बोधकथा

Thursday, 29 September 2016

भारत-पाक मैत्रीचे आभासी बुडबुडे...

   "तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी नाही" असे एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते.ते अगदी तंतोतंत खरे आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणात  आपले हितसंबंध जपताना अनेकदा आपले मित्र देश अथवा आपल्या नैतिक पाठिंब्याच्या व्याख्या व अर्थ बदलत असतात. पण शेजारी राष्ट्रांशी संबंध जपताना राजकीय मुत्सद्दीपणाचा कस लागत असतो. त्यातल्या त्यात सरकारी ध्येय धोरणं व सामान्य जनतेच्या भावना जुळतीलच असे नाही.हा विरोधाभास असेल तर मग मात्र लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाची गोची होते.भारतासारख्या अखंड पण खंडप्राय देशात तर हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो अथवा हेतुपुरस्सर तो तयार केला जातो.
      उरी हल्ल्यात 18 जवान शहीद झालेत.त्या जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही.शेजारील दहशतवादी देशाने हा नियोजनबद्ध हल्ला घडवून आणला होता.असे आत्मघाती हल्ले 90% यशस्वी होतात कारण सीमेपलिकडून आलेले हल्लेखोर हे परत जाण्यासाठी आलेले नसतात,तर होईल तेवढी दहशत निर्माण करून विध्वंस करण्यासाठी ते आपली पूर्ण शक्ती पणाला लावतात.यात हल्ला झेलणाऱ्या बाजूचे नुकसान अधिक होते हा इतिहास आहे.कारण आपण कितीही सावध असलो तरी आपला सावधपणा हा बचाव करण्यासाठी असतो तर दहशतवादी मुळातच आक्रमण करण्यासाठी आलेले असतात.जो प्रथम विद्युत वेगाने शत्रूवर तुटून पडतो तोच पक्ष शत्रूचे अधिक नुकसान करतो.याला Blitz Crig म्हणतात.
         उरी येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर विविध समाज माध्यमात प्रतिक्रीयांचा पूर ओसंडून वाहू लागला.भारतीय जनतेने आपल्या तीव्र भावना प्रकट करताना एकप्रकारे सरकारवर प्रचंड दबाव आणला होता.एकदा काय तो पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका इथपासून ते आमचे 5 कोटी लोक मरण पावले तरी चालतील पण संपूर्ण पाकिस्तान चा अणुबॉम्ब टाकून नायनाट करा इथपर्यंत लोकांनाही आपल्या भावना प्रकट केल्यात.त्यात काहीही वावगे नव्हते कारण तो सामान्य जनतेचा संमिश्र राग होता.काही मंडळींनी आपला राग व पाकिस्तानचा निषेध शांतपणे व विधायक मार्गाने व्यक्त केला.युद्ध नको पण दुसऱ्या मार्गाने पाक ला अद्दल घडवा ही त्यांची मागणी होती. ही मागणी अगदी योग्य होती. युद्ध सोडून सगळे मार्ग अवलंबून आपण आपला देश सुरक्षित करायचा असं या मंडळींचा न्याय होता आणि आहे व तो अगदी बरोबर आहे.ते युद्ध नको म्हणून घाबरत आहेत असा कुणी गैरसमज करून घेऊ नये.युद्ध तत्कालीन समस्या सोडवू शकते पण युद्ध दूरगामी यातना व समस्या लादत असते.हाच युद्धाचा कटू व सत्य इतिहास आहे.द्वितीय विश्वयुद्ध,इराक युद्ध व अलीकडील अफगाण युद्ध हे याचे एक उदाहरण आहे.काही लोकांनी अगदीच शांत राहणे पसंत केले त्यांचाही आपण सन्मान केला पाहिजे.
        पण हे सर्व होत असताना एक विरोधाभासी लोकांचा समूह भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अचानक सक्रिय होतो.या वर्गातील लोक समाजात ताठ मानेने जगतात.त्यांच्या भोवताल एक आभासी वर्तुळ असते.ही मंडळी अश्या वेळी शत्रू देशाचा कुठेही निषेध करत नाहीत पण ही मंडळी भारतीय जनतेला शांत राहण्याचे आवाहन करीत असते.म्हणजे पाकिस्तानचा निषेध नाही करायचा पण आपल्या लोकांना शांत करायचे.हा यांचा उद्योग असतो.पाक पुरस्कृत कुठलाही हल्ला असू द्या,हि मंडळी शांततेचे आव्हान करणारी दुकाने उघडून बसतात व सामान्य जनतेच्या व्यक्त होण्याच्या अधिकारवर गदा आणतात.पण चुकूनही ही मंडळी शत्रू देशाचा निषेध नोंदवित नाहीत.भारतीय लोकांचा जनआक्रोश शांत करून एकप्रकारे शत्रूला छुपे साहाय्य करणे हा एकमेव कार्यक्रम या लोकांचा असतो.
        चित्रपट व कला क्षेत्र भारत- पाक तणाव दूर करण्याचा एक मार्ग आहे असे ज्यांना वाटते ते लोक अत्यंत भंपक व तकलादू जगात जगत असतात.हा शुद्ध खोटेपणा आहे.माझ्या मते चित्रपट हा केवळ पैसे कमावण्याचा उद्योग आहे.चित्रपट वा कला क्षेत्र हा समाजाचा आरसा असतो ही तद्दन भिकारचोट भावना आपल्या मनावर कायम रुजविण्यात आली आहे.पाकी कलाकारांनी आपले काय घोडे मारले?मनोरंजन क्षेत्राला यापासून दूर ठेवा असे म्हणणारी भंपक मंडळी आपणास भरपूर दिसतील.फवाद खान नामक पाकी कलावंताने नुकतेच अशी भाबडी समजूत बाळगणाऱ्या मूर्खांच्या थोबाडीत सणसणीत चपराक लगावली.भारतात काम करून पैसे कमवायचे हा एकमेव उद्देश त्याचा होता.उरी हल्ल्यांचा साधा निषेध पण त्याने केला नाही. पाकिस्तानात परत जाताच त्याने पाकी राष्ट्रध्वज हातात घेऊन सांगून टाकले.की"My Nation is my first proirity." त्याच वेळी भारतातील करण जोहर,सैफ अली खान इ.टुकार मंडळी त्याचे गोडवे गात होती.याला बावळटपणा म्हणतात.मागे असेच पाकी गझल गायक गुलाम अली यांच्या गझल मैफिलीसाठी सुधींद्र कुलकर्णी नावाच्या महाशयाने आपल्या तोंडाला काळे फासून घेतले व ते काळे तोंड घेऊन हे महाशय दिवसभर वृत्तवाहिन्यांवर फिरत होते.इतकी यांची चाटुकारिता शिगेला पोहोचली होती.
           एरव्ही देशात  सरकारने एखाद्या कार्यक्रमासाठी अनाठायी खर्च केला तर काही तथाकथित बुद्धीमंत आमचा कराचा पैसा असा उधळणे योग्य नाही म्हणून  विलाप करतात.ते बरोबर आहे.पण मग आपण आपले ५०० रुपये खर्च करून पाकी कलावंतांचे चित्रपट बघणार आहोत ते पैसे कुठे जाणार आहेत ? याचा विचार आपण कधीच का करीत नाही?आम्ही कर भरतो म्हणून ऐटीत मिरविणारे आपला पैसा पाकिस्तानात जात आहे याचा विचार करणार आहेत की नाही.पाक कलाकारांना येथे अभय देऊन आपण कोणते मैत्रीचे सेतू बांधणार आहोत?आणि हे ढोंगी बुद्धिजीवी व कलाकार किती दिवस हे भारत पाक मैत्रीचे सोंग पुढे करून आपली वैयक्तिक पोळी शेकून घेणार आहेत.??तीच बाब लागू होते ती क्रिकेट या खेळासाठी.क्रिकेट खेळल्याने दोन देशातील संबंध मजबूत होतील असे थोतांड आपण नेहमी ऐकत असतो.हे साफ खोटे आहे.दोन्ही देशातील क्रिकेट बोर्ड व जाहिरातदार याना पैसे कमावण्याची हौस आली की भारत-पाक क्रिकेटचे डोहाळे लागतात.
           हा विरोधाभास इतका मोठा आहे की,यावर एक भला मोठा ग्रंथ लिहिला येईल.माझ्या अल्प बुद्धीला असे वाटते की भारत- पाक मैत्री कधीच शक्य नाही.कारण पाकिस्तान या देशाची निर्मितीच भारत द्वेषातून झालेली आहे.हा द्वेष सतत तेवत ठेवणे ही तेथील राज्यकर्ते व लष्कराची गरज आहे.आणि समजा जर हा द्वेष नसेल व भारत पाक संबंध मैत्रीपूर्ण झालेच तर मग पाकिस्तानच्या निर्मितीला अर्थच काय उरणार????काश्मीर प्रश्न आपण कितीही सोडवतो म्हटले तरी तो सुटणार नाही.हे सत्य आहे.आणि ज्या दिवशी तो प्रश्न सुटत आहे असे वाटेल,तेव्हा अमेरिका तो प्रश्न सुटू देणार नाही.त्याची कारणे हा एक वेगळा विषय आहे.पाक ला युद्ध न करता इतर मार्गाने कायमस्वरूपी अद्दल घडविणे हाच काय तो एक उपाय आज आपल्याकडे शिल्लक आहे.त्यावर सरकार गंभीर आहेच.आता जर प्रत्यक्ष युद्ध झाले तर ते अणुयुद्ध होईल.ते जसे हा दोन देशांना परवडणारे नाही तसे ते जगातील कुठल्याही देशाला घातकच ठरेल व हे युद्ध संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे  ढकलणार हे स्पष्ट आहे.यातून संपूर्ण जगाचा विनाश तर नक्की आहे पण येणारी पिढी आपणास माफ करणार आहे काय????आणि इतका संयम बाळगून जरी पाकी लष्कर व राजकीय नेत्यांना जन्नत मध्ये जाण्याची जर खूप घाई असेल तर ती पूर्ण करण्यास आमचे लष्कर समर्थ आहे व मला माझ्या सैनिकांचा व त्यांच्या कुटूंबियांचा अभिमान आहे...

        जय हिंद...


                        गणेश तु.कुबडे

         

No comments: