बोधकथा

Monday 19 February 2018

आपला मेंदू हायजॅक झालाय....

      शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना!!! की काय हे,काहीही ??? आपला मेंदू हायजॅक झालाय.म्हणजे नक्की काय हो...? होय सत्य आहे वरील विधान.आपल्या  विचारशक्तिवर कुणीतरी दुसऱ्यानेच ताबा मिळवलाय.अगदी काही अपवाद वगळता आपण  वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात जे वर्तन करतोय त्याला आपण नसून दुसरं कुणीतरीच जबाबदार आहे आणि हे सगळं नकळत होत आहे. कप्पेबंद संकुचित विचारसरणीचा पायाच, आपल्यापेक्षा किंचितही वेगळ्या विचारसरणीची व्यक्ती ही कप्पेबंद संकुचित विचारसरणीची असल्याचा समज करून घेण्यात असतो. सत्य आणि असत्य यामध्ये जी  दरी असते;ती दरी आपल्या मान्यतेची असते.हेच बघा ना काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मध्येपण एक छटा असते पण आपण भांडतो ते फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगासाठी.त्याचवेळी राखाडी रंग आपली मजा बघत असतो.दोन रंगाच्या फरकातच आपलं विश्व आपण गुंडाळून ठेवतो.या दोन ध्रुवातच आपण आपलं जग वाटून घेतो...आपल्या विचारांपेक्षा दुसरा एक विचार असू शकतो हे आपण मान्यच करत नाही...किंबहुना आपली जडनघडचं तशी झालेली असते आणि मग आपण आपल्या ध्रुवावर अढळ होऊन बसतो.आपण चांगले इतर वाईट, म्हणून आपल्याला कळलेलं, आपल्या समाजाचं सत्य हेच 'खरं' सत्य, अशी आपली भूमिका असते.आपल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका असू शकते हे आपण मान्यच करायला तयार नसतो.व्यक्तिनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष, भूमिकानिरपेक्ष सत्य असं काही नसतंच. सर्वच सत्य हा विश्वासाचा मामला आहे.माझा विश्वास आणि दृष्टिकोन खरा; इतरांचा तो खोटा.म्हणून मीच खरा इतर सगळं खोटं असं का ??? कारण ते आमच्याविरुद्ध आहेत.सत्याकडून असत्याकडे प्रवास करताना आपण मधली रंगछटा हेतुपुरस्सर टाळतो.कृष्णाने अर्जुनाला उपदेश देताना सांगितलं होतं की,शत्रूवर प्रेम नको करुस युद्ध कर. त्यावेळी शत्रू कोण आहेत हे आधीच ठरलेलं होतं... महर्षी व्यासांनी सर्व व्यक्तिरेखांना न्याय देतांना मात्र पांडव वनवासात असताना इकडे हस्तिनापुरातील राजकीय व सामाजिक जीवनावर फार कमी प्रकाश टाकला आहे. व्यासाला अर्थातच या काळ्या-पांढऱ्यामधल्याची जाण होती. पण त्याने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांना, 'आपलाच पक्ष सत्याचा' असं वाटत होतं. त्यामुळे शत्रू कोण तर 'जे आपल्याविरुद्ध उभे राहतात ते,' इतकं सोपं होतं.त्यामुळे एकदा शत्रू निश्चित झाला की त्यावर तुटून पडणे हेच आपले कर्तव्य आहे असे आपण समजतो.आपल्या समाजाचं सत्य तेच आपलं सत्य असा भरपूर लोकांचा विश्वास असतो.पण त्या विश्वासाचा फायदा घेत काही क्षुद्र मंडळी निव्वळ भावना भडकविण्याचे उद्योग करत असतात.विश्वासाचा फायदा घेऊन त्याचा उद्रेक ज्याला करता येतो तोच खरा राजकारणी,असंख्य लोकांच्या भावनेला ज्याला हात घालता येतो तो खरा नेता.थोडक्यात समाजात जगताना आपण एकच भावना घेऊन जगत असतो ,'मी विरुद्ध ते'...ह्याच भावनेमुळे मानवी समाजाचं ध्रुवीकरण फार वेगाने झालंय आणि होत आहे.
           सत्य हे व्यक्तीनिरपेक्ष असतं हे मान्य करणे हेच एक मोठे आव्हान आहे.परके म्हणजे शत्रू आणि आमचं खरं,त्यांचं खोटं ही भावना वाढीस लागणे ही सामाजिक अधोगती आहे.आपण फेसबुक आणि व्हाट्स अप वर जेवढी भाऊबंदकी अथवा मैत्री जपतो तेवढी खऱ्या आयुष्यात जपतो काय ???सोशल मीडिया आपल्याला भावतो कारण तेथे आपल्या अस्मितांना सुखावणारी तेवढी सत्यं मांडता येतात, वाचता येतात. घरबसल्या आपण एकदम सामाजिक प्राणी झाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो.online भ्रामक जगात जर कुणी आपला विरोध केला की,मग आपण त्याला झोडपायला तयारच असतो. पुन्हा आपण सोयीस्कर वागायला मोकळे.स्वनिर्मित सत्याचं हवं तसं मिथक विणता येतं.मग त्या मिथकावर स्वार होऊन आपल्याला आपलं इप्सित साध्य करता येतं.आपण केलेल्या चुकांच योग्य ते निदान लावण्याऐवजी दुसरे कसे चुकले याचा शोध घेण्यातच आपण आपला वेळ व ऊर्जा घालवीत असतो.आपलं सत्य आपण आपल्या सोयीनुसार ठरवत असतो.आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला तसे करण्यास भाग पाडते.दैनंदिन जीवनात आपला बहुतांश वेळ हा केवळ दुसऱ्यांच्या शंकाचे समाधान करण्यात जातो अथवा बाह्य गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यात जातो.आपल्या विचारावर कृती करण्यासच आपल्याला वेळ नसतो.सोशल मीडियावर आपण ज्या राजकीय अथवा सामाजिक पोस्ट फिरवत असतो त्या पोस्टचा आपण किती अभ्यास केलेला असतो??? की न करताच आपल्याजवळ आलेला कचरा आपण दुसरीकडे टाकून मोकळे होतो....एखाद्या धर्मावर अथवा एखाद्या महापुरुषावर आक्षेपार्ह टिका  टिप्पणी करताना आपण कितीसा विचार केलेला असतो ??? म्हणजे इकडून तिकडून हेतुपुरस्सर जो आपल्यावर अविचारी व निंदनीय गोष्टींचा भडीमार होत आहे त्याला आपण नेमकं बळी पडत आहोत आणि नेमकं याच गोष्टीमुळे समाजात दरी वाढत आहे...सोशल मिडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्टचा डेटा anyalisis (माहिती पृथकरण) केलं जातं आणि जे आपल्याला हवं अथवा जे आपल्या मनावर बिंबावायचं आहे नेमकं त्याचाच  आपल्या मेंदूवर आघात केला जातो..आणि नेमकं हेच घडत आहे.येणाऱ्या काळात हीच (Strategy)आपल्या देशात गृहयुद्ध भडकवणार हे नक्की....
क्रमश:……………

गणेश तु.कुबडे.

Wednesday 14 February 2018

Kiss Day....

"Kiss Day"
काल हजारो वर्षातुन एकदा न भूतो न भविष्यती खूप मोठा संयोग घडून आला,महाशिवरात्री आणि Valentine साप्ताहातील "Kiss Day" एकाच दिवशी आलेत.तशी या दोन दिवसांची तुलना करणे योग्य नाही,पण काल जो "किस" पडला त्याचा महिमा काही औरच....म्हणजे बघाना
कठोर शिवभक्ताने उपवास करून आपल्या पोटाचा "किस" पाडला....
काही हंगामी उपासदारांनी समस्त फराळी खाद्य वस्तूंचा यथेच्छ "किस" पाडला...
महिला वर्गाने आलू,रताळे, कंदमुळे यांचा "किस" पाडला....
बच्चे कंपनीने त्या किसाचा पुनश्च "किस" पाडून आपल्या आईची डोकेदुखी वाढविली..
तिकडे नास्तिक मंडळींनी महाशिवरात्रीचा कसला आलाय उपवास म्हणून आपल्या बुद्धीचा "किस" पाडला....
इकडे तरुण तरुणींनी एकमेकांना भेटून Valentine सप्ताहानिमित्त "किस" पाडला...
ज्यांना भेटून पण जमले नाही त्यांनी मनातल्या मनात "किस" पाडला...
ज्यांना भेटणे शक्य नाही त्यांनी व्हाट्स अप आणि फेबू. वर "किस" पाडला....
ज्या युवक युवतींना आई बापाने कुठे भटकू दिले नाही त्यांनी घरीच आलुचा आणि रताळ्याचा "किस" पाडून तोंड गोड करून घेतले....
कुणी झाडाखाली तर कुणी झाडावर "किस" पाडला...
कुणाकुणाचा तर इतरांना झुरून-झुरून  जीवाचा "किस" झाला....
कुणी स्वतःलाच झुरून-झुरून स्वतःचाच "किस" पाडला...
ज्यांचा दिवस साजरा झाला त्यांनी उद्या काय करायचे यासाठी आपल्या बुद्धीचा "किस" पाडला...
ज्यांचा वाया गेला त्यांच्या हृदयाचा "किस" पडला....
तिकडे गावाकडंच तर विचारूच नका नुसता हा किंवा ही दुरून जरी दिसला/दिसली तरी साऱ्या गावात "किस" पडतो....
शाळा कॉलेजात कारण नसताना लावलावी करणारे गावभर "किस" पाडतात तो वेगळा....
विवाहित तसेच नौकरदार जोडप्यांचे तर विचारूच नका, भरीस भर आज मुलांच्या शाळेला सुट्टी!!!! मुलं घरीच म्हणून त्यांनी आलू,रताळे आणि कंदमुळे यांचाच "किस" पाडणे योग्य समजले....
कॉर्पोरेट जोडप्यांनी तर सुट्टी नाही म्हणून आपल्या नशिबाचा "किस" पाडला...
नुकतंच लग्न जुळलेल्या म्हणजे साक्षगंध आणि लग्न याच्या मधला जो काळ असतो त्यांची तर खूपच
गोची.काय करावे ? काय बोलावे हेच सुचेना म्हणून त्यांनी तेच आपलं आलू,रताळे यांचाच "किस" पाडला.वरून उपवास केलास काय गं ??? बघ हं जपून...फराळाचं करशील हं...आणि आराम कर.असं म्हणून वेळ मारून नेली...साक्षगंध आणि लग्नाच्या मधला जो काळ असतो,तोच खरा मधुचंद्र.बाकी लग्नानंतर मधुचंद्र असतो ही फक्त आणि निव्वळ अंधश्रद्धा आहे....लग्नानंतर तेच असतं.... आलू,रताळे आणि कंदमुळे यांचा फक्त आणि फक्त "किस"…………
तसंही या क्षणभंगुर जीवनात आपण करतोच काय ? निव्वळ "किस" पाडतो प्रत्येक गोष्टींचा....
वरील सर्व प्रकारातून जे सुटलेत त्यांनी एकच मंत्र म्हणावा....

*हर बोला...हर हर महादेव.....*

#गणेश कुबडे

Tuesday 26 September 2017

पुस्तक वाचनाचं महत्व...

What really knocks me out is a book that, when you're all done reading it, you wish the author that wrote it was a terrific friend of yours and you could call him up on the phone whenever you felt like it. That *doesn't happen much, though.*
J.D. Salinger




        आपल्या अवतीभोवतीचे अदृश्य जग जाणायचे असेल तर नक्कीच सर्वांनी वाचनाची कास धरावी.कुणावर प्रेम करायचे असेल तर ते पुस्तकावर करायला हवे.पुस्तकांशी एकदा घट्ट नाते जुळलं की जीवनाचा प्रवास अगदी आरामदायक होतो.कारण तुमची काळजी घ्यायला आता पुस्तक सदैव तुमच्या सोबतीला असतं. जर तुम्ही पुस्तकांच्या प्रेमात पडाल तर सहजच तुम्हाला वाचनाची आवड लागेल.एकदा ही आवड आपणास लागली तर बघा आपल्या जीवनात काय फरक पडतो ते.मनातील जळमटं काढून टाकण्याचा एकमेव उपाय म्हणजे विविधरंगी वाचन.मेंदूसाठी सर्वोत्तम खाद्य म्हणजे वाचन होय.

                    माणसाने छंद जपावा तो वाचनाचा.त्यातही वाचन ही एक कला आहे जी सरावातून साध्य होते.दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाला आपण जे अनुभवतो त्याचा संबंध आपले वाचन जर अथांग आणि समृद्ध असेल तर त्याच्याशी जुळलेला असतोच. माणसाला इतर व्यसनांपेक्षा वाचनाचं खुप व्यसन असावं. कठीण समयी आपल्याला वाचनाचेच संदर्भ आपल्याला उपयोगी पडतात.एखाद्या चर्चेत भाग घ्यायचा असेल तर आपले समृद्ध वाचनच आपली मदत करते.सृजनात्मक चर्चेसाठी विविधांगी वाचनाची जोड ही नक्कीचअसावयास हवी.
     पुस्तक हा आपला गुरू असतो हे मानायला हरकत नाही कारण आपण ज्या गोष्टीचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरंच काही शिकतो व घडतो. शिकवण्याचं, मार्ग दाखवण्याचं, घडवण्याचं काम हे पुस्तक करतंच ना! मग पुस्तक म्हणजे आपला गुरूच आहे. पुस्तक हा आपला मार्गदर्शक असतो. बऱ्याच वेळी चुकलेला रस्ता सोडून सरळ मार्गाने चालण्यास भाग पाडण्याचे काम ते पुस्तकालाच जमतं.
     विद्यार्थी जीवनात हलकं फुलक वाचन करून आपण सुरुवात करू शकतो.कथा कादंबऱ्या किंवा नाटके इथून आपणास सुरुवात करता येईल.त्यानंतर हळूहळू दर्जेदार लेख,संपादकीय विविध वृत्तपत्रे असा हा आलेख वाढवत न्यावा.चरित्र वाचन हे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे एखाद्या महान व्यक्तीचे जीवन कसे घडत गेले हे आपणास कळते.त्याचे संदर्भ आपणास प्रत्येक ठिकाणी उपयुक्त पडू शकतात.शाळेत विद्यार्थ्यांना एखादा पाठ जर आपण 4 ते 5 वेळा वाचण्यास सांगितला तर आपले अर्धे अधिक काम आधीच झालेले असते.असा माझा अनुभव आहे.त्यामुळे विद्यार्थी दशेतच हेतुपुरस्सर योग्य वाचन संस्कार देणे हे शिक्षकांचे ध्येय असले पाहिजे,तरच वाचन संस्कृती रुजेल व वाढेल.
         आपण वाचलेलं कधी थोडा वेळ स्मरणात राहतं, तर काही पुस्तके आयुष्यभर स्मरणात राहतात.असं का होत असावं?आजूबाजूची परिस्थिती आपल्या वाचनावर नक्कीच परिणाम करते.यावर सोपा उपाय म्हणजे एखाद्या पात्राचा अभ्यास करताना त्या पात्रात स्वतःला बघावे अथवा एखादी कहाणी वाचताना आपणच त्या कहाणीचा एक भाग आहोत अशी कल्पना करावी.कधीकधी एखादं पात्र आपल्या मनावर गारुड करतं उदाहरण द्यायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज.महाराजांचा इतका किचकट इतिहास आपण सहज आपल्या भाषेत सांगू शकतो.किंवा मृत्युंजय मधला कर्ण असो व माझा लढा मधला हिटलर असो असे अनेक पात्र असतात जी आपल्याला वाचनाची ओढ लावतात.यात आपल्या वाचन प्रेमापेक्षा ती पात्रेच आपल्याला त्यांच्याकडे ओढत असतात.अर्थातच याचे श्रेय ही पात्र रेखाटणाऱ्या लेखकाला पण नक्कीच द्यावे लागेल.
           शिक्षक असल्यामुळे निरीक्षण करणे ही माझी सवय. लहान मुलांच्या भाव भावनांचे निरीक्षण करणे हा माझा आवडता  विषय.त्यावरून आपल्याला योग्य ते निष्कर्ष काढता येतात.पण आजकाल बहुतेक मंडळी मोबाईल,हेडफोन व लॅपटॉप मधेच गुंग असतात.हे करत असताना त्यांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे पण भान नसते.तो प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा भाग असू शकतो.हा भाग वेगळा पण हीच एकाग्रता आपण वाचनात दाखविली तर ?? याचा फायदा आपणास नक्कीच होऊ शकतो.वेळ मिळेल तसे आणि मिळेल तेव्हा आपण वाचन करावयास हवे या मताचा मी आहे.
      वाचनाचे बरेच फायदे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. आपले वाचन समृद्ध असेल तर  समाजात वावरताना, किंवा आपल्या व्यवसायात व्यक्तीशी संवाद साधताना आपण कधीच अडखळत नाही.कोणता शब्द कुठे आणि जसा वापराचा याचे ज्ञान आपणास अवगत झालेले असते त्यामुळे संवाद सुकर होतो. थोडक्यात वाचनामूळे आपले शब्द भंडार समृद्ध होते.लिखाण करतानासुद्धा आपल्याला व्याकरणात चुका टाळता येतात.सोबतच संभाषण कौशल्य विकसित झाल्यामुळे बोलताना इतरांची मने दुखविणे टाळता येते.अगदी एकटे असण्यापेक्षा सोबतीला पुस्तके असलीत तर कधीही चांगले...
    

Books are the ultimate Dumpees: put them down and they’ll wait for you forever; pay attention to them and they always love you back.
John Green

Monday 25 September 2017

<a href="http://www.marathibloggers.net/" target="_blank"><img alt=" मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!" src="http://goo.gl/YckhY"></a>

Saturday 29 July 2017

स्वेच्छामरणाची इच्छा पूर्ण करता येईल काय ???

माणसाला मरणाचे भय वाटते.त्यामुळे तो सतत मरणापासून दूर पळण्याचा असफल प्रयत्न करत असतो.आपल्या आजूबाजूला होत असलेले दुर्दैवी व नैसर्गिक मृत्यू बघूनही त्याला मृत्यू नामक सत्य उमजून घ्यावेसेच वाटत नाही.प्रत्येक मनुष्य जणू आपण चिरंजीव आहोत याचा संभावनेने ग्रासला आहे.पण याचा अर्थ असा नाही की जगण्यावर प्रेम करू नये पण त्याचवेळी जगण्याचा मोह आणि आणि उत्कंठा टाळता आली पाहिजे. असे असले तरी मनुष्य जीवनात असे प्रसंग येतात की त्याला जीवन अगदी नकोसे होते.असाध्य रोग, नैराश्य यातून मानवाला कधीकधी या जीवनरुपी मोहातून मुक्त व्हावेसे वाटते.यातूनच कधीकधी तो आत्महत्या करतो.पण आत्महत्येला स्वेच्छामरण नाहीच म्हणता येणार.कारण आत्महत्या  ही सार्वजनिक ठिकाणी न करता मनुष्य एकांतवासात करतो.मग प्रश्न असा उपस्थित होतो की देशाच्या सीमेवर वीरगती प्राप्त करणारा सैनिक स्वेच्छामरण पत्करत असतो काय ? तर नाही, सैनिकी पेशा जरी त्याने आपल्या पसंतीने निवडला असला व आपली गाठ मरणाशी होऊ शकते याची त्याला जाणीव असली तरीपण आपण त्याला स्वेच्छामरण पत्करले असे नाही म्हणू शकत.ते एक वीरमरण असते.जे त्याने देशासाठी स्वीकारले असते.
         एखाद्या असाध्य रोगाने मानवास ग्रासले असेल.तो तीव्र मरणयातना सोसत असेल किंवा त्याच्याकडून कुठलेही समाजपयोगी काम होत नसेल.एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक मनुष्यास असा स्वेच्छामरणाचा अधिकार असावयास हवा.कुठल्याही हेतुविना जीवन टिकवून ठेवण्यास मनुष्यास बाध्य करणेच मुळात चुकीचे आहे.जैन धर्मात याविषयी मार्गदर्शन केले आहे.शरीरात इतरांची वा स्वतः ची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काळजी घेण्याची थोडीही शक्ती शिल्लक नसेल तर त्या व्यक्तीस मरणप्राप्ती होईपर्यंत उपवास करण्याचा अधिकार आहे.एका विशिष्ट वयानंतर आपले जीवितकार्य पूर्ण झाले आहे व आता संसाराला आपला काही उपयोग नाही असे ज्या मानवाला वाटते त्याला योग्य शहानिशा करून कायदेशीर इच्छामरणाची परवानगी दिली गेली पाहिजे.आपल्या देशात तसा कायदा नाही पण त्यावर अधून मधून चर्चा घडत असते.हे स्वागतार्ह पाऊल म्हणावयास हवे.स्वेच्छामरण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे.प्रत्येकाला असा मूलभूत अधिकार असायला हवा की, एका ठराविक वयानंतर जेव्हा आपण खूप जगून घेतले आहे असे वाटू लागले आणि उगाच जीवनाचे ओझे वाहण्याची ज्याची इच्छा नसेल....त्याला शरीर सोडण्याचा पूर्ण अधिकार असावा.हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.खरे तर प्रत्येक दवाखान्यात यासाठी वेगळा विभाग असावयास हवा जिथे असे व्यक्ती दाखल होऊ शकतील.त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देऊन मग कुठलाही आकस अथवा तक्रार न करता जगाचा निरोप घेऊ दिला पाहिजे कारण योग्यवेळी घेतलेला निरोप हा नेहमी आल्हाददायक असतो.
           आज वैद्यक शास्त्राने खूप प्रगती केली आहे.इच्छामरणाचे दोन पर्याय आहेत.एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष.प्रत्यक्ष प्रकारात त्वरित पण वेदनारहित जीवनाचा शेवट करता येते.अप्रत्यक्ष या प्रकारात मरण अटळ असले तरी ते खूप हळुवार असते.प्रत्यक्ष प्रकार म्हणजे जवळजवळ खून या सदरात मोडेल.पण हा पर्यायही कायदेशीर करावयास हवा.वीस वीस वर्षे मरणयातना सोसणाऱ्या रोग्यास योग्य ती पडताळणी करून इच्छामरण देता येईल काय ? यावर विचार नक्की व्हावयास हवा.आज वैद्यकशास्त्र खूप प्रगत झाले आहे.प्रत्येक रोगाविरुद्ध आपला लढा सुरूच आहे.कित्येक रोगांवर आपण विजय मिळविला आहे.पण ही लढाई कुठवर लांबवायची हे आपनालाच ठरवावे लागेल.
          आजकाल बहुतेक रुग्ण हे रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतात.त्या पंचतारांकित कोंडवाड्यात आप्तस्वकीय पण जवळ नसतात किंवा हेतुपुरस्सर दूर ठेवले जाते.अमेरिकेत रुग्णाला त्रास देणारे उपचार करता येत नाहीत.अशा उपचाराविरुद्ध रुग्ण न्यायालयात दाद मागू शकतो.अशा या मृत्यूला कवटाळण्यापेक्षा आप्तस्वकीयांच्या सहवासात पत्करलेले स्वेच्छामरण कधीही चांगले.एखाद्या व्यक्तीला त्याच्या असाध्य व्याधीतून 100% मुक्त करणे निव्वळ अशक्य आहे.असा दावा कुणीही करू शकणार नाही.केवळ रुग्ण म्हणतो म्हणून त्याला स्वेच्छामरण देता नाही येणार.हेही येथे लक्षात घेतले पाहिजे किंवा एखादा डॉक्टर म्हणतो म्हणून त्या रुग्णाच्या जीवनाचा अंत आपणास नाही करता येणार.यासाठी काही नियम करून त्यांना कायदेशीर मान्यता देऊनच मग यावर काय तो निर्णय नक्कीच घेता येईल....व स्वेच्छामरणाची इच्छा पूर्ण करता येईल.

Tuesday 9 May 2017

पापभिरू निष्पाप लोकांच्या जगात....

    (टिप:-हा लेख आनंदी मनाने,आनंद घेऊन वाचा.)

   कुणी किती पापभिरू असावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण सामाजिक जीवनाचा विचार करता आपण खरंच अगदी टोकाची परीसीमा गाठावी इतके पापभिरू व निष्पाप वाटतो.याबद्दल आपल्या स्वतःचे थोडे बारकाईने निरीक्षण केल्यास ही बाब आपल्या लवकर लक्षात येईल किंवा सोशल मीडियावर थोडा जरी चक्कर मारला तर तिथे आपल्यासारखेच वावरणारे निष्पाप जीव आपणास दिसतील.हा टीकेचा विषय नाही, यादृष्टीने जर आपण बघावयास गेलो तर एक मनाला आनंद देऊन जाणारा हा विषय आहे म्हणजे आपल्यासारखेच दुसरे पण आहेत ही बाब नेहमीच आपल्याला समाधान देते.खरंच कौतुक करावे तितके कमी आहे आपल्या निष्पाप जीवांचे.फेसबुक व व्हाट्स app वर याचा रोज प्रत्यय येतो.म्हणजे बघा पहिल्यांदा नवीन मोबाईल घेतला आणि त्यात वरील अप्लिकेशन एकदाची टाकलीत की मनुष्य प्राणी अगदीच पापभिरू व्हायला सुरुवात होते.त्या मनुष्याला मग एकदम मंगळ ग्रहावरून येणारी कॉस्मिक किरणे धोकादायक वाटायला लागतात.मुळात मंगळ हा ग्रह आहे, तारा नाही.त्यामुळे त्यावरून किरणोत्सर्जन कसे होणार?हा प्रश्न ही आम्हास पडत नाही.सुरेश भटांची एक नसलेली कविता त्यांच्याच नावावर खपविली जाते.दरवर्षी आपले राष्ट्रीय गीत UNESCO तर्फे प्रथम क्रमांक कसं काय पटकावते? किंवा डॉ.प्रकाश आमटे यांच्या नावाने फिरणार एक संदेश आठवा; फ्रिज मध्ये गोठवलेला लिंबू व त्याचा केलेला किस खरंच उपयोगी आहेत काय? इ. प्रश्न आम्हास पडूच नयेत इतके आम्ही पापभिरू झालेलो आहोत. हं एक काम आम्ही न चुकता करू ते म्हणजे आपल्याकडे हा असलेला कचरा आम्ही दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये ढकलून मोकळा श्वास घेतो व समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानात भर घातली याचे पुण्य मिळविल्याचे समाधान मानतो आणि परत पुढचे पुण्य मिळवायला मोकळे होतो.इतक्या मोठ्या पापभिरू देशात असहिष्णुता वाढली आहे असे म्हणणे म्हणजे किती मोठा अन्याय.आणखी त्यावर कडी म्हणजे एकाच शहरात आणि एकाच घरात राहणारे नवरा बायको एकमेकांना फेसबुकवर शुभेच्छा देतात,किती हे प्रेम...."Flying to Delhi with my hubby" अशी tagline टाकून आपण उडतो खरे,पण परत येईपर्यंत आपले घर चोरांनी साफ केलेले असते.तोवर आपला hubby पुरता जमिनीवर आलेला असतो....आपणच नाही का जाहिरात केली होती फेसबुकवर ,त्याचे हे फळ....अजून दहा वर्षांनी जर "Watching बाहुबली -10 with कामवाली बाई" असे स्टेटस दिसले  तर नवल वाटून घेऊ नका.असं होणार आहे.....coz we r going to too social now...आमची पत्नी अथवा एखादी महिला साडीचा अथवा दागिन्यांच्या सेटचा फोटो फेसबुकवर अथवा whats app गृपवर  टाकते, तेव्हा Like चे बटण अथवा अंगठा दाखविताना आमची मोठी पंचाईत होते कारण लाल,निळा आणि पिवळा हेच मुख्य रंग आम्हास समजतात.पांढरा आणि काळ्या रंगाची त्यात काय ती भर...अहो पण मोरपंखी,नारिंगी,बदामी,शेवाळी,पिस्ता, हे रंग थोड्या फार फरकाने सारखेच असतात. स्त्रियांना त्यातले पण एकाच रंगाचे 10-12 शेड ओळखता येतात.खरी गोची होते ती येथे.दागिन्यांचे तर न बोलले ते बरे.सगळे design  थोड्या फार फरकाने सारखेच असतात हा आमचा समज.पण एक तास अगोदर बघितलेले design आणि आता बघत आहोत हे..यातील अगदी तंत्रशुद्ध फरक सांगण्याचे कौशल्य यांच्यात असते.मग  काय काही विचार करायचा नाही.like करून घ्यायचा...हं पण आम्ही आमच्या पत्नीसाठी तिला न सांगता सलवार सुटचे कापड नक्की नेत असतो.बायकोला ते आवडते (खरं -खोटं) हे आमचे नशीब....
        अगदी पंतप्रधान,मुखमंत्री असो वा मंत्री अथवा एखादा राजकीय नेत्याला फेसबुकवर खुले पत्र लिहिणारे महाभाग आपल्याला भरपूर सापडणार जसं काही ही राजकीय मंडळी आपल्याच पत्राची वाट बघत  बसलेले असतात.अमुक एका देवाचा संदेश दहा गृपवर पाठवा चांगली बातमी मिळेल;असा संदेश न चुकता आपल्याला येतोच येतो आणि पापभिरू लोक काहीतरी चांगलं होईल याची वाट बघत असलेले असतात.शुभ सोमवार शुभ बुधवार ही त्यावरची कडी....फेसबुक वर चार- पाच हजार मित्रांचा गोतावळा तयाला करून किती likes मिळालेत याचा हिशोब करत रात्री जागणारे महाभाग आपल्या आजूबाजूला नक्कीच सापडतील.प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असे समजून वागणारा एक वर्ग असतो.हा वर्ग वेळ पडल्यास अगदी NASA ते ISRO च्या शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारतो.मार्केट में नया है म्हणत अगदी पाच वर्षांपूर्वीचा (आता त्याचा पूर्ण PJ झालेला असतो ) आमच्या कपाळी मारल्या जातो.दररोज घडणाऱ्या क्लिष्ट राजकीय घडामोडीवर आपल्या प्रतिक्रियेची पिक मारल्याशिवाय काही महाभागाना तर सकाळ झाली असे वाटतच नाही.काश्मीर प्रश्न प्रत्यक्षात निकाली निघणे अशक्य असला तरी प्रत्यक्षात मात्र फेसबुकवर हा प्रश्न कधीच निकाली निघालेला आहे.म्हणजे पाकिस्तानवर एक दोन अणुबॉम्ब फेकले की झालं..असे आमचे ठाम मत.तीच तऱ्हा आमची नक्षलवादाकडे बघण्याची.म्हणजे नक्षलवाद्यांना गोळ्या घाला( प्रत्यक्ष चकमकीत प्रतिकार ठीक आहे.)त्यांच्यावर रणगाडे चालवा. इतके कमी म्हणून की काय थेट हवाई हल्ला करा असा सूचक सल्ला देणारे महाभाग हे सोयीस्कर विसरतात की, सार्वभौम लोकशाही गणराज्य व्यवस्थेत आपल्याच देशातील जनतेवर रणगाडे नसते चालविले जात.हवाई हल्ला तर खूप दूर राहिला..आपला देश म्हणजे अफगाणिस्तान अथवा सीरिया नव्हे.एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले बिनडोक आपले नेतृत्व चुकीचे करूच शकत नाही हा त्यांचा कायम स्वभाव.एखाद्याने टीका केलीच तर त्याला सोशल मिडियावरच झोडपून काढणारे भरपूर सापडतील.लोक जणू आपल्यालाच बघायला बसले आहेत या नादात दिवसातून चार पाच वेळा आपला Dp बदलणारे.दोन परस्परविरोधी भूमिका असलेल्या पोस्ट एकाचवेळी like करून त्यांच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देणारे.देशातील अथवा राज्यातील सरकार बदलले म्हणजे आपल्या जीवनमानात फरक पडेल,भ्रष्टाचार मिटेल,रामराज्य येईल असे वाटणारे निष्पाप जीव आपणास सगळीकडे दिसतील.मुळात तसा कुठलाही संबंध हा नसतोच आपल्या स्थितीला आपण जबाबदार असतो हे ज्याला उमगले तोच खरा सुखी.सरकार ही व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा आहे.सोशल मीडियावर कुणी आपल्याला अथवा आपल्या नेत्याला विरोध केला म्हणून एखाद्याला यथेच्छ शिव्या घालून विजयी तोरा मिळविणारे....मुळात शिव्या देऊन काहीही होत नसते उलट साऱ्या जगाला आपली पातळी दिसते.पण यांना सांगणार कोण? सामाजिक माध्यमात मिळणारे likes म्हणजे आपली popularity नसते.एखाद्या खरोखर पुरोगामी मित्राला आम्ही पुरोगामी म्हटले तर त्याला तो त्याचा अपमान वाटत असेल तर आम्ही काय करावे???आमचा एक शिक्षक मित्र एखादी पोस्ट त्याने लिहिली आहे,हे दाखविण्यासाठी ते महोदय तो मजकूर आधी स्व हस्ताक्षरात कागदावर लिहितात मग फेसबुकवर त्या लिखित कागदाचा फोटो अपलोड करतात.हे बघून मी चाट पडलो.काय ते भन्नाट लॉजिक.हेच तत्व गृहीत धरलं तर मग विविध वृत्तपत्रांनी सोशल मीडियावर बातम्या देण्याऐवजी त्यांच्या पेपरची कात्रणे नको का चिकटवायला ???

      मुळात सामाजिक माध्यमे ही ज्ञान ग्रहण व माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी आहेत. मी पण यावर फेरफटका मारत असतो अगदी न चुकता.केवळ करमणूक व्हावी म्हणून.पण इथे तर सगळीकडे पापभिरू लोक वावरतात.आपण किती निष्पाप जीव आहोत हे सिद्ध करण्याची धडपड लागली आहे नुसती.अगदी कमरेचा पट्टा ढिला होईपर्यंत.(क्रमश:)

गणेश....