बोधकथा

Sunday, 18 September 2016

युद्धमय जग....

                 " You may be not interested in war but war is interested in you" असे एक प्रसिद्ध वाक्य आहे.आपल्याला ज्ञात असलेला इतिहास अथवा आधुनिक जगाचा इतिहास पडताळून बघितला तर आपणास वरील वाक्याची प्रचिती नक्कीच येईल किंवा आजची परिस्थिती पाहता जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे युद्ध सुरूच आहे.असे म्हणतात की प्रथम विश्वयुद्धात दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवलेली होती.तर द्वितीय विश्वयुद्ध व शितयुद्धाने वर्तमान जगात युद्धाची बीजे खोलवर रुजविली यात काहीच शंका नाही कारण द्वितीय विश्वायुद्धानंतर जगाच्या पाठीवर असा एकही दिवस नाही गेला की, जिथे बंदुकीच्या नळीतून गोळी चालली नसेल.असे मी मागे एका वर्तमानपत्रात वाचले होते.ही वस्तुस्थिती आहे.यात स्थानिक गुन्ह्यांचा समावेश नाही.आपले आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी ज्यांच्या मागे  वसाहतवादी साम्राज्यवाद व मानव अधिकार हणन इ.पार्श्वभूमी आहे असेच देश यात आघाडीवर आहेत.
                             आधुनिक जगात जेवढी कत्तल साम्राज्यवादी देशांनी मिळून केली तेवढी कत्तल इतर कुठल्याही कारणांनी झाली नाही.21 व्या शतकात वसाहतवादी भौगोलिक साम्राज्यवाद जरी थांबला असला तरी आर्थिक साम्राज्यवाद हि नवीन संकल्पना आता उदयास आली आहे.भांडवलशाही देशात अजस्त्र मोठ्या कंपन्या उदयास आलेल्या आहेत.मोठे भांडवलदार,त्याच्या पैशावर मोठे झालेले राजकीय पुढारी व अलीकडे एक नवीन प्रजाती उदयास आलेली आहे त्याला बौद्धिक विचारवंत असे म्हणतात.या मूठभर लोकांच्या हातात अमर्याद सत्ता व अधिकार आलेले आहेत.काही कंपन्यांची वार्षिक उलाढाल ही लहान-मध्यम 20-25 देशांच्या वार्षिक बजेट एवढी असते. त्या कंपन्यांच्या महत्वाकांक्षा आता आकाशाला गवसणी घालत आहेत व आपल्या पृथ्वीला मर्यादा आहेत.मित्र देशांसोबत व्यापार करणे सोपे आहे.पण त्याला मर्यादा येतात व मित्र राष्ट्रात त्या उद्योगास अनुकूल असा  कच्च। माल उपलब्ध असेलच असे नाही.ह्या बलाढ्य कंपन्या त्या देशातील सरकारवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवून असतात.आपले हितसंबंध जोपासण्यासाठी मग कुठलाही थर गाठण्याची यांची तयारी असते.विदेशात त्यातल्या त्यात विकसनशील देशात केलेली गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर ठरते असे अर्थशास्त्र सांगते.तेथे स्वस्त दरात नैसर्गिक साधन संपत्ती व मजूर उपलब्ध असतात.
                     इराक युद्ध व अफगाण युद्ध हे अलीकडील काळातील ताजे उदाहरण मुळात इराकी जनतेला सद्दाम हुसेन यापासून कुठलाही त्रास नसताना काही देशांनी इराक या देशाकडे रासायनिक हत्यारे असल्याची आरोळी ठोकली,त्यांना साथ द्यायला तथाकथित विचारवंत सोबतीला होतेच.काहीही करायचे पण इराक या देशातील नैसर्गिक तेल व वायू साठ्यावर आपले नियंत्रण असावे असे अमेरिका व इंग्लंड ला वाटू लागले म्हणजेच अप्रत्यक्ष तेथील कंपन्यांना.युद्ध झाले. इराक हरला.सद्दाम हुस्सेन फासावर लटकला.सत्ता परिवर्तन झाले पण रासायनिक हत्यारे कुठेच सापडली नाहीत व तो देश अजूनही अशांत आहे.त्यातून तयार झाली ती IS संघटना.जी आज संपूर्ण जगाला हादरवून सोडत आहे.
                         अफगाण युद्ध तसेच रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने मोठा केलेला ओसामा जेव्हा त्यांच्यावरच उलटला तेव्हा अमेरिकेला अचानक लोकशाही मूल्ये वैगेरे आठवलीत व एका संघटनेचा बिमोड करण्यासाठी संपूर्ण अफगाणिस्तानला अमेरिकी बॉम्ब ने भाजून काढणे हे कितपत योग्य होते..???.एका अतिरेकी संघटनेचा खात्मा करण्यासाठी कित्येक निरपराध बालके या युद्धात मारली गेली ओसामा अफगाणिस्तानात नाही हे शेम्बड्या पोरालाही माहित होते.पण युद्धच नाही झाले तर प्रचंड मोठ्या संरक्षण उद्योगाचा माल कसा खपणार????दहशतवादाला खतपाणी नाही घातले तर शस्त्रे विकायची कुणाला???
                          त्याच अनुषंगाने भारत-पाक संबंध कधीच चांगले होऊ नये यासाठी जगातील अनेक शक्ती प्रयत्न करत आहेत..चीनवर वचक ठेवण्यासाठी व भारत कधीही आशिया खंडात महाशक्ती म्हणून वर येऊ नये यासाठी अमेरिका व इतर देशांचे सतत प्रयत्न सुरु असतात. ज्या काश्मीर प्रश्नावरून भारत-पाक यांच्यात चार वेळा युद्ध झालेत त्याच्या फाळणीचा इतिहास व पडद्यामागे घडलेल्या अनेक घटना याकडे  तत्कालीन भारतीय नेतृत्वाने कानाडोळा केला त्याचे परिणाम आपण आज भोगत आहोत.1946- 1948 या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फळणीवर अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली होती. Thoughts on Pakistan हा त्यांचा ग्रंथ आजच्या संदर्भात वाचणे आवश्यक आहे.आपल्या शेजारी देशातील सरकार,तेथील लष्कर,गुप्तहेर संघटना व विविध दहशतवादी संघटना यांनी भारत देशाविरुद्ध जे युद्ध छेडले त्याकडे साम्राज्यवादी देश कानाडोळा करून उलट त्याच देशाला अमेरिका दहशतवादाच्या बिमोडासाठी अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले F-16 विमाने फुकट वाटते तेव्हा हसावे कि रडावे हाच प्रश्न सतत पडतो. करीत आहेत ?हा प्रश्न चकित करणारा आहे.सामान्य जनतेला तर युद्ध नको आहे मग युद्ध हवे कुणाला.?
                         आधुनिक जगात युद्ध हा एक व्यापार झाला आहे.बलाढ्य कंपन्या व संरक्षण उद्योग यातून उभा राहिलेला पैसा सर्वानाच हवा आहे.पण युद्ध मात्र आपल्या देशापासून दूर झालेले बरे..असाच सर्वांचा हेतू असतो कारण युद्धाने झालेली हानी हि कधीच भरून निघणारी असते.तरीपण लोकशाही,मानव अधिकार यांच्या गोष्टी करणाऱ्या राजकारणी,उद्योजक,व तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला युद्ध हवे असते कारण त्यांच्या दृष्टीने युद्ध फायदेशीर असते...

No comments: