(टिप:-हा लेख आनंदी मनाने,आनंद घेऊन वाचा.)
कुणी किती पापभिरू असावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण सामाजिक जीवनाचा विचार करता आपण खरंच अगदी टोकाची परीसीमा गाठावी इतके पापभिरू व निष्पाप वाटतो.याबद्दल आपल्या स्वतःचे थोडे बारकाईने निरीक्षण केल्यास ही बाब आपल्या लवकर लक्षात येईल किंवा सोशल मीडियावर थोडा जरी चक्कर मारला तर तिथे आपल्यासारखेच वावरणारे निष्पाप जीव आपणास दिसतील.हा टीकेचा विषय नाही, यादृष्टीने जर आपण बघावयास गेलो तर एक मनाला आनंद देऊन जाणारा हा विषय आहे म्हणजे आपल्यासारखेच दुसरे पण आहेत ही बाब नेहमीच आपल्याला समाधान देते.खरंच कौतुक करावे तितके कमी आहे आपल्या निष्पाप जीवांचे.फेसबुक व व्हाट्स app वर याचा रोज प्रत्यय येतो.म्हणजे बघा पहिल्यांदा नवीन मोबाईल घेतला आणि त्यात वरील अप्लिकेशन एकदाची टाकलीत की मनुष्य प्राणी अगदीच पापभिरू व्हायला सुरुवात होते.त्या मनुष्याला मग एकदम मंगळ ग्रहावरून येणारी कॉस्मिक किरणे धोकादायक वाटायला लागतात.मुळात मंगळ हा ग्रह आहे, तारा नाही.त्यामुळे त्यावरून किरणोत्सर्जन कसे होणार?हा प्रश्न ही आम्हास पडत नाही.सुरेश भटांची एक नसलेली कविता त्यांच्याच नावावर खपविली जाते.दरवर्षी आपले राष्ट्रीय गीत UNESCO तर्फे प्रथम क्रमांक कसं काय पटकावते? किंवा डॉ.प्रकाश आमटे यांच्या नावाने फिरणार एक संदेश आठवा; फ्रिज मध्ये गोठवलेला लिंबू व त्याचा केलेला किस खरंच उपयोगी आहेत काय? इ. प्रश्न आम्हास पडूच नयेत इतके आम्ही पापभिरू झालेलो आहोत. हं एक काम आम्ही न चुकता करू ते म्हणजे आपल्याकडे हा असलेला कचरा आम्ही दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये ढकलून मोकळा श्वास घेतो व समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानात भर घातली याचे पुण्य मिळविल्याचे समाधान मानतो आणि परत पुढचे पुण्य मिळवायला मोकळे होतो.इतक्या मोठ्या पापभिरू देशात असहिष्णुता वाढली आहे असे म्हणणे म्हणजे किती मोठा अन्याय.आणखी त्यावर कडी म्हणजे एकाच शहरात आणि एकाच घरात राहणारे नवरा बायको एकमेकांना फेसबुकवर शुभेच्छा देतात,किती हे प्रेम...."Flying to Delhi with my hubby" अशी tagline टाकून आपण उडतो खरे,पण परत येईपर्यंत आपले घर चोरांनी साफ केलेले असते.तोवर आपला hubby पुरता जमिनीवर आलेला असतो....आपणच नाही का जाहिरात केली होती फेसबुकवर ,त्याचे हे फळ....अजून दहा वर्षांनी जर "Watching बाहुबली -10 with कामवाली बाई" असे स्टेटस दिसले तर नवल वाटून घेऊ नका.असं होणार आहे.....coz we r going to too social now...आमची पत्नी अथवा एखादी महिला साडीचा अथवा दागिन्यांच्या सेटचा फोटो फेसबुकवर अथवा whats app गृपवर टाकते, तेव्हा Like चे बटण अथवा अंगठा दाखविताना आमची मोठी पंचाईत होते कारण लाल,निळा आणि पिवळा हेच मुख्य रंग आम्हास समजतात.पांढरा आणि काळ्या रंगाची त्यात काय ती भर...अहो पण मोरपंखी,नारिंगी,बदामी,शेवाळी,पिस्ता, हे रंग थोड्या फार फरकाने सारखेच असतात. स्त्रियांना त्यातले पण एकाच रंगाचे 10-12 शेड ओळखता येतात.खरी गोची होते ती येथे.दागिन्यांचे तर न बोलले ते बरे.सगळे design थोड्या फार फरकाने सारखेच असतात हा आमचा समज.पण एक तास अगोदर बघितलेले design आणि आता बघत आहोत हे..यातील अगदी तंत्रशुद्ध फरक सांगण्याचे कौशल्य यांच्यात असते.मग काय काही विचार करायचा नाही.like करून घ्यायचा...हं पण आम्ही आमच्या पत्नीसाठी तिला न सांगता सलवार सुटचे कापड नक्की नेत असतो.बायकोला ते आवडते (खरं -खोटं) हे आमचे नशीब....
अगदी पंतप्रधान,मुखमंत्री असो वा मंत्री अथवा एखादा राजकीय नेत्याला फेसबुकवर खुले पत्र लिहिणारे महाभाग आपल्याला भरपूर सापडणार जसं काही ही राजकीय मंडळी आपल्याच पत्राची वाट बघत बसलेले असतात.अमुक एका देवाचा संदेश दहा गृपवर पाठवा चांगली बातमी मिळेल;असा संदेश न चुकता आपल्याला येतोच येतो आणि पापभिरू लोक काहीतरी चांगलं होईल याची वाट बघत असलेले असतात.शुभ सोमवार शुभ बुधवार ही त्यावरची कडी....फेसबुक वर चार- पाच हजार मित्रांचा गोतावळा तयाला करून किती likes मिळालेत याचा हिशोब करत रात्री जागणारे महाभाग आपल्या आजूबाजूला नक्कीच सापडतील.प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असे समजून वागणारा एक वर्ग असतो.हा वर्ग वेळ पडल्यास अगदी NASA ते ISRO च्या शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारतो.मार्केट में नया है म्हणत अगदी पाच वर्षांपूर्वीचा (आता त्याचा पूर्ण PJ झालेला असतो ) आमच्या कपाळी मारल्या जातो.दररोज घडणाऱ्या क्लिष्ट राजकीय घडामोडीवर आपल्या प्रतिक्रियेची पिक मारल्याशिवाय काही महाभागाना तर सकाळ झाली असे वाटतच नाही.काश्मीर प्रश्न प्रत्यक्षात निकाली निघणे अशक्य असला तरी प्रत्यक्षात मात्र फेसबुकवर हा प्रश्न कधीच निकाली निघालेला आहे.म्हणजे पाकिस्तानवर एक दोन अणुबॉम्ब फेकले की झालं..असे आमचे ठाम मत.तीच तऱ्हा आमची नक्षलवादाकडे बघण्याची.म्हणजे नक्षलवाद्यांना गोळ्या घाला( प्रत्यक्ष चकमकीत प्रतिकार ठीक आहे.)त्यांच्यावर रणगाडे चालवा. इतके कमी म्हणून की काय थेट हवाई हल्ला करा असा सूचक सल्ला देणारे महाभाग हे सोयीस्कर विसरतात की, सार्वभौम लोकशाही गणराज्य व्यवस्थेत आपल्याच देशातील जनतेवर रणगाडे नसते चालविले जात.हवाई हल्ला तर खूप दूर राहिला..आपला देश म्हणजे अफगाणिस्तान अथवा सीरिया नव्हे.एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले बिनडोक आपले नेतृत्व चुकीचे करूच शकत नाही हा त्यांचा कायम स्वभाव.एखाद्याने टीका केलीच तर त्याला सोशल मिडियावरच झोडपून काढणारे भरपूर सापडतील.लोक जणू आपल्यालाच बघायला बसले आहेत या नादात दिवसातून चार पाच वेळा आपला Dp बदलणारे.दोन परस्परविरोधी भूमिका असलेल्या पोस्ट एकाचवेळी like करून त्यांच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देणारे.देशातील अथवा राज्यातील सरकार बदलले म्हणजे आपल्या जीवनमानात फरक पडेल,भ्रष्टाचार मिटेल,रामराज्य येईल असे वाटणारे निष्पाप जीव आपणास सगळीकडे दिसतील.मुळात तसा कुठलाही संबंध हा नसतोच आपल्या स्थितीला आपण जबाबदार असतो हे ज्याला उमगले तोच खरा सुखी.सरकार ही व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा आहे.सोशल मीडियावर कुणी आपल्याला अथवा आपल्या नेत्याला विरोध केला म्हणून एखाद्याला यथेच्छ शिव्या घालून विजयी तोरा मिळविणारे....मुळात शिव्या देऊन काहीही होत नसते उलट साऱ्या जगाला आपली पातळी दिसते.पण यांना सांगणार कोण? सामाजिक माध्यमात मिळणारे likes म्हणजे आपली popularity नसते.एखाद्या खरोखर पुरोगामी मित्राला आम्ही पुरोगामी म्हटले तर त्याला तो त्याचा अपमान वाटत असेल तर आम्ही काय करावे???आमचा एक शिक्षक मित्र एखादी पोस्ट त्याने लिहिली आहे,हे दाखविण्यासाठी ते महोदय तो मजकूर आधी स्व हस्ताक्षरात कागदावर लिहितात मग फेसबुकवर त्या लिखित कागदाचा फोटो अपलोड करतात.हे बघून मी चाट पडलो.काय ते भन्नाट लॉजिक.हेच तत्व गृहीत धरलं तर मग विविध वृत्तपत्रांनी सोशल मीडियावर बातम्या देण्याऐवजी त्यांच्या पेपरची कात्रणे नको का चिकटवायला ???
मुळात सामाजिक माध्यमे ही ज्ञान ग्रहण व माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी आहेत. मी पण यावर फेरफटका मारत असतो अगदी न चुकता.केवळ करमणूक व्हावी म्हणून.पण इथे तर सगळीकडे पापभिरू लोक वावरतात.आपण किती निष्पाप जीव आहोत हे सिद्ध करण्याची धडपड लागली आहे नुसती.अगदी कमरेचा पट्टा ढिला होईपर्यंत.(क्रमश:)
गणेश....
No comments:
Post a Comment