बोधकथा

Wednesday 27 June 2018

प्रसारमाध्यमे आणि आमची राष्ट्रीय नकारात्मकता.....

       आपल्या भारतात यदाकदाचित यादवी अथवा गृहयुद्ध पेटलेच तर त्याला प्रत्यक्ष कोणताही धर्म जबाबदार असणार नाही. तर त्या भीषण परिस्थितीला फक्त आणि फक्त भारतीय प्रसारमाध्यमे जबाबदार असतील.यात आघाडीवर आहेत आपल्या बेजबाबदार वृत्तवाहिन्या आणि आपला आवडता सोशल मीडिया.वृत्तवाहिन्यांचे प्रशिक्षित?पत्रकार असोत वा सोशल मिडीयातील स्वयंघोषित एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला आपली अक्कल गहाण ठेवलेले विचारवंत;यांना एकाच रोगाने ग्रासले आहे ते म्हणजे हवी तितकी या देशाची बदनामी करणे व त्याबदल्यात मिळणारी विदेशी खिरापत लाटणे...
        मागील काही वर्षात एकंदरीत असेच चित्र रंगवले जात आहे की,भारत देशात काहीच ठीक नाही,प्रचारकी मिडिया दिवसरात्र फक्त आणि फक्त नकारात्मक व सनसनाटी बातम्या रंगविण्यात मग्न आहे.दिल्ली व दिल्ली NCR च्या बाहेर एक जग आहे हे यांच्या गावीही नसते.तामिळनाडू राज्यातील पालिपट्टी या छोट्याश्या गावातील रिफाथ शरूक या 18 वर्षीय मुलाने 2017 साली जगातील सर्वात वजनाने हलका ( 64 ग्रॅम) एक उपग्रह तयार केला.अमेरीकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेने त्याच्या या कार्याची योग्य ती दखल घेतली.त्याची नोंद फक्त काही वृत्तपत्राने घेतली पण आपल्या स्वतःला नंबर 1 समजणाऱ्या कोणत्याही वृत्तवाहिनीने त्याची साधी दखलही घेतली नाही.संपूर्ण भारतीयांसाठी ही प्रेरणादायी बाब होती पण याचवेळी आमच्या तमाम वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आपला राष्ट्रीय बालक तैमुरची शी धुण्यात व्यस्त होते.त्यांचेही बरोबर आहे म्हणायला हरकत नाही,कारण त्याची शी धुण्याचे यांना त्याच्या अब्बा आणि सुपर मॉमच्या PR कंपनीकडून योग्य ते अर्थकारण करण्यात येते.बिचारा रिफाथ पडला गरीब.
          India मध्ये एक दुर्लक्षित भारत वसतो हेच आजचे सत्य आहे.इंडियामध्ये सुपर मॉमची संकल्पना वेगळी आहे तर इकडे भारतात भर उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत आपल्या बाळाला पाळण्यात झोपवून आपल्या रक्ताचे पाणी करणारी माऊली अथवा विविध नौकरी करणाऱ्या स्त्रिया यांना सुपर मॉमचा दर्जा नसतो कारण यामागे ग्लॅमर नसतं.आदिवासींचे कुपोषण,त्यांची जीवन जगण्याची रोजची होरपळ,शैक्षणिक व सामाजिक सुविधांचा उडालेला बोजवारा याचे यांना कुठलेही भान नाही.काळजी आहे ती तैमुरच्या आईच्या वाढलेल्या वजनाची.त्यावर एक-एक तास चर्चा घडते आणि इकडे गरोदर माता कुपोषणामुळे मृत्यूला सामोरी जाते..नुकतेच एक पासपोर्ट प्रकरण माध्यमात गाजले.कुठलीही वस्तुस्थिती न जाणता आपल्या माध्यमांनी त्या सरकारी अधिकाऱ्याला दोषी ठरवून देशात असहिष्णुता वाढत चालली आहे म्हणून ढोल बडवायला सुरुवात केली.दोन तीन दिवस गदारोळ माजला.आता सत्य जगासमोर आले आहे तो अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करत होता.आपला मीडिया तोंडघशी पडला...काही गरज नसताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपले हसे करून घेतलेत ते वेगळे.
       सरकारी अधिकारीच हे भ्रष्टाचारी असतात आणि खोटी माहिती पुरविणारी जनता पिडित असते असेच चित्र रंगविण्यात आपले पत्रकार धन्यता मानतात.  देशात कोणता राजकारणी काय करतोय, कोण काय वादग्रस्त वक्तव्य करतोय, कुणी कुणाचा पाठिंबा काढला, कुणी कुणाला काय म्हटले, कोणत्या धर्माने काय केले, कोणत्या जातीच्या गटाने काय केले,एखाद्या पक्षाच्या तालुकाछाप उठवळ नेत्याने एखादे बिनडोक विधान केले की त्याचा सरळ राष्ट्रीय धोरणाशी जोडून त्यावर महाचर्चा घडवून आणली जाते,त्यात चर्चा कमी बौद्धिक दिवाळखोरी जास्त असते.नेमका तरुण वर्ग याच     पांचट पत्रकारितेला बळी जातो.एखाद्या पोरकट नेत्याने केलेले विधान गल्लीतून दिल्लीपर्यंत सफर करून शेवटी येथे कुठे तर आपल्या फेसबुक आणि व्हाट्स अपवर.तिकडे टी.व्ही.वर चर्चा करून तमाम बुद्धिजीवी झोपी गेले असताना आपला तरुण वर्ग आपआपल्या पक्षाचा किल्ला लढवितो.कधीकधी ही बिनबुडाची चर्चा इतकी विकोपाला जाते की वैयक्तिक सबंध खराब व्हायची वेळ येते.राजकारण्यांच्या मागे फिरणारे तरुण पाहिले की विचार येतो,काय होणार याचं? स्वतःच्या पॉकेटमणीतून वस्तीत स्वतःचेच फ्लेक्स लावणारा व आपले या या नेत्यांशी संबंध आहेत म्हणून फुशारक्या मारणारा तरुण नंतर नैराश्याच्या खाईत लोटला जातो.आपला मीडिया व राजकारणी तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना त्यांच्या मुख्य ध्येयापासून परावृत्त करत आहे.कारण आपली अक्कल गहाण ठेवणे व गुलामी करणे हा आमचा आवडता छंद आहे.
           चार पाच दिवसापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे मुख्य संस्थापक बेझोस भारतात येऊन गेले.कशाला तर अजिंठा वेरूळ लेण्यांना दुसऱ्यांदा भेट द्यायला.तो त्यांचा खाजगी दौरा होता हे मान्य पण मीडियाने यावर चर्चा घेतली काय? त्यांची कार्यपद्धती तरुणासमोर आणण्याची गरज कुणालाही वाटली नाही.रतन टाटा,अंबानी,झुकेरबर्ग यांचा जीवनप्रवास कुठे दिसतो?नांव असतं का कुठे बातम्यांच्या एखाद्या कोपऱ्यात?……… तर नाही.आमचा मीडिया अजूनही मुन्नी आणि शिलातच गुंतून पडला आहे सोबतीला राष्ट्रीय बालक तैमु.आहेच.ह्या देशात फक्त खून,बलात्कार, चोऱ्या होतात असेच नाही पण ते कधीही दिसणार नाही आणि दाखविलेच तर 5 सेकंद यांना पुरेसे असतात.राजकारणत काही चांगले झाले तर ते न दाखविता यांना सांस- बहुच्या मालिका आठवतात.
        सगळेच राजकारणी अथवा राजकारण वाईट आहे असे म्हणता नाही येणार.देशाची प्रगती यांच्याच ध्येय धोरणावर अवलंबून असते.पण म्हणून तरुणांनी किती वेळ यामागे घालवावा हाही एक संशोधनाचा विषय आहे.एखादा राजकारणी आपले आयुष्य घडवेल अशी आशा करणेही चुकीचे आहे.जे करायचे ते आपल्यालाच करायचे आहे.हे जेवढे लवकर समजले तेवढे चांगले.कारण गेलेले आयुष्य परत येत नाही.एखादी महत्वाची चर्चा करायला आपल्याला वेळ नसतो.मित्राला एखादा कॉल करायला आम्हाला वेळ नाही पण राजकारणावर,धर्मावर,जातीवर बोलायला आम्हाला अखंड वेळ आहे... कारण चोवीस तास आमच्या मेंदूवर हेतुपुरस्सर याचाच मारा होतोय.देशात ना आरक्षण धोक्यात आहे ना ही कुठला धर्म संकटात आहे.कुठेही असहिष्णुता नाही आहे आणि कुणीही अराजक नाहीत.भारतीय राज्यघटना अगदी सुरक्षित आहे.तिचा मूळ गाभा अथवा संपूर्ण राज्यघटना पूर्णपणे सुरक्षित आहे.राज्यघटना हा काही कागदाचा चिटोरा नाही जो कुणीही येऊन बदलवून टाकेल अगदी कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी हे शक्य नाही.ही आपल्या नकरात्मक मीडियाने पसरविलेली एक एक अफवा आहे....
        त्यामुळे सर्वाना आपल्या जबाबदरीचे भान असणे आवश्यक आहे.

ता.क. अजूनही औरंगाबाद येथे रेल्वेखाली चिरडून मेलेल्या गरीब मजुरांचा धर्म मिडीयाला शोधता आला नाही हे आमचे नशीब. किंबहुना ते गरीब असावेत...

जय हिंद...

गणेश

No comments:

Post a Comment