बोधकथा

Saturday, 31 December 2016

शालेय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने....

         आज खूप दिवसानंतर काहीतरी लिहावेसे वाटले.आपल्या भारत देशात लिहायला भरपूर आहे पण म्हटलं देशपातळीवरील किचकट समस्या मांडण्यापेक्षा स्थानिक पातळीवर प्रकाश टाकलेला बरा.म्हणजे जेथे आपण काम करतो तेथेच जर अंधार असेल तर आपण देशहिताच्या गोष्टी अथवा मी किती जागरूक नागरिक आहे हे वारंवार दाखविणे म्हणजे निव्वळ थोतांड आहे.काही लोकांना स्वतःला फसविणे फार आवडते.असो.
          तर लिहिण्याचे निमित्त एवढेच की आमच्या शिक्षण क्षेत्रातसुद्धा दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत असतात.लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा.सुप्त गुणांचा विकास व्हावा.नेतृत्व गुंणांचा विकास व्हावा.इ.इ.चाऊन चोथा झालेली वाक्ये या कानाने एकूण दुसऱ्या कानाने सोडून देऊन झाले की मग या स्पर्धाचा शुभारंभ होतो.विविध क्रीडा प्रकार खेळणारे छोटी मुले एकाच मैदानात जमलेली बघून एक वेगळाच अनुभव येतो.खूप दिवस आधीपासून त्यांची तयारी सुरु असते.केंद्र,बिट,तालुका ते जिल्हा स्तर असा हा क्रम असतो.
           स्पर्धा कुठलीही असो त्यात जिंकण्याची जिद्द व चढाओढ ही आलीच.विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावाच लागतो हे विद्यार्थ्यांवर बिंबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्रीडा स्पर्धा.पण तो संघर्ष निकोप व प्रामाणिक असावा याची जाणीव करून देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे.पण काही ठिकाणी याच्या अगदी उलट प्रकार दिसून येतो.बिचारे विद्यार्थी खेळण्याचा निखळ आनंद घेण्याअगोदरच त्यांच्या चमू शिक्षकांचे राजकरण सुरु होते.आपलाच संघ जिंकवा म्हणून वाटेल ते मार्ग अवलंबणारे महाभाग आपणास कमी अधिक दिसून येतात.यामधून हे महाभाग स्वतःचा उदोउदो करून घेतात.पण हेच महाभाग त्या बालमनावर आपण कोणते संस्कार घडवत आहोत याचा त्यांना विसर पडतो.    
          आपल्या संघात दुसरे खेळाडू खेळविणे,त्यास कुणी हरकत घेतली तर दुसऱ्या दिवशी अख्खा संघच बदलवून नवीन संघ उतरविणे.वैयक्तिक स्पर्धेमध्ये  दुसरेच स्पर्धक  उतरविणे, सांस्कृतिक प्रकारात तर इतका सावळा गोंधळ की कुणीही कपाळावर हात मारावा.वेळेवर निकाल घोषित न करता, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांभाळून निकालाची सोय लावणे.हे प्रकार करून झाले की,फिरता चषक मिळविण्यासाठी होणारी साठमारी....झुंडशाही हे बघून वाटते की,नकोत या स्पर्धा.सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे प्रकार निमूटपणे बघणारे आणि सहन करणारे आपण व आपली व्यवस्था.
       मग शेवटी प्रश्न हाच उरतो की ही उठाठेव कुणासाठी? आणि का? विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच नाही.कारण तसे असते तर हे प्रकार घडलेच नसते.याच उत्तर एकच आहे असे प्रकार करणारे महाभाग शुद्ध पाखंडी,भंपक,तद्दन खोटारडे व भित्रे असतात.आपला हा न्यूनगंड लपविण्यासाठी ह्या प्रवृत्ती आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या निखळ आनंदावर विरजण घालत असतात.खेळात जय पराजय हा होणारच.सगळेच जिंकण्यासाठी लढतात पण विजय नियमावर आधारित असावा.त्यामुळे पराजित खेळाडूलासुद्धा आपला पराजय मान्य करण्याचे धैर्य मिळते.भ्रष्ट मार्गाने विजय मिळवून व त्यातही विजयी उन्माद साजरा करून आपण पराभूत खेळाडूचे वा संघाचा घोर अपमान करत असतो.याचेही भान आपणास असू नये याचेच नवल वाटते.
        मूल्यशिक्षण देणारीच व्यवस्था जर अशाप्रकारे वागणार असेल तर मग आशा करायची कुणाकडून विविध परिपत्रके काढताना शासनाने " निकोप क्रीडा स्पर्धा" असे एखादे परिपत्रक काढून अश्या भंपक प्रवृत्तीपासून आम्हाला वाचवावे....हीच अपेक्षा.
         

2 comments:

K said...

मी तुमच्या मताला पूर्णपणे सहमत आहे
पण हे प्रकार बंद होतील असे मला नाही वाटत

K said...

मी तुमच्या मताला पूर्णपणे सहमत आहे
पण हे प्रकार बंद होतील असे मला नाही वाटत