बोधकथा

Wednesday, 9 November 2016

सामान्य जनतेने घडविलेला इतिहास....

    1980 नंतर या पृथ्वीतलावर पाय ठेवणारे आपण खूपच भाग्यवान आहोत अगदी संगणक क्रांती,मोबाईल क्रांती,माहिती तंत्रज्ञानातील थक्क करून सोडणारा प्रवास,1990 चे आर्थिक उदारीकरण  ते शितयुद्धानंतर संपूर्ण जगाने सौम्य केलेला प्रखर राष्ट्रवादाचा नारा आज पुनश्च तितक्याच प्रखरतेने डोके वर काढत आहे. याच राष्ट्रवादाचा नारा देऊन रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी झालेत.या साऱ्या बदलांचे  आपण साक्षीदार आहोत.हे सर्व बदल भविष्यात संपूर्ण मानव जातीवर प्रभाव टाकणारे आहेत.या बदलामध्येच संपूर्ण जगाचे एकमेकांसोबत हितसंबंध जुळलेले आहे.
       डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख यासाठी कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही निवडणूकच ऐतिहासिक अशी होती.संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीवर केंद्रित झाले होते.क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ही निवडणूक ऐतिहासिक अशीच म्हणावी लागेल.अमेरिकेला प्रथमच प्रचंड राजकीय अनुभव असलेली महिला उमेदवार निवडून इतिहास घडविता आला असता तर दुसरीकडे उभे होते ते कुठलाही अनुभव पाठीशी नसलेले  74 वर्षीय अब्जाधीश  उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प.हासुद्धा एक विक्रमच.यात बाजी मारली ती ट्रम्प यांनी.अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला.
          असं काय होत ट्रम्प यांच्यात जे अमेरिकन जनतेने अनुभवाला नाकारून एका अब्जाधीश माणसाला सरळ आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्यास मार्ग प्रशस्त करून दिला.उत्तर सोपे आणि सरळ आहे.प्रखर राष्ट्रवाद.होय,उदारमतवादी धोरणाला आता हळूहळू उतरती कळा लागत आहे.राष्ट्र सर्वोपरी हि भावना वाढीस लागत आहे कारण उदारमतवादी धोरण म्हणजे काही लोकांना खूष करण्यासाठी आपल्याच देशाच्या सार्वभौमत्त्वाला तिलांजली देण्याचा प्रकार आहे हे आता सामान्य जनतेला कळून चुकले आहे.म्हणूनच आज ट्रम्प सत्तेत आलेत असे म्हणण्यास वाव आहे.आपल्या भारतानेही ह्या अति उदारमतवादी धोरणाची जबर किंमत मोजलेली आहे.आजही तेच धोरण कायम आहे व येणाऱ्या पिढ्या त्याची किंमत मोजत आहे.
           ट्रम्प यांनी उमेदवारी मिळताच आपला एककलमी कार्यक्रम रेटण्यास सुरुवात केली.तथाकथित राजकीय विश्लेषक वा राजकारणी यांना ट्रम्प म्हणजे एक लहरी, विक्षिप्त राजकारणी वाटायचे तसे वेळोवेळी आपल्या वाचनातसुद्धा आलेले आहे.मग का बरं निवडून दिले जनतेने ट्रम्प यांना?उत्तर साधे सोपे आणि सरळ आहे.ट्रम्प यांचा स्पष्टवक्तेपणा व प्रखर राष्ट्रवाद.त्यांनी आपल्या जनतेला सुरक्षिततेची हमी दिली.जनतेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान  केले.हिलरी क्लिंटन या महिला आहेत म्हणून त्यांना मतदान करावे;अमेरिकेला प्रथम महिला राष्ट्राध्यक्षा निवडून देऊन इतिहास घडवावा असे तेथील जनतेला नाही वाटले.केवळ महिला आहे या सबबीखाली मतदान करायला ते काही भारतीय नाही.महिला आहे किंवा पूर्वजांनी देशासाठी बलिदान दिले या समजुतीला बळी पडणारे म्हणजे भारतीय.अमेरिकन नागरिकांनी केला तो शुद्ध व्यवहार.आमच्या आजच्या वर्तमानाला तुम्ही काय देणार?या एकमेव निकषावर त्यांनी मतदान केले.
            ट्रम्प निवडून येईपर्यंत कुठल्याच वृत्तपत्राने,राजकारण्याने अथवा बुद्धिजीवी वर्गाने त्यांच्या विजयाचे साधे भाकित देखील केले नाही किंवा लोकांच्या मनाचा कुणालाही सुगावा घेता आला नाही.हेही तेवढेच सत्य.किंवा असेही म्हणता येईल की सामान्य जनतेच्या मनातील जाणून घेण्याची गरज कुठल्याही वर्गाला वाटत नाही.माध्यमे किंवा तथाकथित शहाणे यांचे विचार नेहमी सामान्य जनतेच्या उलट असतात.वृत्तपत्रे जरी  स्वतः ला सामान्य जनतेचा आवाज समजत असली तरी त्यांचा आणि समाजाचा काही एक संबंध नसतो.शेवटी ती चालतात मालकाच्या आज्ञेवरच ना.भारतातील नोटबंदी याचे एक उत्तम उदाहरण आहे.सामान्य जनता भविष्यात सर्व ठीक होईल या आशेवर रांगेत उभी राहिली.त्यांची आशा खरी खोटी हे काळच ठरवेल पण ती ही वाट न बघता आमची माध्यमे आणि तथाकथित बुद्धिजीवी देशात दंगली घडविण्याच्या बेतात होते.जसे येथील नागरिक माध्यमावर विश्वास ठेवायला तयार नव्हते तसेच अमेरिकन नागरीकसुद्धा माध्यमांच्या बेताल आणि स्वतःला शहाणे समजण्याच्या प्रवृत्तीकडे ढुंकून देखील बघायला तयार नव्हते.आम्ही लोकमत तयार करतो ही माध्यमांची नशा उतरविली ती सामान्य माणसाने.
             ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांचा विजय सहन न झाल्यामुळे तेथे निदर्शने झाली जाळपोळ झाली.म्हणजे तेथेसुद्धा काही लोकांना न दिसणारी अथवा अस्तित्वात नसलेली असहिष्णुता दिसली होती असेच म्हणावे लागेल.जसे मागे आपल्याकडे झाले होते.अचानक कुठूनतरी असहिष्णुता प्रकट झाली आणि सगळे बुद्धिजीवी सैरभैर झाले होते.पण दोन्ही देशातील सामान्य जनता मात्र स्थिर होती.देश कुठलाही असो,त्याचे प्रश्न वेगवेगळे असू शकतात पण उत्तर मात्र सामान्य जनतेजवळच असते.मात्र त्याचा ठाव कुणी घेताना दिसत नाही.ट्रम्प याना ते जमले.घराणेशाही अथवा पूर्वजांच्या पुण्याईवर निवडणूक लढून त्या जिंकण्याचे दिवस आता इतिहासात जमा झाले.जनतेला हवा आहे तो वर्तमानावर आरूढ होऊन भविष्याकडे निघालेला अश्वमेघ.म्हणूनच निवडणूक तिकडली असो व इकडली,राजकारण वा समाजकारण तिकडली असो अथवा इकडली त्यावर प्रभाव टाकणारी व अगदी मूलभूत विचार करून देशाला  योग्य वळण देते ती सामान्य जनता.मग ती अमेरिकेतील असो अथवा भारतातील।।।।

No comments: