बोधकथा

Sunday, 14 June 2020

चंदेरी दुनिया आणि वास्तविकता

आज दुपारीच सुशांतसिंग राजपूत या अवघ्या 34 वर्षाच्या अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी कळली  आणि नेमकं त्याच वेळ मी कबीर सिंग हा चित्रपट मन लावून बघत होतो.किती शोकांतिका नाही ...कबीर सिंग( शाहीद कपूर) चित्रपटात आपलं आयुष्य उध्वस्त करायला निघाला असतो पण स्वतःला तो सावरतो. अगदी प्रत्यक्ष जीवनातसुद्धा. छिछोरे आणि एम.एस धोनी हे चित्रपट एकहाती निभावणारा हरहुन्नरी कलावंत म्हणजे सुशांत.“ छिछोरे” चित्रपटात त्याने उत्कृष्ट अभिनय करताना जीवनातील सकारात्मकता आणि आत्महत्या ह्या विषयाला हात घातला होता तर दुसरीकडे दुसरीकडे  “ M.S.Dhoni the Untold Story ” ह्या चित्रपटात भारताचा यष्टीरक्षक, माजी कर्णधार, आयसीसी च्या तीनही मुख्य स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पडद्यावर अगदी हुबेहूब साकारला..त्यासाठी सुशांताने माजी भारतीय यष्टीरक्षक मा.किरण मोरे ह्यांच्याकडून जवळपास बारा महिने क्रिकेटचे धडे घेतले आणि खुद्द धोनीने आणि समस्त सिनेरसिकांनी त्याचे कौतुक केले.तसं पाहिलं तर धोनी आणि सुशांतमध्ये अनेक बाबतीत साम्य होतं.दोघेही लहान शहरातून आलेले संघर्ष करून आपलं ध्येयं पूर्ण करणारे त्यासाठी ना वशिला, ना बापाची पुण्याई... होता तो फक्त संघर्ष. ह्या संघर्षात त्यांनी काय बघितलं आणि काय सोसलं हे त्यांनाच ठाऊक कारण कुणाच्या जीवनातील सगळ्याच गोष्टी आपणाला पूर्णतः कळत नसतात.जे दिसलं आणि जे दाखविले तेच आपण सत्य मानतो.या मागे एक भयानक वास्तव असतं ज्याची कल्पना आपल्याला करायची नसते किंवा आपण हेतुपुरस्सर टाळतो..इतका हरहुन्नरी अभिनेता आणि त्याने वयाच्या ऐन उमेदीच्या काळात आत्महत्या करावी ?? का बरं ? ते ही कुणाला काहीच न सांगता.काय घालमेल असेल त्याच्या मनात.एकदा निवांत विचार करा. आजकाल माणूस एका भ्रमात वावरत आहे की जग हे आता एक गाव झालं आहे, मी माझ्या आप्तस्वकीयांच्या खूप जवळ आलो आहे..सगळं जग माझ्या मुठीत आणि मोबाईलच्या कीपॅडवर आलेलं आहे वगैरे वगैरे.पण हा सगळा आपला भ्रम आहे...सर्वप्रथम आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण समुद्राची खोली सहज मोजू शकतो पण समोरच्या व्यक्तीच्या मनाचा थांगपत्ता कसा मोजयचा ? कुणाची संपत्ती त्याचं यश किंवा त्याची जीवनशैली ह्यावरून जर आपण कुणाबद्दल आपल्या धारणा तयार करत असू तर आपण नक्कीच चुकत आहोत.एकेकाळी संपर्काचे कोणतेही साधन नसणारी एक पिढी आणि दुसरीकडे संपर्काची सर्व साधने असणारी आजची पिढी...मग असं काय झालं की सुशांत एकटा पडला ? त्याची आई गेली त्यावर त्याने एक आठवड्यापूर्वी एक भावनिक पोस्ट टाकली होती..मग प्रश्न असा आहे की त्याच्या आयुष्यात असं कुणीच नव्हतं काय जे त्याच्या मनाचा अंदाज घेऊ शकलं असतं...अर्थात नक्कीच असतील. त्यांना असा अंदाज घ्यायला किंवा आपला मित्र काय बोलत आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता होती काय ? त्याने ज्या भावना मांडायचा प्रयत्न केला त्याच्या जवळच्या किती लोकांनी त्याला समजून घेतले असेल.मित्रा सुशांत तु प्रतिनिधी आहेस या समाजाचा की तुला कुणीच नाही समजून घेतलं अन्यथा असा टोकाचा निर्णय तु का बरं घेतला असतास ? तु हतबल झाला होतास हे ही मान्य कारण दुसऱ्याने लिहिलेले संवाद तु अगदी उत्तमरित्या सादर केलेस पण तुझा आत्मकोलाहल कुणालाच समजू नये ? सगळंच तर होतं तुझ्याजवळ मग काय कमी पडलं ? कमी होतं ये फक्त आत्मबळ कारण तु दुसऱ्या व्यक्तीमध्ये स्वतःला शोधत होतास जे तुझे कधीच नव्हते. अरे एकदा आरश्यासमोर उभा राहिला असतास आणि विचारले असतं ना स्वतः स्वतःच्या नजरेला नजर भिडवून की, “ काय चुकलं माझं म्हणून ? ” मित्रा तुला उत्तरे सापडली असती पण तू या भ्रामक जगाच्या मोहात अडकलास आणि नैराश्यातून हे अघोरी पाऊल उचलले.येथे फक्त काळ आणि वेळ राज्य करत असतात.सगळेच आपल्या सोयीने वागत असतात.तु त्यात स्वतःला गुरफटून घेतलंस आणि नको तिथे स्वतःला शोधत बसला. तु एक स्वतंत्र जीव आहेस आणि तुझं प्रारब्ध फक्त तुझं आहे याची का बरं जण नाही ठेवलीस तु ?? अरे येथे सगळेच आपल्या सोयीने वागत असतात....तु दिलदार,तु राजबिंडा,तु हसमुख,यश तुझ्या पायाशी लोळण घेत होतं आणि तू असं करावं हे मी मानायला तयार नाही.तु आत्महत्या नाही केलीस तर तुझा ह्या भ्रामक जगाने बळी घेतला..आता हेच बघ ना मागील तीन महिन्यात जवळपास बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात घेतली का कुणी त्यांची दखल ??  नाही ना कारण तु त्या मानसिकतेत जगणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी होतास. त्यांचं दुःख दाखवायला आणि तुझं दुःख समजायला वेळ कुणाजवळ होता ? मी व तुझ्या जवळ होतोच ना ह्या आभासी जगात.मला समजलं काय तुझ्या मनातलं.तुझे व मित्र मैत्रिणी असतीलच ना...तु तेथेही व्यक्त न व्हावं म्हणजे काय ?  सगळ्यांना वाटत होतं की तू मजेत आहेस कारण तसं दिसत होतं...आणि तुझा मनाचा थांगपत्ता घ्यायला तुझ्याजवळ जे होते ते आपल्याच आभासी विश्वात रमनाम होते...मग तु कुठे होतास ? तर तू एकटा होता.जे आम्हाला दाखविल्या गेलं आणि आम्ही समजत होतो तो एक भ्रम होता...आणि हेच सत्य आहे..
तु एकटा होतास सगळ्यांसारखा फक्त ते तुला जाणवलं नाही आणि जेव्हा तुला हे कळलं तेव्हा तुझा भ्रमनिरास झाला..
तु असं जायला नको होतं....


- गणेश




No comments:

Post a Comment