गोष्टी ऐकणे आणि ऐकवणे ही आपली नैसर्गिक आवड आहे.भारतीय संस्कृतीमध्ये गोष्ट अथवा कथेला फार मोठा इतिहास आहे.रामायण व महाभारतामध्ये अनेक उपकथा आढळतात त्यांचा योग्य ठिकाणी परिणामकारक वापर करून कथा हळूहळू समोर सरकत असते.इतर अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा उल्लेख आढळतो. यामध्ये आपणास पंचतंत्र या कथासंग्रहाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.कथा हा फार प्राचीन वाङ्मय प्रकार आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.कथेचे अनेक प्रकार आपणास आढळतात कहाणी,बोधकथा,परीकथा, इ.चा यात समावेश होतो.छोट्या बालकांचे भावविश्व अधिक रम्य करण्यासाठी शालेय शिक्षणात कथामाला हा उपक्रम नक्कीच राबविला गेला पाहिजे.
पूर्वीच्या काळात घरातील वडीलधारी माणसे सायंकाळी घरातील मुलांना आवर्जून कथा सांगायची.मुलांना चांगले वळण लागावे,त्यांच्यात भूतदया,निसर्गप्रेम,बंधुता, देशप्रेम इ.गुण वृद्धिंगत व्हावे हा त्यामागचा उद्देश असायचा.कहाणी ऐकणे हा लहान मुलांचा आवडता कार्यक्रम असतो.पूर्वी सयुंक्त कुटूंब पद्धतीत आजी आजोबा मुलांना विविध कथा सांगायच्या. यातून बालकांना घरीच मूल्यशिक्षण मिळायचे व सोबतच कौटॊबीक नातेसंबंध घट्ट होण्यास मदत मिळत असे.
प्राचीन काळात घरीच अगदी अनौपचारिक पद्धतीने मिळणारे हे मूल्यशिक्षण आज शाळांमधून देण्याची खरी गरज आहे. आधुनिक समाजात सर्वत्र नैराश्य,बेकारी,भ्रष्टाचार व चंगळवाद वाढत आहे यामुळे देशाचे अतोनात नुकसान होत आहे.याचे प्रमुख् कारण म्हणजे आपण विविध गोष्टी ,कथा यातून मिळणाऱ्या मूल्यशिक्षणाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष.विविध योजना व उपक्रम राबविताना आपण आपला अनमोल ठेवा उपेक्षित ठेवला.शालेय दैनिक परिपाठात बोधकथेचा समावेश आहे.त्यावर सर्व शाळांनी विशेष भर देणे अतिशय आवश्यक आहे.भावी समाजाचे आशादायी चित्र रेखाटण्यास या गोष्टींचा आपणास नक्कीच उपयोग होईल.
विविध कथा व गोष्टी बालमनावर उत्तम संस्कार करू शकतात.या कथा व गोष्टींची निवड आपणास मुलांचे वय व आपला गोष्ट सांगण्याचा उद्देश यांचा समन्वय साधून करावा लागेल.त्यामुळे आपल्या उपक्रमाची परिणामकारकता नक्कीच वाढेल.आजच्या काळात दूरदर्शन,mobile, सिनेमा यामुळे मुलांचा वाचनाचा कल कमी होताना दिसत आहे.विविध बाल मासिकाची विक्रीसुद्धा रोडावली आहे.यावर उपाय म्हणून शालेय ग्रंथालय पुनश्च नवीन जोमाने संचलित करावे लागेल.काही तासिका फक्त बालकथा वाचनासाठी राखून ठेवता येईल का? यावरसुद्धा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. उत्तम व दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून देऊन त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे;जेणेकरून मुलांच्या मनावर उत्तम संस्कार बिंबून ते आदर्श नागरिक बनण्यास प्रेरित होतील.
पालकांनी आपल्या पाल्याला विविध विषयावरची पुस्तके अथवा वर्तमानपत्र नियमित वाचून दाखविली पाहिजे.काही पालकांना याची सुरुवात करावीशी वाटते पण सुरुवात कुठून करावी हा प्रश्न येतो.माझ्या मते सुरुवात वर्तमानपत्रापासून करावी.अगदी सोपे आहे.वर्तमानपत्रात बालकांसाठी विशेष पान असतं ते त्यांना रोज वाचून दाखविलं पाहिजे.मुलं अगदी छोटे असेल तरी हा प्रयोग करावा.मी माझ्या अडीच वर्षाच्या मुलाला रोज वृत्तपत्र वाचून दाखवितो.मला माहिती आहे कि त्याच अजून वय नाही आणि त्याला अर्थबोध पण होत नसेल;आश्चर्य म्हणजे आता रोज तो मला वृत्तपत्र हातात आणून देतो आणि माझ्याजवळ बसतो.मी वाचतो आणि तो बोबड्या बोलात ते शब्द म्हणतो.मजा येते.माझा हा प्रयोग यशस्वीपणे सुरु आहे.
बाल साहित्य वाचनामुळे मुलांचे आई वडिलांशी नाते घट्ट होते.पुस्तकांकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.मुलांचे आंतरिक भावविश्व उलगडण्यास मदत होते.नवीन शब्द व त्यांचे अर्थ शोधण्यास मूल प्रवृत्त होतो,त्याकरिता तो पुन्हा नवीन पुस्तके चाळतो.त्याचे भाषिक ज्ञान नक्कीच वृद्धिंगत होते.वाचनामुळे बालकाला कथेची मांडणी कशी असावी?शब्द कसे जुळवावे? याचेसुद्धा ज्ञान होते.विविध प्रकारच्या वाचनामुळे मुलं स्वतःला अभिव्यक्त करू शकतो व त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो.वाचन संस्कृतीचे हेच ध्येय असायला पाहिजे.
भारत हा देश महान रत्नांची खाण आहे.विविध महापुरुषांनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाने आपल्या देशाची मान संपूर्ण जगात उंचावली आहे.अशा या महान विभूतींचे जीवनचरित्र आपल्या शालेय ग्रंथालयात असणे अतिशय आवश्यक आह.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला त्या व्यक्ती निश्चितच समाजाचे मार्गदर्शक असतात.या थोर पुरुषांचे जीवनपट शालेय जीवनात विद्यार्थ्यांना ओळख झालीच पाहिजे यादृष्टीने आपले नियोजन असले पाहिजे.उत्तम संस्कारांची सुरुवात घरातून होत असते पण त्यावर कळस चढविण्याचे काम शाळेचे व शिक्षकांचे असते.उद्याचे सक्षम नेतृत्व विकसित करण्यासाठी आपल्याला आजच बाल ग्रंथालय सुसज्ज व समृद्ध करावे लागेल.
।।।..गणेश..।।।
No comments:
Post a Comment