बोधकथा

Thursday 8 March 2018

लेखन कौशल्य.....भाषा विकासातील महत्वाचा टप्पा

          श्रवण,भाषण,वाचन ही कौशल्ये औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने  आत्मसात केल्यावर शेवटचा व महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन.एखाद्या भाषेची पूर्ण ओळख झाली म्हणजे त्या भाषेत आपल्याला चांगले लेखन करता येईलच असे नाही.लेखनकौशल्य हे परिश्रमपूर्वक आत्मसात करावे लागते.पायरीपायरीने सुरुवात करून अगदी उत्तुंग अशी भरारी घेण्याचा हा प्रवास आहे.भाषण आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे तर लेखन हे आपल्या सुप्त भावनांना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे.प्रत्येक वक्ता हा उत्कृष्ट वक्ता असतोच असे नाही तसेच लेखनाचे आहे आपल्याला व्यक्त व्हायचे असेल तेही उत्कृष्ट अश्या भाषेत त्यासाठी दीर्घ सराव आवश्यक आहे.तशी मनाची तयारी असायला हवी.
          शालेय जीवनापासून आपल्या लेखनाचा सराव सुरू होतो व तो अव्याहत सुरू राहतो.एखाद्या व्यक्तीला गणिताची आवड असेल पण त्यासोबतच ती व्यक्ती अवांतर वाचन करत असेल तर त्यालादेखील आपले लेखन कौशल्य वाढविण्यास खूप वाव आहे असं म्हणता येईल.आपला कल हा कोणत्याही विषयाकडे अथवा कोणत्याही क्षेत्राकडे का असेना लेखन कौशल्य आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रभावक्षेत्र वाढविण्यास उपयुक्त ठरते.शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात ज्यांच्या मनात लेखनाची उर्मी दाटते ती व्यक्ती मग निबंध,कविता,स्फुट लेखन अथवा चारोळ्या इ.प्रकारात आपला हात आजमावून बघतो.अशावेळी सदर व्यक्ती आपल्या लेखनाबद्दल इतरांकडून अभिप्राय आजमावून बघत असतो या काळात जर त्याला योग्य प्रोत्साहन व दिशा मिळाली की त्याची वाटचाल सुकर होते.कधीकधी अपमान पण सहन करावा लागू शकतो.काही जवळचे लोकच आपली खिल्ली उडवत असतात,पण या परिस्थितीत नाउमेद न होता कठोर सराव करणे हेच आपले ध्येय असायला हवे.
         सद्यस्थितीत आपले लेखन कौशल्य जगासमोर सादर करायला अथवा त्याची साधना करायला आपल्याजवळ भरपूर माध्यमे उपलब्ध आहेत.कुणाला कविता वाचायला आवडतात तर कुणाला लिहायला,कुणी विविध सामाजिक घडामोडीवर आपले मत प्रदर्शन करतात,तर कुणी एखाद्या साहित्य प्रकारावर आपले विवेचन मांडतात.आपले हे मत मांडताना पूर्वी अत्यंत कमी साधने होती पण आज सामाजिक माध्यमाद्वारे आपण आपले विचार लिखित स्वरूपात जगासमोर मांडू शकतो.पण हे करत असताना शब्दांचे भान व आपल्या उणिवा याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.यासाठी आत्मपरीक्षण करणे खूप आवश्यक आहे.आपले लेखन हे सैरभैर असता काम नये तसेच ते खूप त्रोटक ही असू नये.यासाठी मुद्य्यांची क्रमवार मांडणी त्याला सुसंगत स्पष्टीकरण व त्या मुद्द्याला अनुसरून एखादे उदा. त्या मुद्द्याची परिणामकारकता वाढविते.एखादा छोटा मुद्दा असेल तर त्यास उगाच ओढून ताणून लांबलचक मांडू नये.
          आपले अवांतर वाचन वाढवून तुलनात्मक एखादा मुद्दा मांडला की,त्याचा प्रतिवाद करणे समोरच्याला कठीण होऊन जाते.आपले सामर्थ्य व त्रुट्या आपणास माहीत झाले की आपण नेमकं कोणत्या क्षेत्रात लेखन करावे याची आपल्याला जाणीव होते.त्यानंतर आपल्याला कोणता पल्ला गाठायचा आहे हे आपल्या जिद्द,चिकाटी व मेहनतीवर अवलंबून आहे.यासाठी वाचन करून महत्वाचे मुद्दे नोंदवून घेणे,त्यावर टिपण तयार करणे खूप आवश्यक असते. लेखन करताना आपले म्हणणे पूर्वग्रहदूषित संदर्भावर आधारित असता कामा नये. आपण ज्या संदर्भाचा आधार घेऊन लिखाण करणार आहोत त्या संदर्भाची सत्यासत्यता पडताळणे खूप आवश्यक आहे.यासाठी वाचनाचा व्यासंग वाढविणे खूप आवश्यक आहे.आपलं म्हणणं सुस्पष्ट व भाषा ही ओघवती असली की आपले लिखाण हे वाचनीय नक्कीच होते.
           शेवटी असेच म्हणता येईल की,लेखन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी आत्मानुभव व आत्मपरीक्षण खूप आवश्यक आहे.वास्तवदर्शी लेखनासाठी ज्या विषयावर आपण लिहिणार आहोत त्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे खूप गरजेचे आहे.एखाद्या समस्येवर मत मांडायचे असेल तर नक्की त्या प्रदेशात जाऊन त्या समस्येचा अभ्यास करणे गरजेचे असते.रुडयार्ड किपलिंग यांची 'जंगल बुक' कादंबरी याचे एक सुंदर उदाहरण आहे.प्रसिद्ध पक्षीमित्र सलीम अली यांनी आपले संपूर्ण जीवन फक्त एकाच विषयाचा ध्यास घेऊन व्यतीत केले.आज कुठलाही नवीन पक्षी निरीक्षक त्यांचे संदर्भ ग्रंथ चाळल्याशिवाय आपल्या कार्याचा आरंभ करत नाही.हीच त्यांच्या यशाची पावती आहे.चला तर मग आत्मशोध घ्या आपल्या आत्मानुभवाची नोंद घ्या...आपली मते लिखित स्वरूपात किमान आपल्या दैनंदिनीत तरी मांडा, तरच भाषेची वाढ आणि विकास होईल.हीच आपल्या भाषेची खरी सेवा होईल(यात जगातील सर्व भाषा अंतर्भूत आहेत) तरच भाषा स्वाभिमानाने टिकेल आणि जगेल.त्यासाठी सरकारी अनुदानाची गरज लागणार नाही.....




गणेश तु.कुबडे (स.अ.)
          
       

2 comments: