असूच शकत नाही...पण आपल्या आजूबाजूला रोज आपणास भेटणारे पांढरपेशे विकृत नराधम यांचं काय करायचं...CAA व NRC सारख्या विषयावर आपली बुद्धी पाजळणारे कथित बुद्धीजीवी ; जेथे रोज संविधानाचे दाखले देऊन आपली राजकीय पोळी शेकली जाते आणि “ बेटी बचाओ बेटी पढाओ ” चळवळ राबविली जाते या आपल्या देशात खरंच स्त्री सुरक्षित आहे काय ??? आणि ती स्वतःला असुरक्षित समजत असेल तर मग दोष द्यायचा कुणाला ??? की, अजूनही आपण रानटी अवस्थेत जगत आहोत. नौकरी निमित्य घराबाहेर पडणाऱ्या देशातील करोडो स्त्रिया त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर आपण कधी चर्चा करणार आहोत ??? प्रवास करताना  एखादी महिला आपल्या बसमध्ये किंवा रेल्वेत बसली की, तिला टोमणे मारणारे, विकृत शेरेबाजी करणारे असे कित्येक कुबुद्धी प्राणी आपल्याला अवतीभोवती दिसत असतात. त्यात जर महिला ओळखीची असली तर तिच्या खाजगी आयुष्याचा तिच्या पाठीमागे उद्धार करणारी नीच मनोवृत्तीची माणसे यांचं काय करायचं...आपल्याच सोबत खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करणारी महिला आपल्यातच असुरक्षित असेल तर इतर महिला व त्यांना रोज सहन करावा लागणारा अपमान याचा विचार न केलेला बरा... शिक्षणाने कामधंदा मिळतो पण सुसंस्कृतपणा हा जो गुण लागतो तो आणायचा कोठून ???
     एकदा प्रत्येकाने आत्मचिंतन नक्की करावे की , खरंच माझ्यासोबत सहप्रवासी असलेल्या महिला भगिनींशी माझे वर्तन कसे आहे ? त्यांच्यासमोर त्यांना हेतुपुरस्सर ऐकू जाईल या भाषेत मी आपल्या सहकाऱ्यांशी कुठला वार्तालाप  करतो..एखाद्या महिलेला मी शेरेबाजी करतो तेव्हा तिच्या मनावर काय आघात होत असेल...असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आज लिहिता येईल...सामूहिक शेरेबाजी करून दात विचकावताना आपल्याला समाज बघत असतो याचसुद्धा भान आपल्याला राहू नये...म्हणजे किती हा निगरगट्टपणा..हिंगणघाट येथील नराधमाला शासन  नक्कीच होईल पण आपल्यातील सुशिक्षित नराधमांना शिक्षा कोण करणार ??? हिंगणघाट येथील निषेधार्ह घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटत असताना आणि सोशल मिडियावर आपण आपला राग व्यक्त करत आहोतच व यासमोर जाऊन आपण महिलांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व समजून त्यांना शांततामय जीवन जगण्याचा अधिकार देणार आहोत काय ??? शेवटी निर्णय आपला आहे..

  - गणेश

2 comments: