बोधकथा

Thursday, 13 October 2016

गोष्टींची गोष्ट....

          गोष्टी ऐकणे आणि ऐकवणे ही आपकी नैसर्गिक आवड आहे.भारतीय संस्कृतीमध्ये गोष्ट अथवा कथेला फार मोठा इतिहास आहे.रामायण व महाभारतामध्ये अनेक उपकथा आढळतात त्यांचा योग्य ठिकाणी परिणामकारक वापर करून कथा हळूहळू समोर सरकत असते.इतर अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा उल्लेख आढळतो. यामध्ये आपणास पंचतंत्र या कथासंग्रहाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.कथा हा फार प्राचीन वाङ्मय प्रकार आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.कथेचे अनेक प्रकार आपणास आढळतात कहाणी,बोधकथा,परीकथा, इ.चा यात समावेश होतो.छोट्या बालकांचे भावविश्व अधिक रम्य करण्यासाठी शालेय शिक्षणात कथामाला हा उपक्रम नक्कीच राबविला गेला पाहिजे.
       पूर्वीच्या काळात घरातील वडीलधारी माणसे सायंकाळी घरातील मुलांना आवर्जून कथा सांगायची.मुलांना चांगले वळण लागावे,त्यांच्यात भूतदया,निसर्गप्रेम,बंधुता इ.गुण वृद्धिंगत व्हावे हा त्यामागचा उद्देश असायचा.कहाणी ऐकणे हा लहान मुलांचा आवडता कार्यक्रम असतो.पूर्वी सयुंक्त कुटूंब पद्धतीत आजी आजोबा मुलांना विविध कथा सांगायच्या. यातून बालकांना घरीच मूल्यशिक्षण मिळायचे व सोबतच कौटॊबीक नातेसंबंध घट्ट होण्यास मदत मिळत असे.
          प्राचीन काळात घरीच अगदी अनौपचारिक पद्धतीने मिळणारे  हे मूल्यशिक्षण आज शाळांमधून देण्याची खरी गरज आहे. आधुनिक समाजात सर्वत्र नैराश्य,बेकारी,भ्रष्टाचार व चंगळवाद वाढत यामुळे देशाचे अतोनात नुकसान होत आहे.याचे प्रमुख् कारण म्हणजे आपण विविध गोष्टी ,कथा यातून मिळणाऱ्या मूल्यशिक्षणाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष.विविध योजना व उपक्रम राबविताना आपण आपला अनमोल ठेवा उपेक्षित ठेवला.शालेय दैनिक परिपाठात बोधकथेचा समावेश आहे.त्यावर सर्व शाळांनी विशेष भर देणे अतिशय आवश्यक आहे.भावी समाजाचे आशादायी चित्र रेखाटण्यास या गोष्टींचा आपणास नक्कीच उपयोग होईल.
     विविध कथा व गोष्टी बालमनावर उत्तम संस्कार करू शकतात.या कथा व गोष्टींची निवड आपणास मुलांचे वय व आपला गोष्ट सांगण्याचा उद्देश यांचा समन्वय साधून करावा लागेल.त्यामुळे आपल्या उपक्रमाची परिणामकारकता नक्कीच वाढेल.आजच्या काळात दूरदर्शन,mobile, सिनेमा यामुळे मुलांचा वाचनाचा कल कमी होताना दिसत आहे.विविध बाल मासिकाची विक्रीसुद्धा रोडावली आहे.यावर उपाय म्हणून शालेय ग्रंथालय  पुनश्च नवीन जोमाने संचलित करावे लागेल.काही तासिका फक्त बालकथा वाचनासाठी राखून ठेवता येईल का? यावरसुद्धा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. उत्तम व दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून देऊन त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे;जेणेकरून मुलांच्या मनावर उत्तम संस्कार बिंबून ते आदर्श नागरिक बनण्यास प्रेरित होतील.

 
   

No comments:

Post a Comment