बोधकथा

Thursday 6 June 2019

स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव

     “ देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो...”
         - स्वातंत्र्यवीर सावरकर
          आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात झोकून दिले त्या महान समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वरील वाक्य अक्षरशः खरे करून दाखविले.स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७२ वर्षानंतरही वीर सावरकर संपूर्ण मानव समाजाला राष्ट्रप्रेम आणि निस्सिम त्यागाची प्रेरणा देत आहेत.पण त्यांच्या या कार्याचा त्यांच्या हयातीत आणि स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत योग्य तो सन्मान केला गेला नाही ही खंत आजही मनाला चटका लावून जाते किंबहुना तसे हेतुपुरस्सर होऊ दिले गेले नाही असे म्हणणे योग्य ठरेल. वीर सावरकर यांच्याविषयी सदैव गैरसमज पसरविण्यात काही लोकांनी धन्यता मानली.पण त्यांना आपल्या हृदयात स्थान देणाऱ्या व्यक्तींनी आजही त्यांचे मोठेपण स्वतःच्या मनात जपले आहे. त्यांचे कार्य युगानुयुगे संपूर्ण मानव जातीस प्रेरणा देत राहील यात तिळमात्र शंका नाही.
          येत्या दशकात पुनःश्च भारतीय राष्ट्रवाद मूळ धरत असताना या राष्ट्रवादाचा वैचारिक पाया रचणारे वीर सावरकर त्यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर आलेत.वीर सावरकर यांच्यावर आजवर प्रचंड साहित्य प्रसिद्ध झाले आहे पण त्यांच्यावर घेण्यात येणाऱ्या धादांत खोट्या आक्षेपाचे सप्रमाण खंडण करण्याचा यशस्वी प्रयत्न “ स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव ” या पुस्तकात अत्यंत तर्कपूर्ण भाषेत करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे सूर्याला त्याचे अस्तित्व सिद्ध करावे लागत नाही त्याप्रमाणे मूठभर लोक वीर सावरकरांचे मोठेपण नाकारून त्यांना लहान करू शकत नाहीत.तरीपण या पुस्तकाचे लेखक श्री अक्षय जोग यांनी वीर सावरकरांविषयी पसरविले गेलेले गैरसमज व त्यामुळे तयार झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सर्व आक्षेपावर उत्तरे देताना वाचकांना एकाच पुस्तकात सप्रमाण माहिती मिळावी यासाठी अथक परिश्रम घेऊन मुत्युंजय प्रकाशन,पुणे यांच्या मदतीने सदर पुस्तक आपल्या भेटीस  आणले आहे.
            सध्या मराठी साहित्य विश्वात सखोल अभ्यासपूर्ण व पुराव्यासह लेखन करण्याचा कल वाढत आहे. त्याच मालिकेतील हे पुस्तक आहे. वीर सावरकर यांच्यासारखे निरलस देशभक्त आपल्या भारत भूमीला लाभले हे आपले सौभाग्य. पण काही बेगडी,महान?? लोकांनी वीर सावरकरांच्या मातृभूमीच्या निष्ठेला सतत नख लावण्याचं कार्य केलं त्यात ते अजूनही यशस्वी होऊ शकले नाहीत व भविष्यात होणारही नाहीत ही त्यांची खरी खंत आहे. सावरकर यांनी सदैव लोकहीताचा विचार केला व राष्ट्र सर्वतोपरी हे त्यांचे एकमेव ध्येय होते.त्यासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्राला अर्पण केले.सदर पुस्तकात वीर सावरकर यांच्यावर जे प्रमुख खोटे आरोप केले जातात त्या सर्व आरोपांना स्वतंत्र प्रकरणात अगदी मुद्देसूद उत्तरे दिलेली आहेत.
        स्वातंत्रवीर सावरकर यांनी अंदमान येथे कैदेत असताना इंग्रजांकडे खरंच क्षमा याचना केली होती काय ? त्यांचं देशकार्य, भारतीय तिरंगा ध्वज व त्यांची भूमिका,मानवतावादी धोरण,अल्पसंख्याक धोरण,सावरकर आणि दुसरे महायुद्ध,चले जाव आंदोलन आणि सावरकर,सावरकर आणि द्विराष्ट्रवाद इ. अनेक प्रकरणातून लेखकांनी सावरकरांची भूमिका देशाला कशी हितकारक होती याचे पुराव्यासह अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे.यासाठी त्यांनी विविध ग्रंथ,ब्रिटिश गुप्तचर अहवाल,मा.भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल, असे संदर्भ दिलेले आहेत. हे पुस्तक वाचत असताना वीर सावरकर यांच्याविषयी सत्य काही वेगळे असताना चुकीचे भ्रम कसे पसरविण्यात आलेत हे आपल्या लक्षात येते.सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय ? त्यांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र काय होते ?? हिटलर, फॅसिस्टवाद,ज्यू राष्ट्र याविषयी त्यांचे रोखठोक विचार आपणास या पुस्तकातून कळतात. म.गांधी हत्येच्या कटातून निर्दोष मुक्तता होऊनही आजही त्यांचे नाव या कटात गोवण्यात कुणाला फायदा होत आहे या सर्वांचा उलगडा आपणास हळूहळू होत जातो.सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होता हे येथे विशेष नमूद करावेसे वाटते.
         संपूर्ण पुस्तकात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक थोर पुरुषांचा उल्लेख आलेला आहे.म.गांधींशी असलेले त्यांचे वैचारीक मतभेद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले त्यांचे संबंध,पं.नेहरू,सरदार पटेल,यांच्याविषयी असलेले यांचे मत इ. परंतु लेखक महोदयांनी सदर पुस्तकात या थोर महापुरुषांचा कुठेही अपमान होणार नाही अशी काळजी घेतली आहे.त्यांचे मोठेपण अबाधित ठेवतानाच सावरकर यांचे महान कार्य आपल्यासमोर प्रस्तुत केलं आहे. १९४२ च्या सातंत्रलढ्यात सावरकरांची भूमिका काय होती नेमकं त्यानं काय अभिप्रेत होते तसेच भारतीय युवकांनी ब्रिटिश सैनिकांत सामील का झाले पाहिजे या मागील वीर सावरकर यांची भूमिका स्तिमित करणारी होती. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास नसणारी काही संकुचित मनोवृत्तीची माणसे वीर सावरकरांवर नेहमीच टीका करण्यात धन्यता मानतात. ती त्यांची राजकीय गरज असू शकते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभ्यासकांना या पुस्तकाने एक खंबीर पुरावा उपलब्ध झाला आहे..याबाबत कुठलीही शंका नाही.
        मराठी साहित्य विश्व कलाटणी घेत असताना आता लेखकही वाचकांना सहज उपलब्ध होत आहेत. वाचकांच्या शंकाचे निरसन करण्यात लेखक सदैव अग्रेसर असतात.या पुस्तकाच्या निमित्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्त्यकी सावरकर यांच्याशी बोलण्याचा योग आला.हे मी माझे सौभाग्य समजतो..या पुस्तकाचे लेखक श्री अक्षय जोग तसेच श्री सात्त्यकी सावरकर यांनी व्हाट्स एप आणि फेसबुकवर प्रत्येकवेळी अत्यंत व्यसत्तेतून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.समाज माध्यमावर वाचन चळवळ फोफावत आहे ही एक दिलासा देणारी बाब आहे...मलाही येथूनच या पुस्तकाविषयी माहिती मिळाली. मराठी वाचन चळवळीचा प्रसार करण्यास फेसबुक आणि व्हाट्स एपचा खूप छान उपयोग होत आहे.प्रकाशनपूर्व नोंदणीतच ज्या पुस्तकाच्या जवळपास १५०० प्रतींची नोंदणी झाली; असे हे अभासपूर्ण पुस्तक प्रत्येक सावरकर प्रेमी व अभ्यासकाने तसेच टिकाकारांनी सुद्धा अवश्य वाचावे......तरच कालजयी वीर सावरकर आपणास कळतील आणि उमजतील....
         धन्यवाद.
पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव
लेखक - श्री अक्षय जोग
प्रकाशक - मृत्युंजय प्रकाशन, पुणे
दूरभाष क्र. ९९२१३५१२५२
       
           
      
    

No comments:

Post a Comment