बोधकथा

Monday, 5 September 2016

मूल्यशिक्षण व आपण....

आपल्या भारत देशात शैक्षणिक गुणवत्ता ही शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरून निश्चित केली जाते.गुणवत्ता हि आपण फक्त गुणपत्रकापर्यंत मर्यादित करून ठेवलेली आहे.शिक्षणात जेथे व्यक्तीला घडविण्याचे कार्य होते त्या अर्थाने गुणवत्ता या शब्दाचा अर्थ फार व्यापक व सर्वसमावेशक होतो.शाळेत आपण विद्यार्थ्याला ज्ञानदानाचे कार्य करतो कारण आपल्याला एक सुजाण नागरिक घडविण्याचे आव्हान पार पाडावयाचे असते.पण विद्यार्थी त्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो,हे त्या विद्यार्थ्यांवर रुजविलेली मूल्ये निश्चित करतात.मूल्य रुजविणे हि एक न संपणारी प्रक्रिया आहे..त्यात शिक्षक,पालक व समाज यांचा समान वाटा असतो.यात शैक्षणिक संस्थेचा अथवा शाळेचा महत्वाचा वाटा असतो असे मला वाटते.जबाबदार व सुजाण नागरिक घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे.त्या अर्थाने आपली जबाबदारी मोठी आहे.  
                                  एक सोपं उदाहरण देता येईल आपला भारत देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सतत शांततामय प्रगतीचा ध्यास घेत आहे तर काही देश अजूनही बॉम्ब व अण्वस्त्रे बनविण्यात धन्यता मानत आहेत. अणुचा  वापर प्रगतीसाठी करायचा कि विनाशासाठी हे आपल्यावर रुजविलेली मूल्ये ठरवितात.याचे श्रेय आपल्या शिक्षण व्यवस्थेला नक्कीच द्यावे लागेल.कारण आपली शिक्षण प्रणाली ही मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर देते.मानवी मूल्ये डोळ्यासमोर ठेवून आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.व्यक्तीचा धर्म,जात,भाषा,भौगोलिक सीमा याचा विचार न करता,आपल्या शिक्षण व्यवस्थेने  भारतातील विविधतेला मान देत आपला देश एकसंघ ठेवला.   
                           मूल्ये ही आपल्याला औपचारिक व अनौपचारिक अश्या दोन्ही पद्धतीने रुजविता येतात.उदा.संत गाडगेबाबा यांच्या  जीवनवावरील पाठाचे अध्यापन करून आपण विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे औपचारिक महत्व शिकवू शकतो. गृह स्वच्छता,वर्ग सजावट, वैयक्तिक स्वच्छता अथवा गाव सच्छता इ. उपक्रम राबवून आपणास स्वच्छतेचे मूल्य अनौपचारिकपणे मुलांमध्ये योग्यप्रकारे रुजविता येईल.आई हे मूल्यशिक्षण देणारी पहिली शाळा.अगदी जन्मापासून ते संपूर्ण आयुष्यभर कुठेही न मिळणारे दर्जेदार गुणवत्तापूर्ण अनौपचारिक शिक्षण मिळते ते आईकडे.येथूनच खरी सुरुवात होते सुजाण नागरिक घडविण्याची. नंतर जबाबदारी आहे ती शिक्षकाची.
                         परिपाठ, विविध कथा,महापुरुषांचे चरित्र,देशभक्तीपर गीते,नाटक,एकपात्री प्रयोग इ.अनेक साधनांचा योग्य उपयोग करून आपणास विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजविता येतील.औपचारिक शिक्षणासोबतच मूल्याधिष्टीत अनौपचारिक शिक्षण देऊन आपणास सुजाण,सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे उद्दिष्टय गाठता येईल.विद्यार्थ्याच्या मनाचा विकास उदाचे बल वान राष्ट्र घडविण्यासाठी झाला पाहिजे.शिक्षक हे पूर्वरूप, विद्यार्थी हे उत्तररूप आहे व ज्ञान या दोघांना जोडणारा दुआ आहे तर अध्ययन-अध्यापन या दोन्ही घटकांना एकत्र आणनारा घटक आहे असे डॉ.राधाकृष्णन म्हणत.यामध्ये गुरूला अग्रस्थानी असलेला विद्यार्थी मानलेले आहे.गुरूला ज्ञानाचे भांडार मानलेले नाही. येथूनच सुरुवात होते ती गुरु व विद्यार्थी या दोघांणीही अनौपचारिक ज्ञान ग्रहण करण्याची...स्वतः मध्ये असलेल्या अंगभूत सुप्त गुणांना वाट मोकळी करून देण्याची  म्हणजेच "ज्ञानरचनावाद"या संकल्पनेची....

                               कधीकधी विद्यार्थी त्यांच्या सहज व सोप्या कृतीतून एखादे आदर्श असे काम करतात.त्यांचे ते  काम छोटेसे काम आपल्यासमोर आदर्श उभे करून जाते.आपण रुजविलेल्या मूल्यांचे प्रत्यक्ष उपयोजन होणे यासारखा दुसरा आनंद नाही.याच समाजातुन व आपल्याच संस्कारात तयार झालेला विद्यार्थी जर भविष्यात गैरवर्तन करणार असेल तर,आपणच आपले मूल्यांकन करणे गरजेचे आहे.समाजामध्ये आपले दिसणे,बोलणे,वागणे हे एका विशिष्ट उंचीचे असले पाहिजे,जेणेकरून आपल्या शिक्षकी पेशाला समाजात नैतिक अधिष्ठान प्राप्त हॊईल.तरच आपण योग्यप्रकारे मूल्यशिक्षण देऊ शकतो याची आत्मप्रचिती आपणास हॊईल. तो दिवस नक्कीच उगवेल.






                 गणेश तु.कुबडे

                  स.अ. उ.प्राथमिक शाळा विखणी

                    जि.वर्धा.

No comments:

Post a Comment