बोधकथा

Sunday 20 December 2020

प्रतिपश्चंद्र

#प्रतिपश्चंद्र' .......

    असं म्हणतात मानवी शरीर आणि निसर्गातील प्रत्येक वस्तू पंचमहाभूतांनी बनलेले आहे.पृथ्वी,आप,तेज,जल आणि वायू पण महाराष्ट्रातील मातीत,इथल्या प्रत्येक श्वासात,कणाकणात एक सहावे तत्व वास करते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! आज साडे तीनशे वर्षानंतरसुद्धा ज्या महाराजांच्या फक्त जय जयकाराने आपलं रोमांच प्रफुल्लित होतं त्या महाराजांचा ज्या मातीत आणि ज्या माणसांना सहवास लाभला मग तो शत्रू का असेना धन्य झाला. भारतात सगळीकडे निराशेचा अंधार पसरला असताना या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली.ते स्वराज्य अटकेपार नेले ते याच मातीतील मावळ्यांनी...याच धामधुमीच्या शिवकालीन महाराष्ट्रात अविश्वसनीय जे एक रहस्य कालौघात मागे पडलं होतं त्याचं रहस्याचा मागोवा घेतला आहे तो डॉ. प्रकाश सुर्यकांय कोयाडे यांच्या “ प्रतिपश्चंद्र ” या कादंबरीत. प्रकाशक  न्यू इरा पब्लिकेशन, पुणे
     सर्व साहित्यातील एक उत्कृष्ट प्रकार म्हणजे कादंबरी.खरं सांगायचं तर मला हा प्रकार किंचित कंटाळवाणा वाटतो..( क्षमस्व:) कादंबरी म्हटलं की थोडं मी दचकतो.माझा कल वस्तुनिष्ठ ऐतिहासिक ग्रंथाकडे. पण एके दिवशी फेसबुकवर सदर पुस्तकाविषयी पोस्ट बघितली.थोडे दिवस असेच गेलेत मग पुनःश्च एकदा प्रकाशकाने फेसबुकवर टाकलेली पोस्ट मन लावून वाचली आणि कुतूहल वाढलं कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज...कोण म्हणतयं सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे उलट मी तर म्हणेन ह्या समाज माध्यमामुळे वाचन संस्कृतीला एक नवी चालना मिळत आहे. मराठीतील बेस्टसेलर,पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी..म्हणजे प्रतिपश्चंद्र मला मिळाली ती ह्याच समाज माध्यमावर...
      एस.एम.पब्लिकेशनकडून सदर कादंबरी घरपोच मिळाली.. वाचनाची उत्सुकता शिगेला होतीच...हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अत्यंत विश्वासू मावळे व सैनिक त्यापैकी एक म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेत सुरुवातीपासून अग्रगण्य असलेले गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी मिळून एक रहस्य संपूर्ण जगापासून अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले एक रहस्य आणि त्या भोवती फिरणारी ही कादंबरी...चौदावे शतक , सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’! आपल्याला वास्को दी गामा भारतात आला हे शिकविले जाते पण त्या दर्यावर्दीला भारतात यायला मदत केली कुणी त्याला आणणारे दर्यावर्दी कोण होते ??? असं म्हणतात की,त्या काळातील युरोपातील सर्वात मोठे जहाज घेऊन वास्को दी गामा भारताच्या शोधात निघाला होता....पण इकडे भारतातील दर्यावर्दी ( व्यापारी, खलाशी ) त्याच्यापेक्षा बारा पट मोठे जहाजे घेऊन चौदाव्या शतकात संपूर्ण ज्ञात जागत व्यापार उदीम करत होते.हे सत्य आपल्या गावीही नाही...
       संपूर्ण पृथ्वीतलावर भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले ‘विजयनगर साम्राज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा दुवा कोणता? ज्या विजयनगर साम्राज्याच्या आठवडी बाजारात सोने विकल्या जात होते त्या साम्राज्यातील जनतेचे राहणीमान काय उच्च दर्जाचे असेल नाही ? राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हाती कोणती गोष्ट लागली होती? काय होते ते रहस्य ? स्वराज्य स्थापनेनंतर ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळापर्यंत तो न संपलेला संघर्ष यात स्वराज्याच्या सिहासनाचे नेमके काय झाले ? छत्रपती शिवाजी महाराज आणि आठ या अंकांचा संबंध...आपल्यासाठी फक्त प्रेक्षणीय स्थळ असलेल्या वेरुळच्या कैलास लेण्या त्याच्या निर्मितीचा इतिहास.त्यामागे लेखकाने गुंफलेले तर्क आणि वास्तव आपली नक्कीच मती गुंग करतात...आणि रहस्य उलगडत जातात.छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?अशा शेकडो गूढ प्रश्र्नांची उत्तरे म्हणजे प्रतिपश्चंद्र! शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा गूढ अर्थ...गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे प्रतिपश्चंद्र!
     एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते आणि सुरू होतो एक अद्भुत, अनाकलनीय थक्क करणारा  एक ऐतिहासिक प्रवास… डॉक्टर आणि त्याचा मित्र, प्रियल, ज्योती, शिवकथाकार सुर्यकांतराव मोरे, मा.राज्यपाल, यांच्या भोवती गुंफलेला कलेकलेने वाढत जाणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्राचा प्रवास! विजयनगर साम्राज्याकडून स्वराज्याच्या खांद्यावर आलेली एक जबाबदारी…महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे रहस्य… प्रतिपश्चंद्र!इतिसातील काही सत्य घटना आणि त्यात गुंफलेली लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, तितकेच प्रबळ प्रत्येक पात्र, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम, डोके बधीर करून टाकणारे सस्पेन्स, अद्भुत निसर्गवर्णन आणि अचूक विचार करायला लावणारे  आयुष्याचे तत्वज्ञान… एक अद्भुत मिश्रण!
दर्जेदार मराठी लिखाण!
प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे…  #प्रतिपश्चंद्र  !!!



लेखक:  डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशन:  न्यू इरा पब्लिकेशन, पुणे
प्रकार:  मराठी ऐतिहासिक रहस्य कादंबरी
पाने:  ४४०
किंमत:  ३९० रुपये 
टपाल खर्च:१०₹ केवळ!
संपर्क - 8798202020
           9503585356

 - गणेश




3 comments:

  1. Replies
    1. छत्रपती शिवाजी महाराज की जय....

      Delete
    2. छत्रपती शिवाजी महाराज की जय....

      Delete