बोधकथा

Monday 22 June 2020

“ रॉ " भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा

      स्थळ :- शत्रूराष्ट्राच्या राजधानी शहरापासून अवघ्या साठ कि.मी. अंतरावरील एक गाव. अनेक दिवसापासून तो त्या व्यक्तीच्या पाळतीवर होता.त्याचे जाणे -  येणे , त्याच्या सवयीवर तो स्वतःच्या जीवावर उदार होऊन पाळत ठेवत असतो. शत्रू राष्ट्राचा शास्त्रज्ञ होता तो . महिन्यातून एका विशिष्ट दिवशीच ती व्यक्ती एका सलूनमध्ये जात असे.बस्स असाच एकेदिवशी त्या शास्त्रज्ञाचा पाठलाग करत ही व्यक्ती त्या सलूनमध्ये प्रवेश करते.कुणाला काही समजायच्या आत कुणालाही धक्का न लावता तो तेथील एक साधारण वाटणारी  आपल्या सामान्य जीवनातील सूक्ष्म वस्तू हस्तगत करतो. मग काय इकडे भारतात शत्रूराष्ट्राने जीवापाड जपलेले गुपित उघड होते.त्या गावात एक हजार एकर परिसरात भूमिगत लष्करी प्रयोगशाळा असते अर्थात तेथे सुरू असते भारताविरुद्ध वापरासाठी अणुबॉम्बचा शोध. युरोनियम व प्लुटोनियम मिळविण्यासाठी गुप्तसंशोधन.जगापासून लपून असलेली ती प्रयोगशाळा..भारताचा हेतू एकच असतो तो म्हणजे शत्रू राष्ट्राची युरोनियंम मिळविण्याची तयारी कोणत्या टप्प्यात आहे… हेतु पूर्णतः साध्य होतो.कोण होती ती पाळत ठेवणारी व्यक्ती ? काय हस्तगत करते ती त्या सलूनमधून ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा मनोविकास प्रकाशन , पुणे तर्फे प्रकाशित श्री रवि आमले लिखित “ रॉ "  भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा  ”  ( सातवी आवृत्ती 26 जानेवारी 2020 )
       स्वर्गीय पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांच्या दूदृष्टीतून बाळसं धरलेली भारतीय गुप्तचर संस्था म्हणजे “ रॉ ”                ( स्थापना 1968 ) जगातील प्रथम पाच गुप्तचर संस्थेत गणली जाणारी भारताची “ रॉ ”. येता जाता इजरायलच्या “ मोसाद ” अमेरिकेच्या CIA किंवा रशियाच्या KGB चे गोडवे गाणाऱ्यांनी एकदा हे पुस्तक नक्की वाचावे. अदभूत, अकल्पनिय, अविश्वसनीय असे शब्दही कमी पडावे अशी ह्या " रॉ " ची कहाणी शब्दबद्ध केली आहे ती लेखक श्री रवि आमले यांनी. भारतीय गुप्तचर त्यांनी निवृत्तीनंतर लिहिलेले लेख, गोपनीय कागदपत्रे विविध संदर्भ ग्रंथ तद्वतच काही नाव न उघड करता येणाऱ्या “ रॉ ” प्रमुखांच्या मुलाखती यांचा आधार घेऊन लिहिलेले हे पुस्तक अतिशय रोमहर्षक पातळीवर आपणास नेऊन ठेवते. “ रॉ ” स्थापन झालीच मुळी शत्रूराष्ट्रात हेरगिरीसाठी. पण ही संस्था चालते ती आजही कौटिल्याच्या ( चाणक्य ) तत्वावर...छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श हेरखात्याच्या ( बहिर्जी नाईक ) यांना समोर ठेऊन. या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती  पुस्तकात दिली आहे. हेरगिरी म्हणजे काय ? शत्रूराष्ट्रातील लोकांना फितूर कसे करावे ? त्यासाठी कोणती माणसे निवडावी याचे फार तंत्रशुद्ध विवेचन केलेलं आहे सदर पुस्तकात.
    शत्रूराष्ट्र आक्रमक आहे,अनैतिक आहे. आपला देश मात्र नैतिकतेने वागणारा आहे अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय मंचावर असणे हे आपल्यासाठी नेहमीच फायद्याचे असते आणि हे नैतिक बळ गामवणे हानिकारक असू शकते.म्हणूनच गुप्तचरांनी केलेल्या कारवायांच्या तत्कालीन परिस्थितीत बढाया मारायच्या नसतात.त्या अंधारातच असलेल्या बऱ्या.त्याचा फायदा मात्र संपूर्ण देशाला होत असतो. कालांतराने त्या समोर येतातच गूढकथा बनून.गेल्या सत्तर वर्षात आपल्या देशात काहीच नाही झाले. असा एक भ्रम पसरविण्यात येतो. राजकारणाचा भाग सोडला तर मी म्हणू शकतो की, गेल्या पन्नास वर्षात जे “ रॉ ” ने केलं ते कुणीच नाही केलं.साधं बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध जरी उदाहरण म्हणून घेतलं तरी हे आपल्या सहज लक्षात येईल.1971 च्या त्या लढाईत भारताने भुराजकीय स्थैर्य प्राप्त केले.एका देशाचा नकाशा बिघडविला आणि भारताला भविष्यात ज्या अनर्थाला तोंड द्यावयाचे होते त्यापासून मुक्तता दिली.त्याची गोड फळे आज आपला देश चाखत आहे..हे एक विस्तृत प्रकरण लेखकाने अतिशय नेटकेपणाने आपल्यासमोर मांडले आहे...ते युद्ध अपरिहार्य का होते तर त्यामागे अनेक अकल्पनिय असे संदर्भ होते. एक प्रश्न असाही येतो की, बांग्लादेश युद्धाच्या वेळी जे नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले होते त्याबदल्यात मा.इंदिराजींनी पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीर परत का नाही घेतला ??? पण त्यापेक्षा एक मोठी समस्या भारतापुढे पर्यायाने “ रॉ ” पुढे होती अन्यथा ते युद्ध जिंकूनही आपण हरल्यासारखे झाले असते.काय होतं ते गूढ ? याचाही मुद्देसूद उहापोह सदर पुस्तकात केलेला आहे. 
      आंतरराष्ट्रीय राजकारणात जे दिसते,तसेच असते, असे नसते. त्यामागे असतात ते अनंत जटील प्रश्न,राजकारण आणि स्वार्थ. जो प्रत्येकाला साध्य करून घ्यायचा असतो.ह्याच कुरघोडीच्या राजकारणात सतत कार्यरत असते ती आपली गुप्तचर संस्था. त्यांच्या या कार्यात नैतिक अनैतिक या शब्दाला कुठेच थारा नसतो.नैतिकतेच्या अगदी उच्च पातळीवर ते अनैतीकतेच्या अगदी खालच्या पातळीवर जाऊन आपले हेतू साध्य करणे हेच त्यांचे ध्येय असते.कारण त्यांच्यापुढे असते  एकच ध्येय ते म्हणजे आपला देश....त्यांचे सर्व कार्य पडद्यामागे ठेऊन त्याला नैतिकतेची झालर देण्याचे कार्य असते हे आपल्या देशातील तत्कालीन सरकारचे....आणि हेच सदैव सुरू असतं.हेरगिरीचा खेळ नेहमीच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामगे सुरू असतो...कधी समोर.तसेच “ रॉ ” ला प्रत्येकवेळी त्या त्या काळात सरकारी समर्थन मिळालेच असेही नाही.त्याचेही पडसाद आपणास अगदी विशिष्ट मर्यादेत बघायला मिळतात म्हणजे काही ठिकाणी तत्कालीन सरकारने “ रॉ ” ला आडकाठी सुद्धा आणली पण अगदी अपवादानेच.तो सुद्धा एक गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे.लेखकाने ही सर्व प्रकरणे कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या प्रतिमेला तडा न जाऊ देता आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहेत.
     सदर पुस्तकात “ रॉ ” च्या स्थापनेपासून ते अगदी अलीकडे घडलेल्या अगदी ठळक घटनांचा संदर्भासह उल्लेख करण्यात आलेला आहे. बांग्लादेश मुक्तीसंग्राम, सिक्कीम विलीनीकरण,पोखरण अणूचाचणी,ऑपरेशन ब्लुस्टार, खलिस्तान चळवळ,ऑपरेशन काहुटा, सियाचीन प्रकरण,श्रीलंका - लिट्टे प्रकरण, मा.पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या, कारगिल युद्ध,मिशन नेपाळ, काश्मीर समस्या, कुलभूषण जाधव प्रकरण इ. अनेक विषयांवर “ रॉ ” भूमिका आणि कामगिरी याचा चित्तथरारक वेध घेण्यात आला आहे...पण ह्या सर्व यशाच्या पायऱ्या चढत असताना “ रॉ ” ला काही ठिकाणी हारसुद्धा पत्करावी लागली एक म्हणजे माजी पंतप्रधान मा.इंदिरा गांधी आणि मा.राजीव गांधी यांची झालेली हत्या...ह्या भळभळत्या जखमा घेऊन भारतीय गुप्तचर संस्थेचे कार्य अगदी चोवीस तास सुरू असतं कधीकधी काळाच्या एक पाऊल पुढे म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये.
       भारताचे सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता कायम ठेवत भारताचे हे हेर आपलं संपूर्ण आयुष्य एका ध्येयाला वाहून घेऊन कार्य करत असतात.याची झळ त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा पोहचत असते.पण त्याच्यासमोर देश मोठा असतो. “ रॉ ” च्या अनेक ज्ञात अज्ञात गुप्तचरांनी आखलेल्या आणि यशस्वी केलेल्या मोहिमांची चित्तथरारक माहिती आपणास येथे मिळते.गुप्तचारांचे हे काम कधीही न थांबणारे आणि संपणारे असते.युद्धकाळात तर ते जोमाने सुरूच असते व शांतता काळात ते दुप्पट वेगाने सुरू असते कारण शांतता काळातच भविष्यातील योजना आखण्यास वाव मिळतो.रॉ च्या स्थापनेचा काळ ते आजपर्यंत खूप स्थित्यंतरे आली आहेत.साधने आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. “ रॉ " सुद्धा आता बदलली आहे पण कार्यप्रणाली आणि मूलमंत्र मात्र तोच आहे...
      स्वातंत्र्यानंतर खरंच आपल्या देशात काय घडलं,त्यातील आव्हाने कोणती होती आणि तुटपुंज्या साधणासह आपण आंतराष्ट्रीय पटलावर कशी भरारी मारली याचा इतिहास बघवयाचा असेल तर एकदा हे पुस्तक अवश्य वाचावे. माझ्या या लेखात पुस्तकातील  पहिल्या प्रकरणाचा उल्लेख मी कुठेच नाही केला.प्रकरणाचे शिर्षक आहे “ याला म्हणतात “ रॉ ”…!अद्भुत प्रकरण आहे ते जानेवारी 1971 साली घडलेलं...जाणून घ्यायचं आहे ना,चला तर मग नक्की वाचा...जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणे असं या पुसकाचं स्वरूप आहे. वाचनाचा आनंद घेत वाचल्यास अगदी दोन ते तीन दिवसात संपूर्ण वाचून होऊ शकतं...


पुस्तकाचे नाव :- “ रॉ " भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा
लेखक :- मा.श्री रवि आमले
प्रकाशक :- मनोविकास प्रकाशन, पुणे 

टीप :- सदर पुस्तक हे online उपलब्ध असून मला हे पुस्तक घरपोच पोस्टाने मिळाले ते “ज्ञानसाधना" (श्री रावजी लुटे )  परभणी, यांचेकडून खरेदीसाठी संपर्क 9421605019 ( Whats app )

- गणेश

4 comments: